Sunday, December 29, 2013

शिवसेनेचा बदलता चेहरा

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेनेची नव्यानं बांधणी करत आहेत. पण त्यांना नवे-जुने, शहरी-ग्रामीण या वादाला तोंड द्यावं लागत आहे. जुन्या नेत्यांना डावलून नवं नेतृत्व आणण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न दिसतोय. मुंबईत ते शिवसेनेचा चेहरा बदलण्याचा करत आहेत. पण पक्षांतर्गत नाराजीबरोबरच उद्धव ठाकरे यांना मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेचा सामना करावा लागणार आहे. शिवसेनेत ग्रामिण शहरी नेत्यांमध्ये मोठी दरी आहे. तर कोकणात शिवसेनेला पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाहीत. त्यामुळं भाकरी फिरवताना उद्धव ठाकरेंना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.आघाडी सरकारच्या कारभाराला लोक कंटाळले असले तरी युतीला भक्कम पर्याय म्हणून लोक स्विकारतील असं चित्र दिसत नाही.      

शिवसेनेतल्या नाराजीचं लोण मराठवाड्यातही पोचलय..कल्याणचे खासदार आनंद परांजपे हे नावालाच शिवसेनेचे खासदार आहेत. ते केंव्हाच राष्ट्रवादीत गेलेत, तर मोहन रावलेही आता शिवसेनेत नाहीत. मनोहर जोशी, रामदास कदम या शिलेदारांची नाराजी उघड आहे. जोशी सरांनी उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्हं उभं केलं पण ते तग धरू शकलं नाही. जोशींनी मातोश्रीवर दंडवत घालत आपली तलवार मान्य केली..मनोहर जोशींसारख्या जुन्या जाणत्या नेत्यालाही खासदारकीच्या उमेदवारीसाठी लोंटागण घालावं लागत आहे. रावलेंनाही लोकसभेची उमेदवारी मिळत नाही असं दिसताच त्यांनी बंडाचा झेंडा फडकवला. अखेर रावलेंची हकालपट्टी झाली..उद्धव ठाकरे सध्या जुन्या नेत्यांना म्हणजेच बाळासाहेबांच्या शिलेदारांना फारसं महत्व देत नाहीत. ते सध्या नवी टीम तयार करत आहेत. कोकणात नारायण राणेंनंतर शिवसेनेला फारसा जम बसवता आलेला नाही. त्यांना शह देण्यासाठी रामदास कदम यांना पुढं करण्यात आलं पण मागच्या निवडणुकीपासून त्यांचं शिवसेनेतलं स्थान डळमळीतच आहे. त्यांच्या खेडमध्येच मनसेनं झेंडा फडकवलाय. रामदास कदम यांना मतदारसंघच नसल्यामुळं त्यांची गोची झालीय. आता विधान परिषदही मिळेल का नाही याची चिंता रामदास भाईंना सतावतेय.   
मुंबई, कोकणातील नाराजीचं लोण मराठवाड्यातही पोचलय. परभणीचे खासदार गणेश दुधगावकर हे राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. औरंगाबादमध्ये मराठवाड्याच्या लोकप्रतिनिधींचा मेळावा उद्धव ठाकरेंनी घेतला. या मेळाव्याकडे दुधगावकर फिरकलेचं नाहीत. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुरेश वरपुडकरांना धूळ चारत, दुधगावकरांनी परभणीच्या बाल्लेकिल्यावर भगवा फडकवला. परभणी मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार हमखास जिंकून येतो.1989 पासून या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकत आहे.1998 चा अपवाद वगळता हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे..पण याच परभणीच्या खासदाराला दुस-या पक्षात जाण्याचा शापही लागलेला आहे. दुधगावकर यांच्याआधी तुकाराम रेंगे पाटील आणि सुरेश जाधव या सेनेच्या खासदारांनीही नंतर शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय..औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे हे मातोश्रीच्या खास मर्जीतले असल्यामुळे त्यांचं स्थान अजूनतरी भक्कम आहे. मराठवाड्यात कन्नडचे मनसेचे आमदार शिवसेनेत आलेत तर प्रदीप जैयस्वाल हे पुन्हा शिवसेनेत परतलेत ही त्यांच्यासाठी मराठवाड्यातील जमेची बाजू म्हणता येईलं..
पश्चिम महाराष्ट्रातही शिवसेनेचा विस्तार फारसा झालेला नाही. ज्या मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे ते मतदारसंघ जरी शिवसेनेनं राखले तरी त्यांच्यासाठी खूप झालं. विदर्भाचा विचार करता तिथंही जागा वाढतील असं चित्र नाही. उद्दव ठाकरे, दिवाकर रावते यांनी विदर्भातील शेतक-यांच्या प्रश्नावर रान उठवलं होतं, मोर्चाही काढला. पण त्याचाही शिवसेनेला फारसा फायदा होईलं असं वाटत नाही. मुंबई, नाशकातलं मनसेचं आव्हान, कोकणात झालेली घसरगुंडी, मराठवाड्यातली नाराजी आणि पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं मोठं आव्हान त्यांच्यापुढं आहे. रामदास आठवलेंची युतीबरोबरची साथ आणि नरेंद्र मोदींचा करिश्मा किती चालेल यावरच युतीचं भवितव्य आहे. नाहीतर आत्ताच्या जागा टिकवणंही त्यांना कठीण जाईलं..

 

 

 

 

No comments:

Post a Comment