Monday, April 15, 2013

अजित पवारांची टगेगिरी ते गांधीगिरी


आपल्या बेधडक आणि सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा अडचणीत आले..अजित पवारांच्या या बेधडक बोलण्यानं ते यापूर्वीही अडचणीत आले होते..पण इंदापूरच्या सभेत त्यांनी जे शब्द वापरले ती भाषा मात्र त्यांना शोभणारी नव्हती... त्यामुळे अख्खा महाराष्ट्रानं त्यांची छी थू केली. दुष्काळामुळं पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. उजनीचं पाणी सोलापूरला मिळावं या मागणीसाठी सोलापूरचा एक सामान्य माणूस प्रभाकर देशमुख हा मुंबईत 55 दिवसांपासून मुंबईत आझाद मैदानात उपोषणाला बसला. त्याचा उल्लेख करताना अजित पवारांनी अत्यंत खालच्या भाषेत त्यांचा पाणउतारा  केला..एकप्रकारे अजित पवारांनी दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठच चोळलं. हे बोलताना त्यांच्या चेह-यावरचा नेहमीचा सत्तेचा माजही दिसला...अशाप्रकारचं वक्तव्य हे कोणत्याच व्यक्तीला शोभणारं नाही..त्यातच राज्याचा उपमुख्यमंत्री जर अशी कंबरेखालची भाषा जाहीरपणे वापरत असेल तर त्याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे...


हे पवारांना शोभणारं नाही
कराडमध्ये आत्मक्लेश करणारे अजित पवार


अजित पवारांनी त्यानंतर जाहीर माफीही मागितली पण त्यांनी जे शब्द वापरले ते माफी मागून परत न येणारे होते...एखादी व्यक्ती जर सरकारकडे काही मागत असेल तर त्याची अशा शब्दात जाहीर टिंगल करणं हे राज्यकर्त्याला शोभणारं नाही. त्यावर विरोधी पक्षांनी त्यांची पोळी भाजून घेतली तो भाग वेगळा..पण हा वाद एवढा वाढला की शेवटी मोठ्या साहेबांना त्यात हस्तक्षेप करावा लागला..मोठ्या पवारसाहेबांनीही अजित पवारांचे कान उपटले..नुसते कानच उपटले नाहीत तर कडक शब्दात पानउताराच केला..हे करत असताना त्यांनी पक्षावर आजही आपलीच पकड आहे हे दाखवून दिलं..राजीनामा देण्याचा निर्णय आमदार नाही तर पक्ष घेईल हे सुनावायलाही ते विसरले नाहीत...हे सगळं झाल्यानंतर हे प्रकरण थांबेल असं वाटलं होतं...पण काकांनी तंबी दिल्यानंतर पुतण्याला अचानक पश्चाताप झाला.. त्यांनी तडक कराड गाठून यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोर आत्मक्लेश उपोषण केलं. त्यांच्या सांगण्याप्रमाणं त्यांनी कोणालाच याची कल्पना दिली नव्हती..तरिही रविवारचा दिवस असल्यानं टीव्हीवाल्यांना आयतीच संधी मिळाली आणि अजित पवार दिवसभर टीव्हीवर चमकले.यातून त्यांनी जो संदेश ज्यांना द्यायचा होता त्यांना दिलाच...

टगेगिरी ते गांधीगिरी

कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीसमोर बसून आत्मक्लेश करतोय असं अजित पवारांनी सांगितलं...पण ही वेळ अजित पवारांवर का यावी..? टगेगिरीचं जाहीर समर्थन करणा-या नेत्यावर गांधीगिरी करण्याची वेळ का यावी..? अजित पवार यांनी अचानक आत्मक्लेश का करावा..? या उपोषणातून त्यांना काय संदेश द्यायचाय आणि कोणाला ? हे प्रश्न शिल्लक राहतातच...शेवटी दिवस संपताना अजित दादांचा गोतावळा जमा झालाच...आर आर पाटील, विनायक मेटेंसह त्यांचे समर्थक आणि काही आमदारांनी दादांच्या आत्मक्लेश उपोषणात हजेरी लावलीच आणि समारोप करण्याचं काम आर आर पाटलांवर सोडून दादा निघून गेले....तुम्ही कधी चुकला नाहीत का असा सवाल आर आर पाटलांनी विरोधकांना केला आणि झालं ते पुरं झालं आता थांबा असंच त्यांनी आवाहन केलं...

घसरले सगळेच मग अजित पवारच टार्गेट का ?

अजित पवार चुकले हे शंभर टक्के मान्य..बोलताना त्यांचा तोल गेला..पण आज त्यांच्यावर टीका करणा-यांचाही अनेकदा तोल गेलाय हे महाराष्ट्राला माहित नाही का..? अनेकांनी पातळी सोडलेली अनेक उदाहरणं आहेत..विनोद तावडेंसह भाजपचे जे नेते अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत..त्यांनी त्यांच्या नेत्यांचीही यापूर्वीची विधानं तपासून पहावीत..मुंबई भाजपचे अध्यक्ष राज पुरोहित ठाण्यातील एका मुलीबाबत काय बोलले होते ते त्यांनी आठावावं....नरेंद्र मोदींनी शशी थरुर यांच्या पत्नीबदद्ल काय उद्गार काढले होते हे आठवावं..उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची भाषणं आठवावी...राज ठाकरे हेसुद्धा अनेकदा खालच्या पातळीवर येऊन बोलले आहेत....

खरं तर महाराष्ट्राची ही संस्कृती नाही...बाळासाहेब ठाकरेंची एक शिवराळ भाषा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे..त्यांचाही बोलताना अनेकदा तोल गेलाच पण केवळ ठाकरी भाषा या विशेषणाखाली ते खपवलं गेलच ना...पण एवढी अधोगती कधी झाली नाही...महाराष्ट्रात सध्या राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अजित पवार हे नव्या दमाचे नेते राजकारणात सक्रीय झालेत..त्यांचा वेळोवेळी तोल गेलेला आहे.. पण अजित पवारांवर सगळेजण तुटुन पडले..कारण सध्या सगळ्यांचं टार्गेट अजित पवार हेच आहेत....2014 च्या निवडणुका नजरेसमोर ठेवून सर्वच पक्षांच्या नेत्यांनी त्यांना लगाम घालण्याचा प्रयत्न सुरु केलाय...

अजित दादा विचार करुन बोला...

अजित पवार यांची महत्वाकांक्षी काही लपून राहिलेली नाही..त्यांच्या महत्वकांक्षेला पक्षातूनही मोठा विरोध आहेच...विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांचा त्यांना विरोध आहे...तसच दादांना जेवढा लगाम घालता येईल तेवढा घालता यावा यासाठी सर्वच पक्षांचे नेते संधी साधत असतात..त्यातच मोठ्या पवार साहेबांनाही अजित पवारांना आवरताना नाकीनऊ येत आहे...पत्रकारांबाबत केलेल्या वक्तव्यावेळी मोठ्या साहेबांना मध्यस्थी करावी लागली..त्यानंतर जलसंपदा विभागाच्या घोटाळ्यात आरोप झाल्यानंतरही अजित पवारांनी अचानक राजीनामा देऊन पक्षातली ताकद अजमावण्याचा प्रयत्न केला..त्यावेळीही मोठ्या साहेबांना हस्तक्षेप करावा लागला..अजित पवारांसाठी राजीनामा देण्याची भाषा करणा-या आमदारांनाही मोठ्या साहेबांनी तंबी दिली...यावेळीही तशीच वेळ आली..मोठ्या साहेबांनी खडे बोल तर सुनावलेच पण पक्षातही आपलाच शब्द चालेल हे पुन्हा सांगितलं..आता हे प्रकरण संपेलही पण यातून अजित पवार काय बोध घेतील का..?का पुन्हा एकदा त्यांच्या बेताल बोलण्याचा उद्योग सुरुच राहणार यावरच त्यांची पुढची राजकीय वाटचाल ठरणाराय...