Showing posts with label शिवाजी महाराज. धत्रपती. Show all posts
Showing posts with label शिवाजी महाराज. धत्रपती. Show all posts

Sunday, November 3, 2013

गुजरातमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात का नाही ?

गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांच्या भव्य स्मारकाचा शिलान्यास झाला पण महाराष्ट्रात शिवरायांचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक केव्हा होणार.. शिवरायांच्या स्मारकाचा घोळ ९ वर्षांपासून सुरुय. तर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी १२.५ एकर जागा देण्याची घोषणा सरकारनं केली. पण या दोन्ही स्मारकाची वाटचाल घोषणेच्या पुढं झालेली नाही....



नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचा दिमाखात शिलान्यास केला पण महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या स्मारकावरुन गेली नऊ वर्षे फक्त चर्चाच होतेय..राज्यकर्त्यांमधील प्रबळ इच्छाशक्तीचा अभाव आणि निष्क्रिय कारभारामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातील भव्य स्मारक आजही मूर्त स्वरुपात साकार झालेलं नाही..फक्त निवडणुकांच्या तोंडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचा किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय काढायचा आणि मराठा मतं मिळवण्याचा डाव मांडायचा हाच उद्योग मागच्या दोन निवडणुकांमध्ये झाला..आता सहा महिन्यात पुन्हा निवडणुकांचे दिवस आहेत मग पुन्हा शिवरायांचं भव्य स्मारक, मराठा आरक्षणाचं गाजर दाखवून निवडणुका लढवायचा हा उद्योग काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष करणारच..पण शिवरायांचं स्मारक हे व्होटबँकेसाठी आहे का ? महाराज महाराष्ट्राचा गर्व आहे. त्यासाठी मुहूर्ताची गरज काय.. पण इच्छाशक्तीच नसेल तर कारणांचे ढिग दिसतातच..जी इच्छाशक्ती नरेंद्र मोदींमध्ये आहे ती इच्छाशक्ती महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये नाही का?..या स्मारकांना होत असलेला विलंब पाहता मला तर इच्छाशक्तीचा अभावच दिसतोय..महाराष्ट्रात महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न 9 वर्षानंतरही पुढे सरकु शकला नाही ही मराठा समाज, महाराष्ट्रातील नेते आणि मराठा संघटना यांना विचार करायला लावणारा आहे...

जे छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं झालं तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं झालं. मुंबईत इंदू मिलच्या साडेबारा एकर जागेवर आंबेडकरांचं भव्य स्मारक व्हावं यासाठी आंबेडकरी जनतेनं तीव्र लढा दिला..शेवटी सरकारनं इंदू मिलची साडेबारा एकर जागा आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्याची घोषणा नागपूरच्या अधिवेशनात केली..त्यालाही दोन वर्ष उलटली..आंदोलनं शांत झाली...सरकार गप्प बसले..पुढे काय..सर्व शांत..पुन्हा निवडणुका येत आहेत..पुन्हा आंदोलनाची हाक दिली जाईल आणि पुन्हा आश्वासनाचं गाजर..हे किती दिवस चालायचं... ? आंबेडकरांचं स्मारक असो वा शिवरायांचं महाराष्ट्रातलं सरकार हे स्मारक उभारण्यासाठी आणखी किती दिवस लावणार याचा जाब लोकांनी विचारायला हवा..का या स्मारकांसाठी आमच्या महाराष्ट्रात प्रबळ इच्छाशक्ती असणारा नरेंद्र मोदीच नाही..

स्मारकं उभारून काय साधणार असा प्रश्न काही लोकांना पडेल. या स्मारकांवर काही हजारो कोटी खर्च करण्यापेक्षा ते पैसे विकासकामांवर खर्च करावेत असाही काही लोकांचा मतप्रवाह असू शकतो..पण थोर पुरुषांची स्मारकं ही पुढच्या पिढींसाठी प्रेरणास्थान असतात. तो इतिहास आम्हाला प्रेरणादायी आहे. तो जतन करण्याचं काम केलच पाहिजे..राहिला प्रश्न विकास कामांचा तर आजपर्यंत हजारो कोटी रुपये विकासकामांच्या नावाखाली अनेकांच्या खिशात गेलेच ना..मग काही कोटी महापुरुषांच्या स्मारकांसाठी गेले तर बिघडलं कुठे..

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रचं दैवत तर डॉ. आंबेडकर यांचाही महाराष्ट्राला अभिमानच आहे..या दोन महापुरुषांची भव्य स्मारकं उभारुन महाराष्ट्रातल्या नेतृत्वानं नवा इतिहास उभा करावा. भलेही त्यामागं मतपेटीचं राजकारण दडलेलं असो..पण ही स्मारकं झालीच पाहिजेत.. त्यासाठी नरेंद्र मोदींसारखी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आमच्या नेतृत्वाला लाभो हीच शिवराय आणि आंबेडकर यांच्या चरणी प्रार्थना...