Friday, August 28, 2015

कांदा नेहमीच का करतो वांदा ?

रस्त्यावरच्या गाड्यांपासून फाईव्हस्टार हॉटेलपर्यंत आणि सामान्य कुटुंबापासून मल्टीमिलेनिअरपर्यंत सगळ्यांच्याच किचनमध्ये कांद्याला मानाचं पान आहे. त्यामुळं कांद्याचा भानव वाढला की चर्चा होतेच. वर्षातून एकदा तरी कांद्याचे भाव वाढणार आणि त्यावर गरमागरम चर्चा होणार हे आता ठरूनच गेलंय. पण कांद्याचे भाव हे वाढतात की वाढवले जातात. याचा फायदा कोणाला होता, काय आहे कांद्याचं राजकारण हे पाहुयात..


मागच्या आठवड्यापासून कांद्याचा भाव चढा आहे.ठोक बाजारात तो दुपटीनं वाढला. विशेष म्हणजे स्वयंपाकासाठी अत्यावश्यक असणाऱ्या अनेक वस्तूंचे भाव गेल्या काही वर्षांत अनेकदा वाढले. मात्र, त्यावर कांद्याएवढी चर्चा झाली नाही.सामान्यांचं कांदा भाकरी हे अन्न...कांदा महागला तर त्याचं जेवणही महाग होतं तर याच कांद्याच्या वाढत्या किंमतीनं सरकारही हादरलेली आहेत. त्यामुळं कांद्याचा भाव वाढला क चर्चा ही होणारच..कांदा हा पोळ, उन्हाळ आणि रांगडा अशा तीन हंगामात निघणारं पिक. जानेवारीच्या सुमारास रांगडा हा रब्बी कांदा बाजारात येतो. या कांद्याचं पीक त्याच्या नावासारखंच जास्त निघतं. तो टिकतोही चांगला. मार्च-एप्रिलच्या सुमाराला उन्हाळ कांद्याचं पीक निघतं. उन्हाळ कांदा हा सर्वाधिक टिकाऊ असतो. त्याची साठवणही जास्त दिवस करता येते. त्यामुळेच निर्यातीसाठी उन्हाळ कांद्याला पहिली पसंती असते. या कांद्यानंतर खरीपाच्या लागवडीचा पोळ कांदा बाजारात येतो. सप्टेंबरच्या मध्यापासून ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत आगमन होणाऱ्या या कांद्यांचं आयुष्यमान कमी असतं. एकंदर परिस्थिती पाहता उन्हाळ कांदा संपताना आणि पोळ यायच्या आधी बाजारभाव भडकत असल्याचा सर्वसाधारण अनुभव आहे. त्यामागे काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित कारणं आहेत. एकतर पोळ कांदा हा निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असतो. पावसाचा अनियमितपणा पोळ कांद्याला नेहमीच भोवतो आणि कांदाबाजाराचे ठोकताळे बिघडतात. दुसरीकडे उन्हाळ कांदा प्रदीर्घकाळ बाजारात असतो. अंगभूत गुणवैशिष्ट्यांमुळे उन्हाळ कांद्याला मागणी चांगली असते. अनेक व्यापारी उन्हाळ कांद्याची साठवणूक करून ठेवतात. भाव वर चढले की कांद्यात केलेली गुंतवणूक चांगला परतावा देऊन जाईलअसं त्यांचं गणित असतं. मग बाजारातली परिस्थिती पाहून पोळ कांदा बाजारात येण्याच्या काही दिवस आधी उन्हाळ कांद्याचे भाव भडकतात किंवा भडकवले जातात. थोड्या अवधीसाठी निर्माण झालेली अथवा केलेली ही परिस्थिती भडकते, ती पोळ कांद्यांचं आगमन लांबलं तर...या सर्वात फायदा होतो तो फक्त व्यापारी आणि दलाल यांचाच....

No comments:

Post a Comment