Friday, July 27, 2012

शरद पवारांच्या नाराजीचे कारण..



राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या आठवड्यात राजकारण तापवलं..पहिल्यांदा त्यांनी कॅबिनेटला दांडी मारुन आपली नाराजी व्यक्त केली..कारण काय तर म्हणे प्रणव मुखर्जी यांच्या नंतर मंत्रिमंडळात ज्येष्ठ आपणनच असताना ए. के अँटोनी यांना दोन नंबरची जागा कशी काय दिली..त्यानंतर चार दिवसांनी पुन्हा पवारसाहेब युपीएच्या बैठकीला गेले नाहीत..त्यांचे सहकारी प्रफुल्ल पटेलही गेले नाहीत..त्यावेळी हे सर्वजन पवारांच्या दिल्लीतल्या घरीच होते आणि माध्यमातून त्यांनी युपीए  सरकारवर आपली नाराजी व्यक्त केली..त्याच दिवशी पटेलांनी पत्रकारांना सांगितले की पवारसाहेब नंबरगेमवरुन नाराज नाहीत तर युपीए सरकार असताना काँग्रेस मात्र घटक पक्षांना विचारात न घेताच सर्व निर्णय घेतं, ते आपल्याला मान्य नाही..वेळ पडली तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू..पण आमचा पाठिंबा सरकारला राहिलच...हे सांगताना पटेलसाहेबांनी महाराष्ट्रातील आघाडीचा उल्लेखही आवर्जून केला..आणि दिल्लीतला नाराजीचा सूर मग मुंबईत निघाला..राष्ट्रपती पदाची मतमोजणी सुरु असताना पवारांनी काँग्रेसवर हा दबावाचा डाव टाकला..त्यानंतर  राष्ट्रवादीची मुंबईत बैठक घेऊन राज्यातलंही सरकार काही व्यवस्थित चालत नाही असा सूर पवारांच्या साक्षीनंच लावला गेला...वेळ पडली तर राज्य मंत्रिमंडळातूनही बाहेर पडू अशी इशारा वजा धमकी देऊन टाकली...पवारांनी एकाच वेळी दिल्ली आणि मुंबईतून इशारा देऊन काँग्रेसला बुधवारची डेडलाईनही दिली...
गाठ माझ्याशी आहे

पवारांच्या या नव्या गुगलीमुळे काँग्रेस आणि पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पवारांचं महत्व मोठं आहे हे सांगितलं..त्यावेळी पवार सोनिया गांधी आणि पंतप्रधान ह्यांना भेटलेही..पण नाराजी काय दूर झाली नाही.. हे सर्व झाल्यानंतर शेवटी बुधवारी पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांच्याबरोबर पवारसाहेबांची बंद दरवाज्याआड खलबतं झाली..अर्थात समन्वय समिती स्थापन करुन दर महिन्याला त्याची बैठक घेतली जाईलं हे जाहीर करुन आम्ही आता समाधानी आहोत, तिढा सुटलेला आहे हे दोन्ही बाजूनी सांगण्यात आलं..हे एवढं रामायण पवारसाहेबांनी फक्त एका समन्वय समितीसाठी केलं असेल असं वाटत नाही..अगदी पवारांना जवळून ओळणाऱ्यांनाही हे काही पटलं नाही.. याचाच अर्थ पवार मांगे समथिंग मोअर..असाच आहे..कारण पवारसाहेबांसारखा जाणता राजा एखाद्या फुटकळ समितीसाठी असा नाराज होऊन बसणारा नेता नाही...त्यामुळे पवारांच्या नाराजीमागं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरु झालाय....
शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली त्यामागं एक कारण होतं...तारिक अन्वर यांना राज्यसभेचा उपसभापती करण्याची मागणी..पण काँग्रेसनंही त्यांची दखल घेतली नाही..तर पवारांनी सोनिया गांधी आणि पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात..राज्यपाल नियुक्त्या, विविध समित्यांवरील नियुक्त्या करताना काँग्रेसनं घटक पक्षांना विचारात घ्यावं अशी मागणी केल्याचं कळतय..हे सगळं ठिक आहे.. पण त्यासाठी अचानक नाराजी आणि सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा देण्याची गरज नव्हती...नाहीतर पवारसाहेब म्हणजे काही ममता बॅनर्जी नाहीत उठसुठं काहीही मागणी करायची आणि धमक्या इशारे द्यायचे..त्यातच पवारांचे फक्त 9 खासदार आहेत..एवढ्या छोट्या ताकदीवर पवारसाहेब मोठं धाडस करत नाहीत...मग पवारसाहेबांची नाराजी कशात आहे...
मॅडम, काय हे ?
पवारसाहेबांची नाराजी ज्यावेळी बाहेर आली.. त्याच्या दोन दिवस अगोदरच काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी आपण महत्वाची जबाबदारी स्विकारण्यास तयार असल्याचं जाहीर केलं होतं.. याचाच अर्थ 2014 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन युवराजांना पक्षात आणि सरकारमध्ये मोठी जबाबदारी दिली जाणार.. प्रवण मुखर्जी राष्ट्रपती झाल्यानंतर सेवाज्येष्ठता डावलल्याचा पवारांना राग येऊ शकतो..त्यातच राज्यातले नेते सुशिलकुमार शिंदे यांना गृहमंत्री किंवा लोकसभेचा सभागृह नेता करण्याचा काँग्रेसचा विचार आहे..शिंदे हे पवारांना ज्युनिअर आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणंही पवारांना रुचणार नाही..तर दुसरीकडं युवराज सक्रिय झाल्यानंतर पंतप्रधान आणि राहुल गांधी यांच्यात विचारविनिमय वाढणार मगं आपली ज्येष्ठता धोक्यात येऊ शकते असाही एक विचार आहे...तर लवासासारख्या प्रकल्पाला केंद्रातील काँग्रेसचे मंत्रिच खोडा घालत आहेत हेही पवारांना रुचलेलं नाही..हे झालं दिल्लीतलं....
राज्यातही पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यापासून राष्ट्रवादीची गोची झालीय..महत्वाची सर्व खाती राष्ट्रवादी कडे आहेत तरीही निर्णय प्रक्रियेत मुख्यमंत्री खूपच वेळ घेतात हा त्यांचा आक्षेप आहे..काँग्रेस पक्षातले अनेक आमदारही मुख्यमंत्र्यांच्या या निर्णय न घेण्याच्या भूमिकेवर नाराज आहेत..तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या जलसंपदा विभागाच्या मागे मुख्यमंत्री हात धूवून  लागलेत.. जलसंपदा विभागावर 70 हजार कोटी खर्च झाले पण सिंचन फक्त 1 टक्काही नाही यावरुन हा पैसा कुठं मुरला यासाठी श्वेतपत्रिका काढण्याचा मुख्यमंत्र्यांनी चंगच बांधलाय..तर मंत्रालयासह त्या परिसरात असलेले मंत्र्यांचे बंगले यांचा मेकओव्हर करण्याचा भुजबळांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे..त्यालाही मुख्यमंत्र्यांनी विरोध केलाय..हे सर्व होत असताना  पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे टीका केलीय..त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण नको, त्यांना हाकला असाच सुर राष्ट्रवादीतून निघत आहे तर दुसरीकडं काँग्रेसमध्येही मुख्यमंत्री चव्हाणांबदद्ल मोठी नाराजी आहे..तीसुद्धी बाहेर आलीच आहे.त्यातच आदर्श प्रकरणी काँग्रेसचे तीन माजी मुख्यमंत्री अडचणणित आहेत..या सर्व पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री हटाव हाच विचार असण्याची एक शक्यता आहे..तर राहुल गांधींच्या सक्रिय होण्याचाही दुसरा मुद्दा असू शकतो.. त्यामुळे पवारांनी वेळीच फासे टाकलेलं आहेत..बंद दरवाज्याआड काय चर्चा झाली हे समजणं सध्यातरी शक्य नसलं तरी पवारांनी टाकलेले फासे त्यांना फायद्याचे ठरतात, का काँग्रेस हेच फासे पवारांवर उलटवतात ह्यासाठी दोन तीन महिन्यांचा कालावधी तरी जाऊ द्यावा लागेल.त्यानंतर पवारसाहेबांच्या नाराजीमागं काय दडलंय हे होणाऱ्या राजकीय फेरबदलानंतर कळू शकेल..  

Monday, July 23, 2012

ये रे ये रे पावसा...


पाऊस म्हटलं की सर्वांच्या मनात कल्पनांचं मोहोळ उभं राहतं..विशेषतः एप्रिल - मे महिन्यात जेव्हा पारा 40 च्या वर जातो तेव्हा सर्वांनाच कधी एकदाचा हा ऊन्हाळा जातो आणि जून महिना उजाडतो असं वाटतं...जून महिना आला की मान्सून बरसेल आणि अंगाची लाही लाही करणारा ऊन्हाळा एकदाचा जाईलं म्हणून सर्व जण त्या पावसाकडे डोळे लावून बसतात.पाऊस सर्वांनाच हवा वाटतो..शहरी असो वा निमशहरी कडक उन्हापासून सुटका हवी असते सर्वांनाच... पाण्याची समस्या तर हल्ली सगळीकडेच आहेत. ती सुटावी म्हणून पावसाची वाट पाहिली जाते..तर शेतकरी शेती आणि जनावरांच्या चारा-पाण्यासाठी त्याची आतुरतेनं वाट पहात असतो..ज्या पावसाची सर्वच जण आतुरतेने वाट पहात असतात त्याच्या पाठीमागची सर्वाची कारणं आणि कल्पना वेगवेगळ्या असतात. पण पाऊस सर्वाना हवा असतो हे मात्र नक्की.. सर्वांना हवा हवासा वाटतो तो पाऊस हलक्या मध्यम रिमझीम सरींचा पाऊस.. सर्वांच्याच मनाला स्पर्श करुन जाणारा तो पाऊस....तर धो धो कोसळणारा पाऊस वेगळाच..हा पाऊस कधी रोमँटीक असतो तर कधी विध्वंसक ठरतो...ज्या पावसाची आपण आतुरतेनं वाट पहात असतो तो जर कोसळायला लागला तर सर्वांची पुरती वाट लावते..मग वाटते पुरे झालं आता....हल्ली तर शहरांची पुरती वाटच लावतो हा पाऊस...शहरातले रस्ते पण थोडासा पाऊस झाला तरी सापडत नाहीत..अनेक भागात पाणीच पाणी..रस्ताच सापडत नाही...तर घरं कोसळून जीवित हानी करतो तो वेगळच...त्यातून त्या पावसाची तीव्रता लक्षात येते आणि वाटतं..नको हा जीवघेणा पाऊस आता....आठवून पहा 26 जुलैची मुंबई...कीती भयानक असू शकतो पाऊस, त्याची शहरातल्या लोकांना आलेली ती मोठी प्रचिती असावी... हे झालं रौद्र रुपातल्या पावसाबद्दल...
..पण जो सर्वांना हवा हवा वाटतो तो हलका पाऊस पडायला लागला की सर्वाना आठवते गरमा गरम भज्जी आणि वाफाळलेला चहाचा कप....पावसाच्या हलक्या सरी कोसळत असताना.. घराच्या गॅलरीत किंवा खिडकीत बसून गरम भज्जी आणि वाफाळलेल्या चहाची लज्जत काही औरच....! त्याची मजा शहरातल्या आपल्या सर्वांनाचा हवी हवीशी वाटणारी आहे..आणि हा पाऊस जर रात्रीच्या वेळचा असेल तर...? हातात एक व्हिस्कीचा किंवा रमचा पेग, मंद हवा आणि हलका हलका पेग....व्वा क्या बात है.. ! साधनेला यापेक्षा आणखी कोणता माहौल चांगला असेल...! नुसती कल्पना जरी केली तरी अनेकांची विमानं  लगेच आकाशात झेपवतात.. असो, कल्पना छान आहे...!!! तर मुंबईच्या नरीमन पॉईंट किंवा तशाच काही स्पॉटवर रिमझीम पावसात भिजण्याची मजाही काही औरच नाही का...? आणि समजा कोणत्याही शहरातल्या काही विशिष्ट स्पॉटवर असा पाऊस पडताना एखादी मैत्रीण बरोबर असेल तर....! आठवा आठवा..!!! एका पावसात दोघांनी भिजण्याचा अनुभव काही धम्मालच नाही का... ? एकाच छोट्या छत्रीत न मावणारे दोघेजण...! आतून बाहेरुन ओलंचिंब झाल्याचा अनुभव येतो ना... ? मग छत्रीही नको वाटते...नकळत हातात हात घेऊन जुळलेल्या त्या रेशिमगाठी ...! अनेकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे...

पावसातील मस्तीच्या मुड
आज कदाचित तसाच पाऊस पडत असताना त्या आठवणी जाग्या होतीलही...! असा हा रोमँटीक पाऊस कोणाला नको आहे...! काहींच्या मनाला भरती येऊन छान छान कविताही याच पावसात सुचतात...! पावसाची चाहूल जरी लागली तरी मोर जसा पिसारा फुलवून नाचायला लागतो... तशी सगळ्यांची मनं डोलायला लागतात....भूतकाळातल्या त्या आठवणी आठवल्या तर घरात किंवा ऑफीसात असतानाही नुसत्या आठवणींनीच ओलेचिंब भिजल्या सारखं होतं ना...!! आणि ज्यांची मनं आणि ह्रदय ह्याच पावसानं तोडली असतील... ते "बघ माझी आठवणं येते का..?"  म्हणत बसतील....कारण काहीही असो..पाऊस सर्वानाच हवा हवासा वाटतो...
रोमँटीक पाऊस...
..मनाला स्पर्शून जाणाऱ्या या पावसात भिजण्याचा आनंद काही वेगळाच...बच्चे कंपनींची मजा तर वेगळीच..! लहानपणी पावसात भिजताना किती धम्माल यायची..! पावसाच्या साचलेल्या पाण्यातून समोरच्याच्या अंगावर फुटबॉलची किक मारावी तशी त्या पाण्य़ात मारुन कसं भिजवलं..त्याची गम्मत काही न्यारीच ..!! पावसाच्या पाण्यात कागदीची नाव करुन सोडण्याचा मोह कोणाला झाला नसेल...? पावसात भिजणं , राडा करणं ( हा राडा शिवसेनेचा नाही बरं का..हा आपला लहानपणीचा राडा.. ) ही लहान मुलांची नैसर्गिक खोडकर वृत्ती.. त्यावेळी आई बाबा ओरडायचे.. पावसात भिजू नको..सर्दी होईलं...? तेव्हा कोणाचीच मम्मी "दाग अच्छे होते हैं "...असं म्हणत नव्हती....मात्र आई बाबाचं नाही ऐकलं तर मोठा धपाटा मात्र बसायचा.. ! किती आठवणी त्या पावसाच्या..!!! आमचं घर गावात होतं...थोडा मोठा पाऊस झाला की.. घराला गळती लागायची..रात्रीच्यावेळी तर खूपच राग यायचा त्या पावसाचा..घर सगळीकडूनच टप टप गळतय...झोपायलाही जागा नसायची..कुठं कुठं म्हणून भांडी ठेवून  गळतीचं पाणी थोपवायचं....त्यावेळी पावसाचा राग यायचा आणि आपल्या गळक्या घराचाही... पण पत्र्याच्या घरात जर पाऊस पडताना झोपलात तर त्याचा जो काही आवाज होतो ना तो मात्र वेगळीच धम्माल बरकं...अर्थात...घरात एकटेच असताना..लाईट गेलेली असेल तर मात्र कधी कधी त्याच पावसाच्या आवजाची भितीही वाटायची..असा हा पाऊस किती किती आठवाव्या त्याच्या आठवणी.....
पावसात मस्ती करणारी मुलं..
...पण यापेक्षा पावसाची सर्वात जास्त गरज ज्याला असते..जो पावसाच्या आशेनं आभाळाकडे डोळे लावून बसलेला असतो तो आमचा शेतकरी, हाच खऱा त्या पावसाचा हक्कदार आहे.. जमीन तापलेली आहे...प्यायला पाणी नाही..जनावराला चारा नाही...पेरणीचे दिवस आलेत..पण पावसाचा काही पत्ता नाही..बिच्चारा शेत नांगरुन पावसाची वाट पहात बसतो...पण कधी वेळेवर येईल तर तो पाऊस कसला..? जूनच्या पहिल्या आठवड्यात मिरगाचा पाऊस पडल म्हणून तो आभाळाकडे डोळं लावून बसतो पण तो कसला येतोय..मृग गेला..दुसर नक्षत्र गेलं तरी पाऊस काही येत नाही..त्याची चिंता वाढतच जाते...आता तर पेरणी करा पावसाची वाट बघा..नाहीच आला तर दुबार पेरणीचं संकट आ वासून बसलेलंच..! जनावरं सांभाळणंही अवघड होऊन बसलय...वेळेवर पाऊस येत नाही म्हणून हंगाम वाया जाण्याची शेतकऱ्याला चिंता असते आणि जेव्हा येतो तेव्हा ऊभ्या पिकाची वाट लावून जातो..शेतीचा बांध फोडून सगळं नुकसान करुन जातो..तरीही आमचा शेतकरी कधी त्यावर रागावत नाही..कारण पाणी हवय...मग ते कसंही येवो..मोठा पाऊस झाला...बांध फुटून पिक वाया गेलं..एखादा हंगाम वाया गेला तरी पाणी तर मिळेल ना या आशेवर तो जगतो...पाऊस हवाच आहे मग तो कोणत्याही रुपात येवो...रोमँटीक भासनारा असो वा सरीवर सरी कोसळणारा असो..पूर येऊन नुकसान करणारा असो ..पाऊस हवाच आहे..मोठा पाऊस होऊ दे...अगदी ओला दुष्काळ पडला तरी चालेल..आमच्या भूमातेची तहान भागवेल एवढा मोठा पाऊस पडू दे...जमीनीची तहान भागली तरच शेती फुलेलं..धरणात पाणी साचेल...पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल..शेतीची, जनावरांची चिंता मिटेल...शेतातली पिकंही डौलानं ऊभी राहतील..कृषी उत्पन्न वाढेल...अन्नधान्याची चिंता राहणार नाही...पण त्यासाठी हवा आहे तो पाऊस..मग तो कसाही येवो धो धो अथवा रिमझीम...जमिनीची तहान भागेपर्यंत पावसाची गरज आहे..तो भरपूर यावा आणि शेतकऱ्याची चिंता मिटावी..त्यातच त्याचं आणि आपलं भलं आहे...म्हणून तर म्हणतात ....ये रे ये रे पावसा....   








Friday, July 20, 2012

राजेश खन्ना- पहिला सुपरस्टार


राजेश खन्ना हा हिंदी चित्रपटसृष्टीतला पहिला सुपरस्टार , पहिला रोमँटिक हिरो, ज्यानं सलग 15 सोलो हिट दिले , तो महान अभिनेता बुधवारी हे जग सोडून गेला. वयाच्या 69 वर्षीच त्यानं या जगातून एक्झीट घेतली. राजेश खन्नानं 1970 चं दशक गाजवलं. तो खऱ्या अर्थानं सुपरस्टार होता. त्यानं पहिला चित्रपट केला तो आखिरी खत पण तो खरा स्टार झाला तो आराधना चित्रपटापासून..शर्मिला टागोर बरोबरच्या आराधनामधली गाणी खूपच गाजली. मेरे सपनो रानी की कब आयेगी तू...या गाण्यानं त्यावेळच्या तरुण पिढीला भुरळ घातली होती.. तर तरुणींच्याही सपनों का सौदागर झाला...आराधना नंतर राजेश खन्नानं 15 सलग हिट दिले. त्यातूनच तो सुपरस्टार जन्माला आला...आराधना, कटी पतंग, अमर प्रेम, हाथी मेरे साथी, नमक हराम, हम दोनो, आनंद ..एक ना दोन अनेक चित्रपटांनी इतिहास रचला...

राजेश खन्नाचा उल्लेख येताच सर्वात आधी नावं येतं ते आनंद या चित्रपटाचं, या चित्रपटात त्यावेळी नवखा असलेला अमिताभ बच्चन राजेश खन्नाच्या समोर होता..खूप गाजला तो चित्रपट. खऱं तर याच चित्रपटानं अमिताभलाही एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवलं..आनंद चिॆत्रपटाची कथा, त्यातला राजेशचा मृत्यु आणि सदाबहार गाण्यानं चित्रपट त्यावेळी गाजला तसाच तो आजही पुन्हा पुन्हा पहावा असाच आहे. त्यातला बाशू मोशाय आजही लोकांना आठवतो..
राजेश खन्नाच्या चित्रपटाच्या यशात गाण्यांचाही मोठा हात आहे..राजेश खन्ना किशोरकुमार आणि आर डी बर्मन या त्रिकुटानं एकसे बढकर एक हिट गाणी दिलीत..मेरे सपनोंकी रानी, रुप तेरा मस्ताना, कुछ तो लोग कहेंगे, ये शाम मस्तानी, ये क्या हुआ, चिंगारी कोई भडकी, जय जय शिवशंकर, ओ मेरे दिल के चैन, ये जो मोहब्बत है, ही आणि यासारखी अनेक गाणी या चित्रकुटानं दिलीत जी ऑल टाईम हिट आहेत..आजही यातली अनेक गाणी गुणगुणावी वाटतात... राजेश खन्ना आणि किशोर कुमार यांचा आवाज हे जणू समिकरणच बनलं होतं...ही गाणी जशी हिट झालीत तशीच आन मिलो सजना या चित्रपटातील गाण्यांनीही धुमाकुळ घातला होता. अच्छा तो हम चलते है हे गाणही त्यापैकीच एक..निर्माते ओमप्रकाश यांनी गितकार आनंद बक्षी आणि संगितकार लक्ष्मिकांत यांना आणखी एक रोमँटीक गाणं तयार  करण्यास सांगितलं..पण आनंद बक्षी यांनी 20-25 गितांचे बोल लिहिले पण ओमप्रकाश यांना हवं असलेलं रोमँटीक गाणं काही तयार होतं नव्हतं...10 तास मेहनत करुनही गाण्याचे बोल काही  पसंत पडत नव्हते . त्यावेळी आनंद बक्षी जायला निघाले आणि म्हणाले अच्छा तो हम चलते हैं...त्यावर लक्ष्मिकांत यांनी म्हटलं फिर कब मिलोगे...आणि यातून आनंद बक्षी यांना गितांचे बोल मिळाले आणि पुढच्या 25 मिनीटात ते गाणं तयार झालं...ज्या गाण्यानं सुद्धा इतिहास रचला..अशी एक ना दोन अनेक गाणी होती राजेश खन्ना यांच्या चित्रपटात ज्यांनी त्यांना सुपरस्टार पदापर्यंत पोचण्यास मोलाचा हात दिला...

राजेश खन्ना रोमँटिक हिरोच, पण त्याच्या भूमिका तशा इमोशनल होत्या..राजेश खन्ना सुद्धा आपली इमेज ही इमोशनल हिरोची आहे अॅक्शन हिरोची नाही असंच म्हणत होता. राजेश खन्ना हा सर्वार्थानं सुपरस्टार सारखंच जगला..पण त्याची जादू ओसरली तेव्हांही तो त्याच तोऱ्यात वावरत होता. राजेश खन्नाची जागा अमिताभ बच्चननं घेतली, दोघांच्या अभिनयाचा बाज वेगवेगळा आहे..तरिही नमक हराक नंतर अमिताभ राजेश खन्नाला भारी पडतोय हे स्पष्ट झालं. ते राजेश खन्नानं खाजगीत मान्यही केल्याचं चित्रपटसृष्टीतले राजेशच्या जवळचे पत्रकारही सांगतात..पण मी परत येत आहे असा तो नेहमी म्हणायचा..आणि त्यानंतर अवतार, सौतन सारखे हिट त्यानं दिलेही..पण तो काळ अँग्री यंग मॅन अमिताभचा होता..त्यामुळे पुढे राजेश खन्नाची जादू फारशी चालली नाही..त्यानंतर राजेश खन्ना राजकारणात आला..त्यानं दिल्लीतून लालकृष्ण अडवाणी यांच्याविरोधात  निवडणूक लढवली होती...या निवडणुकीत अडवाणी जिंकले पण त्यांना हा विजय मिळवणं कठीण झालं होतं..अडवाणी फक्त दिड हजार मतांनी जिंकले होते...जर ते हरले असते तर राजेश खन्नाही जायंट किलरच्या पंक्तित बसला असता..तसा त्यानं हा पराभवही स्विकारला नाही..त्यानंतर तो खासदार म्हणून 1991 ते 1996 पर्यंत राजकारण होता..त्यानंतर तो निवडणुक प्रचारात सक्रीय भाग घेत होता..

राजेश खन्नासाठी त्याचे चाहते जीव ओतायचे, त्याला खूप मोठे चाहते लाभले होते. तरुण मुली तर त्याच्यासाठी वेड्या व्हायच्या..राजेश खन्ना सतत चाहत्यांच्या गराड्यात अडकलेला अभिनेता होता...तो आपल्या चाहत्यांनाच सर्व काही मानत असं..व्ययक्तित आयुष्यातही तो ऐटीत आणि रुबाबातच राहिला..पण डिंपलबरोबरचं त्याचं लग्न फार वर्ष टीकलं नाही..आठ वर्षानंतर दोघे वेगेळे झाले पण शेवटपर्यंत त्यांनी घटस्फोट घेतला नाही....आयुष्याच्या संध्याकाळी त्याला एकटेपणा जाणवत होता..पण शेवटचे काही दिवस डिंपल, दोन्ही मुली आणि जावई अभिनेता अक्षयकुमार त्याच्याबरोबर असायचे...त्यानं शेवटी एका जाहिरातीसाठी काम केलं. मरण्यापूर्वी शूट करण्यात आलेली त्याची एका पंख्याची जाहिरातही खूपच वास्तविक झाली होती...मेरे फॅन हमेशा मेरेही रहेंगे म्हणतच राजेश खन्नानं या जगाचा निरोप घेतला..

Monday, July 9, 2012

२५ ऑगस्ट २००७ आणि गोकुळ चाट...


हैदराबादमध्ये जागोजागी छोट्या मोठ्या गाड्यांवर भेळपूरी, शेवपुरी, पॅटीस, पाणीपुरी मिळेतच..पण अनेक गाड्यांवर तेलुगु चव जास्त जाणवते. म्हणजे प्रत्येक पदार्थाला एक वेगळी चव असते तशी ती जाणवत नाही. त्यातच चाट आणि पाणीपुरी म्हटल्यावर जो काही चवीचा मुद्दा येतो तो वेगळाच असतो..त्यामुळे अनेकदा या चाटची फारशी मजा नाही येत...अलिकडे काही उत्तर भारतीय लोक पाणीपुरी बनवतात ती त्यातल्या त्यात चांगली वाटते.. पण बाकी सर्सास बेचवच असते. भेळ किंवा ओली भेळ, मिसळ ..छोट्या मिरचीची भजी किंवा कांदा भजी ही एकतर मिळत नाहीत आणि मिळाली तर आपल्याला आवश्यक ती चव मिळत नाही..बटाटे वडा म्हटल्यावर तर तोंडाला पाणी सुटणार नाही असा मराठी माणूस शोधून सापडणार नाही..पण हैदराबादमधले हे लोक ते कशापासून बनवतात माहित नाही पण चवीच्या बाबतीत मात्र एकदमच फालतु म्हणावं असाच तो प्रकार आहे. मी तर काही पदर्थांची मुळ चवच विसरून गेलोय. या सर्वांवर एक उपाय म्हणजे हैदराबादमध्ये कोटी भागात गोकुळ चाट हे हॉटेल आहे..इथं मिळणारे सर्वच पदार्थ खुपच चविष्ट असतात..अगदी दहीपुरी, रगडा पॅटीस किंवा मिसळ प्रत्येक पदार्थाला एक छान चव आहे..त्यामुळे या गोकुळमध्ये संध्याकाळी एखाद्या पदार्थावर ताव मारण्याची इच्छा होतेच..पण या गोकुळमध्ये काही खायचं म्हणजे मोठं दिव्यच असतं..गर्दी एवढी प्रचंड असते की त्यातून वाट काढत जायचं , आपली आर्डर द्याचयी आणि पाच सात मिनीटात त्या गरम प्लेट घेऊन त्याच गर्दीतूनच बाहेर पडण्याचं दिव्य करावं लागतं.. पण आपल्याला हवा असलेला पदार्थ खाताना ते दिव्य फारसं कठीण वाटत नाही..



गोकुळमध्ये नेहमी जायचा योग काही येत नाही..त्यातच आम्ही कोटीपासून फारच दूर राहत असल्यामुळे केवळ चाट खाण्यासाठी हैदराबादच्या ट्रॅफिकमधून वाट काढत जाणं सोप नाही.. त्यातच वेळे अभावीही तिकडं फारसं जाणं होत नाही..पण पूर्वी जेव्हा हैदराबादमध्ये नवीन आलेलो होतो तेव्हा आठवड्यातून एखादी चक्कर त्या भागात व्हायचीच..मग काय थोडंफार भडकणं झाल्यानंतर गोकुळला भेट ही आलीच..त्यामुळे या गोकुळशी थोडं जिव्हाळ्याचं नातं जडलय...पण मागच्या काही वर्षात तिथं जाण्यात खंड पडला होता..पण मागच्याच आठवड्यात त्या गोकुळमध्ये जाण्याचा योग पुन्हा आला..हो योगच म्हणायचं..माझ्या दोन सहका-यांबरोबर आम्ही अबीट्सला थोडी शॉपींग केली आणि नंतर गोकुळला जाण्याचा बेत ठरला.. ठरल्याप्रमाणं आम्ही तीघेजण गोकुळला गेलो..अबीट्स ते कोटीचे गोकुळ हा जेमतेच पाच मिनीटाचा बसचा प्रवास पार करायला आम्हाला तब्बल अर्धातास लागला...तेवढा टॅफिकचा त्रास संपवून आम्ही एकदाचे गोकुळमध्ये आलो. नेहमीप्रमाणं गर्दी होतीच..आम्ही तिघांच्या तीन वेगवेगळ्या आर्डर देऊन त्या येण्याची वाट पहात होतो.. शेवटी गर्दीतून आपली गरम प्लेट घेऊन आम्ही तिघांनी चांगलाच ताव मारला..खरं तर आणखी एक एक प्लेट घ्यायचा विचार होता..पण गर्दीचा अंदाज घेऊन आम्ही बाहेर पडलो...


गोकुळमध्ये आम्ही पंधरा वीस मिनीटीचं होतो...त्या पंधरा वीस मिनिटीत रगडा पॅटीस आणि दहीपुरीवर ताव मारताना माझं मन मात्र त्याचा आस्वाद घेताना वेगळात विचार करत होतं..याच गोकुळमध्ये आमच्यासारखे लोक दररोज गर्दी करतात. नेहमीच्या चवीत थोडा बदल करण्यासाठी लोक इथं येतात.. गर्दीतच एखाद्या विशेष प्लेटवर ताव मारत असतात...अशाच एका दिवशी म्हणजे २५ ऑगस्ट २००७ ला या गोकुळमध्ये अघटीत घडलं.....अनेकजण याच गर्दीत आपली ऑर्डर घेण्यात मग्न होते तर काही जण आपली प्लेच फस्त करण्यात मग्न होते...लहान थोर, मुलं-मुली आपापल्या विश्वात मग्न होते आणि त्याचवेळी गोकुळमध्ये मोठा स्फोट झाला.....कुणाला काही कळायच्या आताच सगळं चित्र बदलेलं होतं..सगळीकडे गोंधळ, आरडाओरड आणि रक्ताचा सडा सांडलेला होता..लोकांची बाहेर पडण्याची घाई होती तर काही जण मदतीसाठी याचना करत होते...गोकुळमध्ये ज्या गर्दीत हा सर्व पदार्थ बनवण्याचा आणि तिथंच खाण्याचा दररोजचा नित्यक्रम होता तिथं गॅस सिलेंडरवर कोण्या हरामखोरानं एका पिशवीत बॉम्ब ठेवला होता...आणि अपेक्षीत वेळी त्यांनी त्याचा स्फोट घडवून आणला होता..त्यात जवळपास २०-२५ लोकांचा बळी गेला तर काहीजण जखमी झाले..स्फोट एवढा भयानक होता की काही लोकांचे पाय तुटले. काहींचे हात तुटले... काहीजण भाजून काळे ठीक्कर पडले होते.. त्यावेळी मी माझ्या ऑफीसमध्ये रात्रीचं बातमीपत्र बनवण्यात व्यस्त होतो.. त्या घटनेची व्हिज्युअल्स पाहिल्यानंतर मला त्या गोकुळचा तिटकारा आला..गोकुळमध्ये लोक जिभेचे थोडे लाड पुरवायला जातात..त्यात त्यांची काहीही चूक नसताना त्यांना प्राण गमवावे लागले...पण काही हरामखोर लोक सामान्य लोकांचं जगणं कठीण करण्यातच धन्यता मानतात...मी ज्या दिलसुखनगरमध्ये रहात होतो. तिथचं शेजा-याचा एकुलता एक मुलगाही त्याच स्फोटात गेला...इंजिनिअरिंग करणारा तो मुलगा कॉलेजमधून येताना मित्रांबरोबर गोकुळमध्ये असाच एखाद्या प्लेटवर ताव मारण्यासाठी गेला तो पुन्हा परत आलाच नाही.. ह्या घटनांवर भरपूर लिहता येण्यासारखं आहे..आज खाण्याचा विषय होता. त्याचा उल्लेख होता म्हणून त्या संदर्भानं ह्या दुर्घटनेचा उल्लेख केला..कारण मी दहीपुरी संपवत असताना माझ्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा ते चित्र दिसत होतं..आणि आज पुन्हा तसा प्रसंग आला तर...अशा भितीनं मीसुद्धा थंड झालो होतो....नेहमीप्रमाणं मला आता त्या गोकुळच्या कोणत्याच पदार्थाटी चव लागत नाही.. सर्व कसं बेचव वाटतय...त्या जागेवर पाय ठेवताच कुठं बॉम्ब तर ठेवलेला नाही ना अशी शंका येते.. खातानासुद्धा आजूबाजूला तेचं भयान दृष्य आठवण करुन देत होतं....

गोकुळ चाटचा तो प्रसंग आठवला की आजही अंगावर शहारे येतात..जे गोकुळ त्याच्या चवीसाठी प्रसिद्ध होतं.. त्यांनं २०-२५ लोकांचा बळी घेतला...तिथली चव आजही बदललेली नाही..पण मला मात्र त्या चवीत फरक पडलाय असचं वाटतय.. का कोण जाणं त्या गोकुळमध्ये गेल्यानंतर मस्त ताव मारण्याचं मनच होत नाही....


Thursday, July 5, 2012

आंध्र प्रदेशातून काँग्रेस संपली..


आंध्र प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका या २०१४ मध्ये होत आहेत पण त्या निवडणुकीचा निकाल हा आत्ताच लागलाय. राज्यात सध्या काँग्रेस पक्षाचं सरकार आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांनी काँग्रेसला सलग दोनवेळा सत्तेत आणलं पण त्यांच्या अपघाती निधानानंतर आंध्रातलं राजकारण पूर्णपणे बदललय. वायएसआर यांचा मुलगा जगनमोहन रेड्डी यांनी वडलांच्या निधनानंतर आपल्याला मुख्यमंत्री करावं अशी मागणी केली होती पण ती काँग्रेसनं मान्य केली नाही शेवटी याच जगनमोहन रेड्डींनी स्वताचा वेगळा पक्ष स्थापन केलाय आणि हा पक्षच काँग्रेसची सत्ता घालवणार हे जवळजवळ पक्कं आहे. जगनममोहन यांच्या पक्षाचं उघड उघड समर्थन करणा-या आमदारांची संख्याही जास्त आहे. त्याचाच एक दणका जगनमोहन रेड्डींनी काँग्रेसला दिलाय. जगन यांचे समर्थन करणा-या १६ आमदारांना काँग्रेसनं निलंबित केलं होतं. त्यामुळे आंध्रात पोटनिवडणुक झाली. विधानसभेच्या एकूण १८ जागा तर लोकसभेच्या एका जागेसाठी ही निवडणूक झाली. त्यात विधानसभेच्या १५ आणि लोकसभेची जागा जिंकून जगनमोहन यांनी काँग्रेसचा पत्ता साफ केला. ही काँग्रेससाठी मोठी चिंतेची बाब आहे. या पोटनिवडणुकीनं जगनमोहन यांनी काँग्रेसचं आगामी विधानसभा निवडणुकीत काय होणाराय हे आत्ताच दाखवून दिलय. तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या तेलुगु देसमचंही काही खरं नाही..त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दक्षिणेतला बालेकिल्ला ढासळलाय हे नक्की..

खरं तर या पोटनिवडणुकीचा प्रचार सुरु असतानाच जगनमोहन रेड्डी यांना सीबीआयनं अटक केली. अवैघ संपत्तीच्या प्रकरणात सीबीआय चौकशीचा ससेमिरा जगन यांच्यामागे लावून देण्यात आलाय. त्यात जगन यांच्या खास जवळच्या काही सहका-यांना तर काही सनदी अधिका-यांनाही सीबीआयनं अटक केलीय. पण जगन यांच्या अटकेचं टायमिंग मात्र सर्वांनाच खटकतय. पोटनिवडणुकीचा प्रचार सुरु असतानाच जगन यांना अटक करुन त्यांचा बिमोड करायचा हा काँग्रेसचा डाव होता. सीबीआयचा राजकीय वापर करण्यात काँग्रेसचे सत्ताधारी तरबेज आहेत हे सांगायला आता कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. पण जगन मोहन रेड्डींना थोपवण्यासाठी काँग्रेसनं टाकलेला सीबीआयचा फास उलटा पडला आणि जगनच्या अनुपस्थीतीत त्यांची आई आणि बहिण यांनी झंझावाती प्रचार केला. जगन मोहन यांना राजकीय द्वेषातून फसवल्याचा आरोप त्यांनी प्रचार सभांतून केला. तसच दिवंगत मुख्यमंत्री वायएसआर यांनी गरिब आणि आदिवासींसाठी सुरु केलेल्या योजना जगन मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा सुरु केल्या जातील असं आश्वासन देण्यात आलाय..जगन तुमचा भावी मुख्यमंत्री आहे असा प्रचारही केला गेला त्याला लोकांनी जोरदार साथ दिली..

वाय एस राजशेखर रेड्डी यांची जनसामान्यात स्वच्छ प्रतिमा होती. दलित, ख्रिश्चन आणि मागास जातींमध्ये त्यांचा जनाधार मोठा होता. त्याची सहानुभूती जगन यांना मिळाली. तसच आंध्रातला रेड्डी समाजही जगन यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला. हेच चित्र पुढही कायम राहणाराय. भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात डांबलेल्या जगन यांना त्यांच्या अटकेचा फायदाही झालाय. आत्ता फक्त जगन यांना जामीन मिळण्याचा अवकाश..आंध्रात एखादा राजकीय भूंकप होण्याची शक्यताय. किरण रेड्डी यांचं सरकार काठावरचं बहुमत घेऊन सत्तेत आहे. त्यामुळे आणखी १५-२० आमदारांनी जगन कॅम्पमध्ये उडी मारल्यास काँग्रेसचं सरकार राहणार नाही..हे आजचं चित्र आहे. त्यामुळे काँग्रेस आणि तेलुगु देसम यांना आत्ता धडकी भरलीय.

आंध्र प्रदेशातून काँग्रेसची सत्ता गेल्यास लोकसभा निवडणुकीतही त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे आधीच चारी बाजूंनी घेरलेल्या काँग्रेसपुढं जगन मोहन रेड्डींनी मोठं आव्हान उभं केलय. हे आव्हान मोडून काढण्याची धमक आंध्रातल्या काँग्रेस नेतृत्वाकडे नाही..तर तेलंगणाच्या मुद्द्यावरची चालढकलही काँग्रेसला महागात पडणाराय. त्यामुळे आंध्र प्रदेशातून काँग्रेसचं उच्चाटन झालेलं आहे ही मी आत्ताच सांगतो...