Tuesday, January 21, 2014

मनसेची वाट बिकट




महाराष्ट्रात आम्ही आहोत बाप कशाला पाहिजे आप...असं राज ठाकरेंनी नाशिकमध्ये ठणकावलं.. पण राज ठाकरेंना महाराष्ट्रानं अजून तरी बाप म्हणून स्विकारालेलं नाही..मागच्या विधानसभा निवडणुकीत जरी 13 आमदार, नाशिक, पुणे, कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेला चांगल्या जागा मिळाल्या असल्या तरी ते कोणत्याचं अर्थानं बाप ठरलेले नाहीत..मनसेनं महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते दिवे लावले म्हणून त्यांना लोकांनी बाप म्हणून स्विकारावं याचं उत्तरही राज ठाकरे देऊ शकणार नाहीत. 2009 च्या निवडणुकीत ज्या आशेनं तरुणवर्ग राज ठाकरे यांच्यामागे गेला. त्यांचा आता भ्रमनिरास झाल्याचं दिसतय. पण दिल्लीतल्या आम आदमी पक्षाच्या उदयानंतर देशातलं राजकारण बदलय. त्याचा विचार मनसेला करावा लागणाराय..

 

ब्ल्यू प्रिंट कुठे आहे?

मनसेची स्थापना करताना राज ठाकरे यांनी विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करुन वाटचाल करण्याची गर्जना शिवाजी पार्कवर केली होती. माझ्या हाती सत्ता द्या, मग बघा सर्वांना कसं सरळ करतो. असं ते नेहमी म्हणतात. 13 आमदार आल्यानंतर विरोधी पक्ष काय असतो ते आम्ही दाखवून देऊ असं ते म्हणत...पण नाशिक महापालिकेची सत्ता ,पुणे, कल्याण डोंबिवली महापालिका असो वा विधानसभा, मनसेनं लक्षात राहिलं असं काही केल्याचं दिसत नाही...

ना आंदोलन, ना कार्यकर्त्यांना कार्यक्रम

राज ठाकरे यांच्या पक्षानं गेल्या पाच वर्षात लोकांच्या प्रश्नांसाठी कोणतं आंदोलन केले वा कोणता प्रश्न तडीस लावला हे त्यांनाही आठवत नसेल. फक्त उत्तर भारतीयांच्या नावावर कुठेतरी धिंगाणा घालणं यापलीकडे त्यांनी फारसं काही केलेलं नाही...त्यातच ज्या अमिताभ बच्चन यांच्यावर त्यांनी टीकेची झोड उठवली होती त्याच बचच्न यांना मनसे चित्रपट सेनेच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं आणि झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला..तर टोल नाक्याच्या प्रश्नावर केलेलं आंदोलनही दोन दिवसातच मागं पडलं. गिरणी कामगारांच्या प्रश्नावर वातावरण तापल्यानंतर एका मोर्चात दस्तुखुद्द राज ठाकरे अवतरले पण काही अंतर चालत जाऊन ते पुन्हा परत गेले. खरं तर टोलविरोधी आंदोलन जर त्यांनी तडीस नेलं असतं तर मनसेची लोकप्रियता आणखी वाढली असती. पण माशी कुठं शिंकली माहित नाही. पुन्हा त्यावर मनसेचा आवाज निघालाच नाही.

मुंबईत काय केले ?

मुंबईत रस्त्यावरच्या खड्ड्यांचा प्रश्न नेहमीच गाजतो पण एखाद्या कॉँट्रॅक्टरच्या थोबाडीत मारण्यापलिकडे  त्यांनी काही केलं नाही. फक्त खळ्ळ खट्ट्याक एवढेच आवाज काढण्याचं काम करायचं आणि तो विषय तिथंच सोडून द्यायचा हाच उद्योग मनसेनं केला. ज्या मुंबई, नाशिक, पुणे पट्ट्यात मनसेला चांगलं यश मिळालं तिथं तरी त्यांची कामगिरी काय..लक्षात राहिलं असं त्यांनी काय केलं याचं उत्तर त्यांनाही देता येणार नाही. पुणे महापालिकेत मनसेचे चांगले 26-27 नगरसेवक आहेत. नाशिकमध्ये मनसेचा महापौर आहे. खेड नगरपालिकेत मनसेची सत्ता आहे असं असनूही त्यांचे नगरसवेक कामात छाप पाडू शकले नाहीत. कल्याण डोंबिवलीतही मनसेला चांगल्या जागा आहेत. पण तिथंही प्रभावी विरोधीपक्ष म्हणून त्यांनी छाप पाडलेली नाही...

मनसेचा विस्तार कुठे झाला ?

महाराष्ट्राच्या इतर भागात मनसेची स्थिती फारसी चागंली नाही. मनसेचं संघटनही ग्रामिण भागात पोहचलेलं नाही. शेतक-यांच्या प्रश्नावर त्यांनी कधी आवाज उठवला नाही..विदर्भातल्या शेतक-यांच्या आत्महत्यांचा विषय कधी लावून धरला नाही. दुष्काळावरही फारसं काही केलं नाही. अशा स्थितीत कधीतरी टीव्हीवर येऊन काही भूमिका मांडणं आणि जाहीर सभा घेऊन पक्ष कसा वाढणार..त्यासाठी कार्यकर्त्यांची फौज तयार केली पाहिजे. त्यांना काहीतरी कार्यक्रम दिला पाहिजे. तो देण्यात मनसे कमी पडली आहे. त्यामुळे एकहाती सत्ता देण्याची भाषा करण्याअगोदर राज ठाकरे यांनी स्वतःची कार्यपद्धती बदलली पाहिजे तरच त्यांना चांगलं यश येईलं अन्यथा एक होता मनसे असचं म्हणावं लागेल....

 

1 comment:

  1. राजसाहेबांना एकदा संधी द्या मग पाहा कसे सगळे सुतासारखे सरळ होतात..रमेश काळे, सातारा..

    ReplyDelete