Sunday, August 30, 2015

पटेल समाजाला आरक्षण का हवं ?



विकासाचं मॉडेल म्हणून कालपर्यंत चर्चेत असलेल्या गुजरातमध्ये आता चर्चा आहे हार्दिक पटेलची..या हार्दिक पटेलनं सगळ्याची झोप उडवलीय. ज्या गुजरातच्या विकासाचे दावे नरेंद्र मोदी मोठ्या थाटात करत होते. गुजरातच्या विकासाचा डंका पिटत होते. त्याच गुजरातमधून आता आरक्षणाचा आवाज बुलंद झालाय. पटेल समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या हार्दिकच्या मागे ताकद आहे तरी कोणाची ? आणि पटेलांना आरक्षण का हवं आहे. ?”


गुजरातच्या राजकारणात पटेल समाजाचा दबदबा राहिलाय.सरकार कोणाचंही असो ते उलथवून लावण्याची राजकीय ताकद या समाजामध्ये आहे.गुजरातमधला प्रगत समाज म्हणून पटेल समाजाकडे पाहिले जातं. पण समाजानं आता आरक्षणासाठी एल्गार पुकारलाय. ज्या गुजरातमध्ये विकासाची भाषा केली जात होती, त्याच गुजरातमधून बराबरी, सामाजिक न्याय, शेतकरी आत्महत्यांचा आवाज उठत आहे.हा आवाज उठवलाय हार्दिक पटेलनं.पण या हार्दिक पटेलच्या मागे कोण आहे याच्या तीन काही शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.
1.हार्दिकच्या मागे आरएसएस?
अवघ्या तीन चार महिन्यात सुरु झालेल्या या आंदोलनाला एवढा पाठिंबा कसा काय मिळाला याची चर्चा झाली नसती तरच नवल. एक मतप्रवाह असाही आहे की या आंदोलनामागं आरएसएसचा हात आहे. हार्दिकच्या आंदोलनातून केंद्रावर दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं बोललं जातय.
2.हार्दिकच्या मागे भाजपचा हात?
हार्दिकच्या या आंदोलनामागे भाजपमधल्या एका मोठ्या गटाचा हात असल्याचा अंदाजही काही जणांनी व्यक्त केलाय. गुजरातमध्ये आनंदीबेन पटेल या मुख्यमंत्री आहेत, त्या नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या असल्याची त्यांची छबी आहे. हे नेतृत्व बदलावं यासाठी हा दबाव असल्याचं बोललं जातय.
3.काँग्रेसचा हाथ का आपची साथ ?
अवघ्या 22 वर्षांच्या हार्दिकनं काही दिवसातच जे आव्हान उभं केलंय. त्यामागं नक्कीच कोणती तरी मोठी ताकद आहे. हार्दिकच्या भाषणाची लकब, ट्विट, भाषणाचा अंदाज हे सर्व पाहाता त्याच्यावर आम आदमी पार्टीचा प्रभाव असल्याचंही बोललं जातंय. अरविंद केजरीवाल यांनीही अण्णा हजारेंच्या आंदोलनावेळी अशीच पद्धतशीरपणे आखणी केली होती. तर केजरीवाल यांच्याबरोबरचे हार्दिक पटेलचे काही फोटोही झळकलेत..त्यामुळं हार्दिकच्या आंदोलनामागे केजरीवालांचा हात असल्याचा अंदाज बांधला जातोय. तर दुसरी एक शक्यता काँग्रेसच्या मदतीची व्यक्त केली जातेय. गुजरातमध्ये काँग्रेसला सध्या चेहरा नाही. त्यामुळं हार्दिकच्या रुपानं काँग्रेस पुन्हा गुजरातमध्ये जम बसवू पाहत आहे असंही बोललं जातय.
4. आरक्षण बंद करण्याचा डाव आहे का ?
पटेल समाजाला आरक्षण द्या नाहीतर आरक्षणच बंद करा अशी मागणी या आंदोलनातून केली जातेय.याचा अर्थ असा आहे की आम्हाला आरक्षण द्या नाहीतर कोणालाच आरक्षण नको. यातून सध्या असलेल्या आरक्षणाची परिभाषा बदलण्याचा डाव असल्याचं स्पष्ट होतंय. गुजरात ही आरएसएसची प्रयोगशाळा. तिथूनच ही मागणी पुढे येतेय हा अर्थातच योगायोग नाही.

आरक्षणाची टक्केवारी सध्या 50 झालीय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 50 टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही. असं असतानाही आरक्षणाची मागणी वाढतेय आणि राजकीय पक्षही व्होटबँकेसाठी आरक्षण देण्याचा निर्णय घेतात. असे निर्णय कोर्टात टिकत नाहीत हे आंध्र प्रदेशातील मुस्लिमांला 5 टक्के आरक्षण, जाटांचे आरक्षण यावरून दिसून आलय. तरिही आरक्षणाची मागणी होतेय. त्यामुळं हार्दिक पटेलनी सुरु केलेल्या आरक्षणाच्या मागणीचा अर्थ खरचं पटेल समाजाला आरक्षण हवं आहे, का आरक्षणच बंद करण्याचा हा एक डाव आहे, अशी शंका घ्यायला जागा आहे. मग हार्दिक पटेलच्या पाठीमागची शक्ती कोणाचाही असो...  


Friday, August 28, 2015

कांदा नेहमीच का करतो वांदा ?

रस्त्यावरच्या गाड्यांपासून फाईव्हस्टार हॉटेलपर्यंत आणि सामान्य कुटुंबापासून मल्टीमिलेनिअरपर्यंत सगळ्यांच्याच किचनमध्ये कांद्याला मानाचं पान आहे. त्यामुळं कांद्याचा भानव वाढला की चर्चा होतेच. वर्षातून एकदा तरी कांद्याचे भाव वाढणार आणि त्यावर गरमागरम चर्चा होणार हे आता ठरूनच गेलंय. पण कांद्याचे भाव हे वाढतात की वाढवले जातात. याचा फायदा कोणाला होता, काय आहे कांद्याचं राजकारण हे पाहुयात..


मागच्या आठवड्यापासून कांद्याचा भाव चढा आहे.ठोक बाजारात तो दुपटीनं वाढला. विशेष म्हणजे स्वयंपाकासाठी अत्यावश्यक असणाऱ्या अनेक वस्तूंचे भाव गेल्या काही वर्षांत अनेकदा वाढले. मात्र, त्यावर कांद्याएवढी चर्चा झाली नाही.सामान्यांचं कांदा भाकरी हे अन्न...कांदा महागला तर त्याचं जेवणही महाग होतं तर याच कांद्याच्या वाढत्या किंमतीनं सरकारही हादरलेली आहेत. त्यामुळं कांद्याचा भाव वाढला क चर्चा ही होणारच..कांदा हा पोळ, उन्हाळ आणि रांगडा अशा तीन हंगामात निघणारं पिक. जानेवारीच्या सुमारास रांगडा हा रब्बी कांदा बाजारात येतो. या कांद्याचं पीक त्याच्या नावासारखंच जास्त निघतं. तो टिकतोही चांगला. मार्च-एप्रिलच्या सुमाराला उन्हाळ कांद्याचं पीक निघतं. उन्हाळ कांदा हा सर्वाधिक टिकाऊ असतो. त्याची साठवणही जास्त दिवस करता येते. त्यामुळेच निर्यातीसाठी उन्हाळ कांद्याला पहिली पसंती असते. या कांद्यानंतर खरीपाच्या लागवडीचा पोळ कांदा बाजारात येतो. सप्टेंबरच्या मध्यापासून ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत आगमन होणाऱ्या या कांद्यांचं आयुष्यमान कमी असतं. एकंदर परिस्थिती पाहता उन्हाळ कांदा संपताना आणि पोळ यायच्या आधी बाजारभाव भडकत असल्याचा सर्वसाधारण अनुभव आहे. त्यामागे काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित कारणं आहेत. एकतर पोळ कांदा हा निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असतो. पावसाचा अनियमितपणा पोळ कांद्याला नेहमीच भोवतो आणि कांदाबाजाराचे ठोकताळे बिघडतात. दुसरीकडे उन्हाळ कांदा प्रदीर्घकाळ बाजारात असतो. अंगभूत गुणवैशिष्ट्यांमुळे उन्हाळ कांद्याला मागणी चांगली असते. अनेक व्यापारी उन्हाळ कांद्याची साठवणूक करून ठेवतात. भाव वर चढले की कांद्यात केलेली गुंतवणूक चांगला परतावा देऊन जाईलअसं त्यांचं गणित असतं. मग बाजारातली परिस्थिती पाहून पोळ कांदा बाजारात येण्याच्या काही दिवस आधी उन्हाळ कांद्याचे भाव भडकतात किंवा भडकवले जातात. थोड्या अवधीसाठी निर्माण झालेली अथवा केलेली ही परिस्थिती भडकते, ती पोळ कांद्यांचं आगमन लांबलं तर...या सर्वात फायदा होतो तो फक्त व्यापारी आणि दलाल यांचाच....

Sunday, August 2, 2015

न्या. काटजूंच्या जिभेला लगाम कोण घालणार ?



न्यायपालिका आणि न्याय देणारे न्यायमूर्ती यांच्याबद्दल आपल्या समाजात आजही आदर आहे, विश्वास आहे. अधूनमधून या क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराचे काही किस्सेही उघड होत असले तरी इतर क्षेत्रांच्या मानानं न्यायपालिकेवरचा विश्वास अजूनही कायम आहे. पण यातलेच काही महाभाग जेव्हा वाचाळविरासारखे बडबड करतात तेव्हा ज्यांच्यावर विश्वास आहे तेही असेच आहेत का असा प्रश्न पडतो. हे वाचाळवीर आहेत माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू. त्यांनी अशी मुक्ताफळं अनेकदा उधळलीत.


माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी सर्वोच्च न्यायालयात अनेक वर्ष न्यायदानाचं काम केलंय. ते न्यायमूर्ती असताना त्यांनी दिलेल्या निकालाची जेवढी चर्चा झाली नाही तेवढी चर्चा आता होतेय.कारण हे महाशय अशी काही मुक्ताफळं उधळत आहेत की हा माणूस सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होता याचं आश्चर्य वाटतं आणि मग या माणसानं निकाल तरी कसे दिले असतील असा प्रश्नही पडतो. आता या महाशयांचा विषय निघण्याचं कारण म्हणजे त्यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावर निशाणा साधलाय.टिळक हे ब्रिटिशांचे एजंट होते, ते हिंदुत्वावादी असून, त्यांनी ब्रिटीश अधिका-यांनाही मदत केली. तसेच राजकारणात धर्म आणण्याचे कामही त्यांनीच केलं अशी मुक्ताफळं या महाशयांनी उधळलीत. टिळकांचे विचार आणि कार्य हे इंग्रजांच्या 'फोडा आणि राज्य करा' या कूटनीतीनं प्रेरित होते असा आरोपही त्यांनी केलाय. लोकमान्य टिळकांना देश महान स्वातंत्र्यसैनिक मानतो. पण मला ते मान्य नाही असंही हे महाशय म्हणतात..
खरं तर लोकमान्य टिळकांबद्दल या काटजूंनी महाराष्ट्राला काही सांगण्याची गरज नाही. टिळकांबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आदर होता आणि राहणारच. त्यात या काटजूंनी काही गरळ ओकली म्हणून टिळकांबद्दलचा आदर कमी होण्याची सूतराम शक्यता नाही. काटजूंच्या विधानाकडे तसं फारसं लक्ष देण्याची गरजही नाही. पण मुद्दा आहे तो जो व्यक्ती न्यायदानाच्या प्रक्रियेत एवढी वर्ष काम करते त्यानं अशी मुक्ताफळं का उधळावीत. बरं त्यांनी टिळकांबद्दलच अशी मुक्ताफळं उधळलीत असं नाही तर याआधी माजी पंतप्रधान मनमोहनसिंह, सोनिया गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अशीच मुक्ताफळं उधळलीत. घोटाळ्यावर घोटाळे करून कोट्यवधी रुपयांची लूट करणारे सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग हे दोघे भामटे आणि हरामखोर आहेत अशी खालच्या पातळीवरची भाषा या महाशयांनी वापरलीय. तर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर नरसंहार घडवून आणणारे नरेंद्र मोदी हेही धोकेबाज आहेत असं या काटजूंनी म्हटलय. तर दुसरीकडं याच काटजूंना मुंबई स्फोटातील दोषी अभिनेता संजय दत्त मात्र सज्जन वाटतोय. त्याची शिक्षा माफ करावी यासाठी त्यांनी पत्रप्रपंचही केला..
न्यायमूर्ती काटजू यांनी उधळलेली ही मुक्ताफळं पाहिली तर न्यायमूर्ती पदावर असताना त्यांनी काय दिवे लावले असतील हे समजेल. अशी वाचाळव्यक्ती न्यायपालिकेत उच्चपदावर होती याला काय म्हणावे. न्याय देतानाही या महाभागाची अशीच सटकली असेल का आणि त्यातून काही निरपराध्यांना जेलच्या अंधार कोठडीत तर या महाशयांनी ढकललं नाही ना. हे प्रश्न उपस्थित होणारच. न्यायमूर्ती काटजू यांच्यासारखेच लोक जर न्यायपालिकेत आणखी असतील तर विश्वास तर कोणावर ठेवायचा. न्यायालयात उभी असलेली न्यायदेवता डोळ्यावर पट्टी बांधून आहे म्हणून तीनं काटजूंचे असले प्रताप पाहिलेले नाहीत असं आपण समजू. आता या वयात काटजू महाशयांमध्ये काही बदल होईल अशी अपेक्षा करणं जरा जास्तच होईल पण हे न्यायदेवते त्यांना तूच माफ कर आणि त्यांच्या जिभेला लगाम घाल एवढी अपेक्षा मात्र करू..