Friday, April 24, 2015

शिवसेनेवर घोंगावतंय 'हिरवं संकट' !


औरंगाबाद महापालिकेवर शिवसेना भाजपचा भगवा झेंडा कायम राहिला असला तरी यावेळी हा झेंडा एवढ्या ताठ मानेनं आणि दिमाखात फडकलेला नाही. ज्या औरंगाबादशी शिवसेनेचं एक भावनिक नातं आहे ही भावनिक नाळ तुटलेली दिसतेय. तर पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीत उडी घेऊन प्रचंड यश मिळवलेल्या एमआयएमनं सर्वांना आश्चर्यचकित करुन सोडलं. एमआयएमचा विजय हा शिवसेना, भाजपसह काँग्रेससाठीही धोक्याची घंटाच आहे.


हैदराबादच्या एमआयएम या पक्षानं नांदेड महापालिका निवडणुकीत 11 जागा जिंकून महाराष्ट्राच्या राजकारणात जो यशस्वी प्रवेश केला ती यशाची घोडदौड त्यांनी कायम ठेवलीय.नांदेडनंतर विधानसभेवर एमआयएमचे दोन आमदार निवडून आले.यातला एक आमदार हा औरंगाबादमधूनच निवडून आलाय. त्यामुळंमहापालिकेचा निकाल पाहता औरंगाबादमध्येएमआयएमचा विस्तार चांगला झाला असं म्हटलं तर वावगं वाटू नये. या महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएमनं जोरदार मुसंडी मारलीय. 113जागांच्या या महापालिकेत एमआयएमनं 55जागांवर उमेदवार उभे केले आणि तब्बल 25जागांवर विजय मिळवला.शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटलं जायचं त्या औरंगाबादमध्ये शिवसेनेला फक्त29 आणि भाजपला 23 जागांवर विजय मिळवता आला. हा विजयही युती करून मिळालेला आहे.त्यामानानं एमआयएमचं यश हे फार बोलकं आहे.विधानसभेच्या प्रचारात उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांना ‘औरंगजेबाच्या फौजांचं आक्रमण’ आलंय असा टोला मारला होता. या औरंगजेबाच्या फौजांचा त्यावेळी ‘बंदोबस्त’ त्यांना करता आला नाही तर आता औरंगाबादच्या निवडणुकीत हैदाराबदच्या ‘रझाकारी फौजांचं आक्रमण’ कधी आलं आणि शिवसेनेला कधी भारी पडलं हे त्यांनाही कळलं नाही. आता संभाजीनगरचे म्हणजे औरंगाबादचे सुभेदार त्याचा दोष भाजपच्या माथी फोडत आहेत. पण संभाजीनगरचा गड राखणा-यांना हे हैदराबादी संकट केवढं मोठं आहे याची काडीमात्र शंका आली नाही याला काय म्हणावं. आतातरी या सुभेदारांचा ‘बंदोबस्त’‘मातोश्री’ करणार आहे का, का गड एमआयएमनं जिंकल्यानंतर कडेलोट करण्यासाठी वाट पाहिली जातेय हे ‘मातोश्री’च जाणो..  एमआयएमला मिळालेलं हे घवघवीत यश शिवसेना आणि भाजपला विचार करायला लावणारं आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून औरंगाबादकडे पाहिलं जातं. ( शिवसेनेच्या भाषेत संभाजीनगर) या शहरानं बाळासाहेब ठाकरेंवर मनापासून प्रेम केलं. म्हणूनच संभाजीनगरच्या लोकांनी शिवसेनेला नेहमीच मोठी आणि भक्कम साथ दिली. पण त्याचा विसर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना पडल्याचं दिसतंय. 25-30 वर्षात शिवसेनेनं औरंगाबादला काय दिलं, याचं उत्तर शिवसेनेनं शोधून पाहावं.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वीजेचा प्रश्न, ड्रेनेजचा प्रश्न या मुलभूत सुविधाही ते देऊ शकले नाहीत. कदाचित यासाठी हे नेते राज्य सरकार आणि प्रशासनाला दोष देतील. मग तुम्ही सत्तेवर कशासाठी बसता ? बाळासाहेबांच्या भाषेतच सांगायचं तर, तुम्ही काय फक्त खुर्च्या उबवता काय? काय केलं 25 वर्षात या शिवसेनेनं औरंगाबादसाठी ?...निवडणुका आल्या की फक्त भावनिक मुद्दे पुढं करायचे, संभाजीनगर नामकरणाचं गाजर दाखवायचं, हिंदूंना मुस्लीमांची भिती दाखवायची हेच उद्योग केलेत ना शिवसेनेनं औरंगाबादमध्ये आजपर्यंत !. आताही ‘बाण हवा का खान’ हाच प्रचार केला ना शिवसेनेनं. !25 वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे विकासासाठी.एक पिढी गेली आता नवी पिढी आलीय. भावनिक मुद्द्याचं राजकारण आता जास्त दिवस चालणार नाही. शिवसेनेनं याची वेळीच दखल घेतली पाहिजे. वाढत्या शहराचा विकास केला पाहिजे, त्यांच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हे जसं महत्वाचं आहे तसच औरंगाबादमध्ये शिवसेना पुन्हा भक्कम रुपानं उभी केली पाहिजे.कोणा एकाच्या दावणीला पक्ष संघटना बांधून चालणार नाही. बंडखोरीची लागण मुळापासून उपटून टाकली पाहिजे. तरुण पिढीला आता काय हवं याचं भान शिवसेनेच्या नेतृत्वाला आलं पाहिजे. शिवसेनेनं यापुढं फक्त भावनिक मुद्द्यांवर लक्ष दिलं तर एमएमआयमचं आव्हान आणखी गडद होईल.हा धोका शिवसेनेसाठी मोठा आहे. एकीकडे भाजपबरोबर युती करुन लाथाळ्यांचा खेळ सुरूय तर दुसरीकडे एमआयएमचं संकट घोंघावतंय. शिवनेसेच्याच भाषेत सांगायचं तर हिरवं संकट संभाजीनगरवर आलंय. या संकटाला वेळीच थोपवलं नाही तर संभाजीनगरवरचा हा भगवा खाली उतरायला वेळ लागणार नाही. काळाची पावलं ओळखून शिवसेनेनं शहाणपणाचं राजकारण करावं आणि भगव्याची शान राखावी यातच त्यांचही भलं आहे.तोपर्यंत जय महाराष्ट्र !    

No comments:

Post a Comment