Tuesday, February 4, 2014

राष्ट्रवादीसाठी ‘करा किंवा मरा’ची लढाई


लोकसभेच्या 2014 च्या निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठ्या आव्हानात्मक आहेत. 1999 साली स्थापन केलेल्या या पक्षाची ओळखच मुळात महाराष्ट्रातील एक प्रादेशिक पक्ष अशी आहे. पश्चिम महाराष्ट्रात या पक्षाची ताकद जास्त आहे. इतर भागात अजून पक्ष विस्तारलेला नाही..मागच्या 15 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात आणि दिल्लीत सत्तेत आहे. या पक्षाकडे राज्यातील महत्वाची मंत्रिपदं आहेत. असं असतानाही या पक्षाचा महाराष्ट्रात फारसा विस्तार झालेला नाही.
2012-13 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या पक्षाला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाला एवढीच काय ती  कामगिरी..पण विधानसभा आणि लोकसभेचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद किती वाढली याचा पक्षानं विचार करायला हवा.
साखर लॉबी आणि पश्चिम महाराष्ट्र
शरद पवार यांचं नेतृत्व, साखर लॉबी आणि मराठा समाजाचा पाठिंबा या जोरावर या पक्षाची वाटचाल सुरू आहे. पण त्यात त्यांना सत्ता असूनही महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोचण्यात यश आलेलं नाही. विधानसभेच्या 100 जागाही या पक्षाला आत्तापर्यंत जिंकता आलेल्या नाहीत, लोकसभेची गोष्टही तिच..राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेच्या 22 जागा लढवते पण 10 जागाही त्यांना जिंकता आल्या नाहीत.. त्यामानानं शिवसेनेची लोकसभेतली कामगिरी चांगली आहे..शरद पवार यांनी लोकसभेत जास्तीत जास्त जागा जिंकून बारगेनिंग पॉवर वाढवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आलेलं नाही. यावर्षीही 22 जागांपैकी 15-16 जागा जिंकण्याचा पवारसाहेबांचा प्रयत्न आहे. त्यासाठी महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा त्यांचा इरादा आहे.पण एवढं करुनही त्यांना अपेक्षित य मिळेल असं वाटत नाही.

भ्रष्टाचाराचा कलंक आणि सुमार कामगिरी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. त्यातच मागच्या तीन वर्षात मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या नाकी नऊ आणलय. जलसंपदा विभागातला घोटाळा असो की शिखर बँकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय..राष्ट्रवादीचा इंटरेस्ट असलेल्या अनेक प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी ब्रेक लावले..तर दुसरीकडे साखर सम्राटांना दणका देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जोरदार आंदोलनं केली. या आंदोलनाच्या दणक्यानं अनेक साखर कारखानदारांची झोप उडवली. थेट बारामतीतच उपोषण करून राजू शेट्टी यांनी ते यशस्वी करुन दाखवलं. ऊसाला 3 हजारांचा भाव द्यावा म्हणून शेट्टींनी खूप जोर लावला..तो आता 2250 पर्यंत देण्याचं कारखान्यांनी मान्य केलय..पण साखर सम्राटांना शेट्टींनी मात्र एकप्रकारे सुरुंगच लावला.. 
नव्या नेतृत्वाचा काय उपयोग ?
 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुस-या फळीचं नेतृत्व अजित पवार करत आहेत. पण त्यांची महत्वाकांक्षा पाहाता थोरलेसाहेब सगळी सुत्रं त्यांच्या हातात देण्यास अजूनही तयार नाहीत..राजीनामानाट्यावेळी सर्व आमदार आपल्या पाठीमागे आहेत असं दादांना वाटलं पण थोरल्यासाहेबांनी डोळे वटारताच सर्व आमदार शांत बसले. यातच मोठ्या साहेबांची पक्षावर आजही किती मजबूत पकड आहे हे स्पष्ट दिसतय. अजितदादांना पक्षातले ज्येष्ठ नेतेच विरोध करत आहेत. तर सुप्रिया सुळे यांचं नेतृत्व पुढं करण्यासाठी युवती मेळावा, लेक वाचवा अभियान आखण्यात आलं पण नेतृत्व म्हणून काही त्या चमक दाखवू शकल्या नाहीत..

शरद पवारांचा कस लागणार
मुख्यमंत्र्यांची राजकीय खेळी, काँग्रेसमधलं राहुल गांधींचं वाढतं महत्व, महायुतीची एकजूट, राजू शेट्टींचं आंदोलन आणि आपल्याच पक्षातील भ्रष्ट मंत्री अशी प्रतिमा हे राष्ट्रवादीला मारक ठरणार आहेत. माढ्याची हक्काची जागाही यावेळी राखता येईलं का हा प्रश्नही आहेच..पवारांसारख्या अनुभवी नेत्याकडे वर्षानुवर्षांची सत्ता, नेत्यांची मोठी फळी असूनही त्यांचं गणित कुठं चुकतं हे पवासाहेबांना कळालं नसेल असं वाटत नाही.. तरिही यावर्षी पुन्हा जोर देण्याचा पवारांचा प्रयत्न आहे.. पण मतदारराजा पवारसाहेबांच्या पारड्यात किती कौल देतो आजच स्पष्ट आहे..

No comments:

Post a Comment