Sunday, August 30, 2015

पटेल समाजाला आरक्षण का हवं ?विकासाचं मॉडेल म्हणून कालपर्यंत चर्चेत असलेल्या गुजरातमध्ये आता चर्चा आहे हार्दिक पटेलची..या हार्दिक पटेलनं सगळ्याची झोप उडवलीय. ज्या गुजरातच्या विकासाचे दावे नरेंद्र मोदी मोठ्या थाटात करत होते. गुजरातच्या विकासाचा डंका पिटत होते. त्याच गुजरातमधून आता आरक्षणाचा आवाज बुलंद झालाय. पटेल समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या हार्दिकच्या मागे ताकद आहे तरी कोणाची ? आणि पटेलांना आरक्षण का हवं आहे. ?”


गुजरातच्या राजकारणात पटेल समाजाचा दबदबा राहिलाय.सरकार कोणाचंही असो ते उलथवून लावण्याची राजकीय ताकद या समाजामध्ये आहे.गुजरातमधला प्रगत समाज म्हणून पटेल समाजाकडे पाहिले जातं. पण समाजानं आता आरक्षणासाठी एल्गार पुकारलाय. ज्या गुजरातमध्ये विकासाची भाषा केली जात होती, त्याच गुजरातमधून बराबरी, सामाजिक न्याय, शेतकरी आत्महत्यांचा आवाज उठत आहे.हा आवाज उठवलाय हार्दिक पटेलनं.पण या हार्दिक पटेलच्या मागे कोण आहे याच्या तीन काही शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.
1.हार्दिकच्या मागे आरएसएस?
अवघ्या तीन चार महिन्यात सुरु झालेल्या या आंदोलनाला एवढा पाठिंबा कसा काय मिळाला याची चर्चा झाली नसती तरच नवल. एक मतप्रवाह असाही आहे की या आंदोलनामागं आरएसएसचा हात आहे. हार्दिकच्या आंदोलनातून केंद्रावर दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं बोललं जातय.
2.हार्दिकच्या मागे भाजपचा हात?
हार्दिकच्या या आंदोलनामागे भाजपमधल्या एका मोठ्या गटाचा हात असल्याचा अंदाजही काही जणांनी व्यक्त केलाय. गुजरातमध्ये आनंदीबेन पटेल या मुख्यमंत्री आहेत, त्या नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या असल्याची त्यांची छबी आहे. हे नेतृत्व बदलावं यासाठी हा दबाव असल्याचं बोललं जातय.
3.काँग्रेसचा हाथ का आपची साथ ?
अवघ्या 22 वर्षांच्या हार्दिकनं काही दिवसातच जे आव्हान उभं केलंय. त्यामागं नक्कीच कोणती तरी मोठी ताकद आहे. हार्दिकच्या भाषणाची लकब, ट्विट, भाषणाचा अंदाज हे सर्व पाहाता त्याच्यावर आम आदमी पार्टीचा प्रभाव असल्याचंही बोललं जातंय. अरविंद केजरीवाल यांनीही अण्णा हजारेंच्या आंदोलनावेळी अशीच पद्धतशीरपणे आखणी केली होती. तर केजरीवाल यांच्याबरोबरचे हार्दिक पटेलचे काही फोटोही झळकलेत..त्यामुळं हार्दिकच्या आंदोलनामागे केजरीवालांचा हात असल्याचा अंदाज बांधला जातोय. तर दुसरी एक शक्यता काँग्रेसच्या मदतीची व्यक्त केली जातेय. गुजरातमध्ये काँग्रेसला सध्या चेहरा नाही. त्यामुळं हार्दिकच्या रुपानं काँग्रेस पुन्हा गुजरातमध्ये जम बसवू पाहत आहे असंही बोललं जातय.
4. आरक्षण बंद करण्याचा डाव आहे का ?
पटेल समाजाला आरक्षण द्या नाहीतर आरक्षणच बंद करा अशी मागणी या आंदोलनातून केली जातेय.याचा अर्थ असा आहे की आम्हाला आरक्षण द्या नाहीतर कोणालाच आरक्षण नको. यातून सध्या असलेल्या आरक्षणाची परिभाषा बदलण्याचा डाव असल्याचं स्पष्ट होतंय. गुजरात ही आरएसएसची प्रयोगशाळा. तिथूनच ही मागणी पुढे येतेय हा अर्थातच योगायोग नाही.

आरक्षणाची टक्केवारी सध्या 50 झालीय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 50 टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही. असं असतानाही आरक्षणाची मागणी वाढतेय आणि राजकीय पक्षही व्होटबँकेसाठी आरक्षण देण्याचा निर्णय घेतात. असे निर्णय कोर्टात टिकत नाहीत हे आंध्र प्रदेशातील मुस्लिमांला 5 टक्के आरक्षण, जाटांचे आरक्षण यावरून दिसून आलय. तरिही आरक्षणाची मागणी होतेय. त्यामुळं हार्दिक पटेलनी सुरु केलेल्या आरक्षणाच्या मागणीचा अर्थ खरचं पटेल समाजाला आरक्षण हवं आहे, का आरक्षणच बंद करण्याचा हा एक डाव आहे, अशी शंका घ्यायला जागा आहे. मग हार्दिक पटेलच्या पाठीमागची शक्ती कोणाचाही असो...  


No comments:

Post a Comment