Monday, December 16, 2013

'झाडू'वाल्या केजरीवालांचे यश



दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीनं प्रस्थापित राजकीय पक्षांना विचार करायला लावलाय. दोन वर्षापूर्वी अण्णा हजारेंच्या आंदोलनात सक्रीय भाग घेतलेल्या अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या काही सहका-यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पार्टीला जे घवघवीत यश मिळालय. हे कोणत्याही राजकीय पक्षाला दहादा विचार करायला लावणारं आहे. दिल्लीच्या 70 जागांपैकी तब्बल 28 जागांवर केजरीवालांच्या पक्षानं विजय मिळवला..भाजपला जरी 32 जागा मिळाल्या आणि पंधरा वर्षे सत्तेत राहिलेला काँग्रेस भुईसपाट झाला..खरं तर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना आम आदमी पक्षाचे हे यश चिंतन करायला लावणार आहे. केजरीवालांच्या पक्षाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. कोणत्याही मोठ्या चळवळीचा ते भाग नाहीत. केवळ लोकपाल विधेयकासाठी अण्णांनी केलेल्या आंदोलनातून हे लोक पुढे आले आणि केवळ दोन वर्षांत त्यांनी राजकीय चित्रच बदलून टाकलं..

केजरीवाल यांनी राजकीय पक्ष स्थापन्याच्या मुद्द्यावरून अण्णांपासून फारकत घेतली. त्यानंतर त्यांनी दिल्लीतल्या मुलभूत प्रश्नांवर आंदोलनंही केली..वीजच्या भरमसाठ बिलाविरोधात त्यांनी आंदोलन केलं. महागाई कमी करावी यासाठी आवाज उठवला. याबरोबरच त्यांनी जनतेच्या मनातल्या प्रश्नांना आवाज उठवला. मध्यमवर्गीय लोकांच्या समस्यांना त्यांनी तोंड फोडलं. केजरीवाल यांच्या यशामागं जसं त्यांचा साधेपणा. थेट भिडण्याचा स्वभाव, राजकारणाचा चेहरा नसणारी सामान्य माणसं होती तसच त्यांनी सोशल मीडियाचाही भरपूर वापर करून घेतला.. निवडणुका म्हटलं की अफाट पैसा हे गणितही त्यांनी बदलून दाखवलं. लोकांकडून वर्गणी घेऊन त्यांनी निवडणूक फंड जमा केला आणि त्यावर त्यांनी निवडणूक लढवली...

केजरीवाल यांच्या पक्षानं प्रस्थापित राजकारणाचे संदर्भच बदलून टाकले.. त्यामुळे देशातल्या सर्वच पक्षांना आता विचार करावा लागणाराय. तेच ते मुद्दे, तेच तेच आरोप प्रत्यारोप, तेच ते चहरे, राजकारणातली घराणेशाही, भावनिक मुद्दे, जातीय समिकरणं यांच्यात गुरफटलेल्या राजकारणाला केजरीवाल यांनी फाटा दिला. त्यामुळंही त्यांना मोठं यश मिळालं. लोकही त्याच त्याच राजकारणाला कंटाळले.पण त्यांच्याकडे पर्यायच नाही म्हणून. त्यातलाच जो बरा त्याला मतदान केलं जायचं. पण केजरीवाल यांच्या पक्षानं मतदारांना नवा पर्याय दिला, नवी आशा दाखवली. हे त्यांच्या पक्षाच्या यशामागचं गमक म्हणता येईलं.ज्या शहरी मध्यमवर्गाला त्यांनी हा नवा पर्याय दिलाय. त्या पर्यायाच्या शोधात लोक होते पण त्यांना तो आतापर्यंत मिळत नव्हता...केजरीवाल यांचं यश नक्कीच वाखण्यासारखं आहे. पण त्यांची खरी लढाई आता सुरु झालीय. बाहेरून जाब विचारणं सोप्पं असतं पण ते पार पाडण्याची जेव्हा जबाबदारी येते तेव्हा खरा कस लागतो..आशा करूयात केजरीवाल यांना काँग्रेसनं देऊ केलेला पाठिंबा घेऊन त्यांनी सत्ता स्थापन करावी आणि त्यांनी जी आशा दाखवलीय, त्यांच्यावर ज्यांनी विश्वास टाकलाय. तो त्यांनी सार्थ करून दाखवावा..केजरीवाल यांनी हे शिवधनुष्य पेललं तर जनता विसरणार नाही पण ते ज्याप्रमाणं सत्ता स्थापन्यासाठी काँग्रेसला अटी घालत आहेत. त्यावरून ते जबाबदारीपासून पळ तर काढत नाहीत ना असंच म्हणावं लागेल..

केजरीवाल सत्ता स्थापन करो अथवा नाही पण दिल्लीच्या या विजयानं सर्वच प्रस्थापित पक्षांना चिंतन करावं लागणाराय. मध्यमवर्गावर भिस्त असणा-या भाजपला तर विचार करावाच लागणाराय. पण वर्षोनवर्षे सत्तेत राहून आपण राज्य करण्यासाठीच जन्माला आलोय अशा आर्विभावात वावणा-या काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांना या विजयाचा विचार करावा लागणाराय. नाहीतर त्यांनाही इतर राज्यातले केजरीवाल धडा शिकवतील..

   

 

1 comment: