Thursday, March 29, 2012

नक्षलवाद- एक मोठं आव्हान



नक्षलवाद्यांनी मंगळवारी गडचिरोली जिल्ह्यात भूसुरुंगाचा स्फोट घडवून CRPF च्या १२ जवानांचा बळी घेतला. ज्या दिवशी हा स्फोट घडवून आणला त्या दिवशी CRPF चे महासंचालक विजयकुमार हे स्वतः गडचिरोलीत होते. तर दोन दिवस अगोदरच केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश हे गडचिरोली जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौ-यावर होते.त्यानंतर त्यांनी हा गेम केला..खरं तर जयराम रमेश हे केंद्रीय मंत्री दौरा संपवून जाताच आणि CRPF चे महासंचालक गडचिरोलीत असताना हा घातपात घडवून आणणं हा काही योगायोग नाही. नक्षलवाद्यांनी पूर्वनियोजीतपणे घडवून आणलेला हा घातपात आहे. हा घातपात घडवून आणून नक्षलवाद्यांनी सुरक्षा यंत्रणा आणि सरकार यांना एकप्रकारे आव्हानच दिलय.

गडचिरोलीत हा घातपात घडवून आणला तेव्हा दुस-या बाजूला ओडीशात याच नक्षलवाद्यांनी दोन इटालियन पर्यटकांचं अपहरण केलं. त्यांच्या सुटकेसाठी राज्य सरकार प्रयत्न करत असतानाच नक्षलवाद्यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचच अपहरण केलं. यातूनही त्यांनी राज्य सरकारला आव्हान दिलय. या दोन घटना ताज्या आहेत. त्यापूर्वी नक्षलवादी शांत होते असं नाही. अधूनमधून ते त्यांच्या कारवाया करतच होते. त्यामुळे हे आव्हान मोडीत काढणं हे सरकार आणि पर्यायानं सुरक्षा यंत्रणांना आव्हान आहे.


नक्षलवाद हा भारतातल्या अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका आहे. आंध्र प्रदेश, ओडीशा, छत्तिसगड, पश्चिम बंगाल या राज्यासह महाराष्ट्राच्या गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि जंगल संपत्ती असलेल्या भागात या नक्षल्यांचा मोठा प्रभाव आहे. अंतर्गत सुरक्षेला असलेला हा धोका गंभीर असल्याचं पंतप्रधानांनीही मान्य केलय. असं असतानाही या नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यात सरकार आणि सुरक्षा यंत्रणा यांना अजूनही मोठं यश आलेलं नाही..नक्षलवाद ही सामाजिक आणि आर्थिक समस्या आहे असंही म्हटलं जातय. त्यामुळे बंदुकीच्या गोळीला गोळीनंच उत्तर देण्याबाबतही मतभेद आहेत. मुळात नक्षलवाद्यांचा जोर अशा भागात जास्त आहे ज्या ठिकाणी सरकारी योजना पोचलेल्या नाहीत. पायाभूत सुविधा नाहीत अशा मागास, दुर्गम भागातच हा नक्षलवाद फोफावलेला आहे. त्यामुळे एकीकडे सरकारी यंत्रणेच्या विरोधात लोकांना उभं करुन त्यांच्याकडून कधी सहानुभूतीनं तर कधी जबरदस्तीनं ते आपला हेतू साध्य करतात. त्यामुळे अशा भागात विकासकामं झाली पाहिजेत असं माननारा एक मोठा वर्ग आहे. जे लोक विकासापासून कोसो दूर आहेत त्यांच्या मनात सरकारप्रती राग उत्पन्न करुन नक्षलवादी त्यांच्याविषयी जागा निर्माण करतात. म्हणूनच विकासाची गंगा या भागात पोचवली पाहिजे. पण त्यात सरकार पातळीवर उदासिनताच दिसतेय. एकट्या गडचिरोलीचा विचार केला तरी कोणताच शासकीय अधिकारी तिकडं जाण्यास तयार नसतो. गडचिरोलीचं पोस्टींग म्हणजे शिक्षा हीच भावना या अधिकाऱ्यांमधे रुजलेली आहे. त्यातूनही ज्यांची पोस्टींग गडचिरोलीत होते त्यातले अनेक अधिकारी- कर्मचारी तिकडं फिरकतच नाहीत..सरकारी यंत्रणेचे हे प्रतिनिधीच नसल्यामुळे त्या भागातल्या विकासाचे बारा वाजतात. त्याचाच फायदा ह्या नक्षलवाद्यांना होतो.

महाराष्ट्राच्या शेजारीच असलेल्या आंध्र प्रदेशातही नक्षलवाद्यांचं मोठं वास्तव्य होतं. पण राजशेखर रेड्डी यांनी मुख्यमंत्री असतानाच्या पाच सहा वर्षाच्या काळात या नक्षलवाद्यांना जेरीस आणलं होतं. एका बाजूनं नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी मोहिम राबवायची तर दुस-या बाजूनं त्या भागात सरकारी कामांचा सपाटा लावायचा हा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला होता. त्यात त्यांना मोठं यश आलं होतं. एका बाजूनं विकास दुसऱ्या बाजूनं नक्षल्यांचा बिमोड आणि शरणांगती पत्करण्यासाठी प्रोत्साहन अशा पद्धतीनं त्यांनी हा कार्यक्रम राबवला. त्यांच्या काळात अनेक नक्षल्यांचा त्यांनी बंदोबस्तही केला. चकमकीत अनेकांना संपवलं तर काहीजण शरण आले. बाकीचे शेजारच्या राज्यात पळून गेले. त्यानंतरही नक्षल्यांचा नेता किशनजीला संपवून आंध्र सरकारनं नक्षल्यांचं नेतृत्वच मोडून काढलं.. आता नक्षलवाद्यामध्ये गट पडलेत त्यामुळे सत्ता गाजवण्यासाठी ते आपापसात भांडत आहेत. पण आंध्र सरकारनं केलेल्या त्यांच्या प्रयत्नांना चांगलं यश आलय. सगळा नक्षलवाद जरी मोडीत निघालेला नसला तरी ब-याच प्रमाणात यश आलय हे वास्तव आहे. त्यामुळे नक्षल्यांचा बिमोड करताना बंदुकीला विकासाची जोड द्यावी लागेल. स्थानिक लोकांमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात रोष निर्माण करावा लागणाराय. तसच सरकारच्याप्रती लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचं कामही करावं लागणाराय. हे काम आव्हानात्माक नक्कीच आहे पण अशक्य मुळीच नाही..

नक्षलवाद्यांच्या प्रत्येक हल्ल्यानंतर सरकारचा प्रतिनिधी आधुनिक शस्त्रास्रांची भाषा करतो. कुठं चुक झाली ती सुधारण्याचही बोलून जातो. काही दिवसं जातात आणि पुन्हा नक्षली त्यांचा डाव साधतात. हे किती दिवस चालणाराय. सरकारच्या पातळीवर काहीच होत नाही असं म्हणणंही चुकीचं आहे. पण नक्षलवाद्यांशी लढताना काही कायदेशिर अडचणी येत आहेत. नक्षलवाद्यांना मदत केली म्हणून पोलीस स्थानिकांना अटक करतात त्यांची जामीनावर सुटकाही होते पण तेच जर सरकारला मदत करतो हे जर नक्षल्यांना कळलं तर ते त्या स्थानिकाला ठारच करतात. आमच्याविरोधात गेलात तर तुमचंही हेच होईलं हे दाखवून लोकांमध्ये भीती निर्माण केली जाते. त्यामुळे जीवाच्या भितीनं स्थानिक लोक पोलिसांनाही मदत करण्यास धजावत नाहीत. अशा पद्धतीत नक्षलवाद्यांविरोधात लढताना पोलिसांचाही गोची होतेय. यातून मार्ग काढावा लागणाराय. नक्षलवाद्यांकडे भूसुरुंगस्फोट घडवून आणण्याचं तंत्र आहे. ते अनेकदा त्यांनी यशस्वीपणे वापरून त्यांचं काम फत्ते केलंय. त्यामुळे भुसुरुंगविरोधी यंत्रणाही आवश्यक आहे. अन्यथा प्रत्येक वेळी आपण आपल्या जवानांची आहूती देत राहू. नक्षलवादाचा हा राक्षस वेळीच ठेचून काढणं गरजेचं आहे. त्यात जर अपयश येत राहिलं तर नक्षल्यांचे मनसुबेही वाढतील आणि सध्या देशाला असलेला अंतर्गत धोकाही यापेक्षा मोठा होईलं. ती वेळ येण्यापूर्वीच नक्षलवाद्यांचा बिमोड करणं हे मोठं आव्हान पेलावं लागणाराय....

अण्णा हजारे आणि कंपनीच्या माकडचेष्टा

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची मशाल पेटवलेल्या अण्णा हजारेंच्या सहका-यांनी मागच्या काही दिवसात जो काही उच्छाद मांडलय ते पाहून प्रचंड संताप होतोय. भ्रष्टाचारविरोधी आंदोलन म्हणून देशातल्या तमाम लोकांनी ज्यांना डोक्यावर घेतलं तेच आता माकडचेष्टा करु लागलेत. संसद, त्यातले लोकप्रतिनिधी यांच्याविरोधात अरविंद केजरीवाल नावाचा महाभाग वाट्टेस ते बरळत चाललाय. हे महाभाग स्वतःला फारच शहाणे समजतात. शहाणे म्हणजे एवढे शहाणे की त्यांना जगाच्या पाठीवर जी काही अक्कल आहे ती फक्त त्यालाच आहे आणि बाकीचे सर्व मुर्ख आहेत याच आविर्भात तो दिडशहाणा वावरतोय. परवाच दिल्लीत जंतर मंतरवर झालेल्या एक दिवसाच्या उपोषणावेळीही हा दिडशहाणा बरचं काही बरळला..संसदेचा अपमान करणारा हा महाभाग तिथं असणा-या खासदारांबद्दल वाट्टेल तो बरळला..वरून काय तर म्हणे आमच्यावर कारवाई करा असं म्हणण्यापर्यंत तो मुजोर झालाय...
केजरीवाल नावाचा हा दिड शहाणा जेव्हा हे बरळत होता तेव्हा त्याच्या टीमचे कर्णधार असलेले हेच अण्णा हजारे व्यासपीठावर होतेच. त्यांना त्यात काहीच वावगं वाटलं नाही. उलट आमच्याकडे पुरावे आहेत, चौकशी करा अशी मागणी करुन केजरीवालची पाठच थोपटली. हे जरा जास्तच होतय ! राजकीय नेत्यांना सरसरकट शिव्या देणं हाच या अण्णा टोळीचा सध्या एककलमी कार्यक्रम सुरुय. भ्रष्टाचाराच्या गप्पा मारणा-या अण्णा टोळीनं त्यांच्याच सदस्यांचा भूतकाळही तपासून पहावा. प्रशांत भूषण, त्यांचे पिताश्री शांतीलाल भूषण, किरण बेदी यांच्या मालमत्तेची चौकशी करा. कुठुन आली त्यांच्याकडे एवढी संपत्ती हे जाहीर करा..किरण बेदींचा पगार किती होता ? सध्या त्यांच्याकडे किती संपत्ती आहे ? त्याचं उत्तर द्या अगोदर. समाजसेवी संस्थेच्या नावाखाली विमान तिकीटाचे पैसे लाटणा-या किरण बेदींना दुस-याला भ्रष्टाचारी म्हणण्याचा काहीएक नैतिक अधिकार नाही. तो भ्रष्टाचार ह्या अण्णा हजारेंना कसा चालतो ? का आपला तो बाब्या, दुस-याचं ते कार्टं ह्या म्हणीप्रमाणं चाललाय हा सर्व उद्योग..त्यांच्या आंदोलनाचं आयोजन करणा-या इंडिया अगेन्स्ट करप्शन नावाच्या एनजीओचा कर्ताकरवीता असणा-या मयंक गांधीचे उद्योग अण्णा हजारेंनी तपासून पाहिलेत का.? तसच भूषण पिता पुत्रांनी माया कुठुन गोळा केली याचे किस्सेही अण्णांनी माहित करुन घ्यावेत. अण्णांनी अगोदर स्वतःचं घर निट ठेवावं आणि मगच दुस-याला आरोपीच्या पिंज-यात उभं करावं.
अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या नावाखाली जे आंदोलन उभं केलं त्याला लोकांनी सुरुवातीला पाठिंबा दिला..कारण हा भ्रष्टाचार खालपासून वरपर्यंत बोकाळलाय. जाऊ तिथं खाऊ ही अपप्रवृत्ती वाढलीय. त्याचा फटका सर्वांना बसतोय. तो मुद्दाच सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे म्हणून लोकांनी त्यांना भरभरुन पाठिंबा दिला आणि त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावही केला. पण मिळालेला पाठिंबा पाहून ही टोळी भरकटलीय. आपण म्हणतो तेच ब्रम्हसत्य या तो-यात ही टोळी वावरु लागलीय. कोणाबद्दल काय बोलावं याचं ताळतंत्रही त्यांना राहिलेलं नाही. म्हणूनच लोकांची सहानुभूतीही आता कमी होऊ लागलीय.
राजकीय लोकांबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनातही चिड आहेच. पण त्याचा अर्थ त्यांचा उद्धार वाट्टेल त्या भाषेत करणं ह्या टोळीला शोभत नाही आणि तसा अधिकारही त्यांना कुणी दिलेला नाही. उलट अण्णा हजारेंच्या पहिल्या मोठ्या आंदोलनानंतर झालेल्या निवडणुकीतही लोकांनी भरभऱुन मतं दिलीच ना ! दुसरीकडं राजकीय लोकांबद्दल संताप व्यक्त करताना अण्णा हजारेंनी जनतेला कोणता पर्याय दिलाय का ? तर त्याचं उत्तर नाही असचं आहे..राजकीय पक्ष, त्यातले लोक भ्रष्ट आहेत तर अण्णा टोळींनी उतरावं ना राजकारणात ! त्यांना पाठिंबा देणारे लोक त्यांच्या पाठिशी आहेत का ते बघावं ? पण लोकांची गर्दी जमा करणं म्हणजे लोक तुमच्या पाठीशी आहेत हा गैरसमज त्यांनी दूर करावा..! गर्दी कशालाही गोळा होते. त्यातच लोक जर तुमच्याकडे अपेक्षेनं आलेत तर त्यांचा अपेक्षाभंग तुम्ही का करताय ? आंदोलन उभा करणं, ते टिकवणं ही सोपी गोष्ट नाही. हे त्या केजरीवाल सारख्यांना काय माहित. ?
केजरीवाल, किरण बेदी, सिसोदिया यांना कोण ओळखतं ? अण्णा हजारे सोडले तर त्यातल्या एकावरही जनता विश्वास ठेवत नाही. त्यामुळं अण्णांचा हा जो वापर सुरु झालेला आहे तो अण्णा हजारे यांनी वेळीच ओळखला पाहिजे..दुसरं म्हणजे आंदोलनाच्या नावाखाली अण्णा आणि त्यांची टोळी प्रस्थापीत व्यवस्थेला आव्हान देत आहे. तसच समांतर यंत्रणा उभी करण्याची स्वप्नं ते पहात आहेत. पण ते समाजव्यवस्थेला आणि पर्यायानं संसद, न्यायापालिका यासारख्या सर्व संस्थांना घातक आहे.त्यामुळे आंदोलनाच्या नावाखाली हा जो काही तमाशा सुरु आहे तो इथच थांबला पाहिजे. अन्यथा ज्या लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं तेच उद्या तुम्हाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात असू द्यावं. !!!!  

Tuesday, March 27, 2012

राष्ट्रवादीचा राज्यात धुमाकुळ

महाराष्ट्रातलं राजकीय चित्र सध्या बदलत चालल्याचं चित्र दिसतय. भाजप-शिवसेना ही २५ वर्षापासूनची असलेली युती तर त्यांना शह देणारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असं सरळसरळ चित्र महाराष्ट्रात होतं. त्यात दलित पक्षांचे काही तुकडे काँग्रेसबरोबर तर काही राष्ट्रवादीबरोबर होते..जातीयवादी पक्ष अशी टीका करत हे दोन्ही काँग्रेस भाजप सेनेला हिणवत सत्ता मिळवायचे..तीच री रामदास आठवलेही ओढत..पण शिर्डीत काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत धोका दिल्यानंतर राजकीय अडगळीत पडलेल्या रामदास आठवलेंना आशेचा किरण दिसला. वांद्र्यात रहायला गेल्यानंतर वाढदिवसाचं निमित्त साधून आठवलेसाहेबांनी मातोश्रीवर धुळ झाडली..याच भेटीत बाळासाहेबांनी दिलेल्या शिवशक्ती भिमशक्तीच्या मंत्राचा रामदास आठवलेंवर असा काय परिणाम झाला की आठवलेसाहेब जुनं सगळं विसरले. मग त्यांनाही आपलं राजकीय पुनर्वसन होणार अशी स्वप्नं पडायला लागली..त्यामुळे सेक्युलरचा जप करणारे आठवलेसाहेब कालपर्यंत ज्यांना जातीयवादी म्हणून शिव्या घालत होते त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले..एवढ्यावरच थांबतील तर आठवलेसाहेब कसे..त्यांनी उलट काँग्रेस राष्ट्रवादीलाच जातीयवादी म्हणून ठोकायला सुरुवात केली..अशा रितीनं एक राजकीय समिकरण जुळलं..

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मग शिवसेना-भाजप आणि आठवलेंचा रिपाइं अशी महायुती सुसाट सुटली. तर तिकडे या दोन आघाडी आणि महायुतीला टक्कर देण्यासाठी राज ठाकरेंचा मनसे सज्जच आहे..राज्यात हे असं तिरंगी चित्र दिसत होतं. त्याचा महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत अनुभव आलाच. या सर्वांनी आपापली ताकद अजमावली..खरं तर सेनेला मुंबई राखता आली. पण ठाण्यात सत्ता राखण्यासाठी त्यांना राज ठाकरेंना शरण जावचं लागलं..पण नाशकात त्यांनी दगाफटका केला..मनसेचा महापौर होऊ नये म्हणून शिवसेनेनं जंगजंग पछाडलं..पण त्यांना त्यात यश आलं नाही..तिथं मनसेला भाजपनं साथ दिली तर राष्ट्रवादीनं तटस्थ राहून मनसेला मदत केली..हा नवा पॅटर्न झाला..आणि नाशकात शिवसेनेनं दगाफटका केल्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याच्या इराद्यानं मग मनसेनं औरंगाबाद जिल्हा परिषदेत चक्क काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. ही अशी विविध विचारसरणीची सांगड घातली गेली. त्यातून कोणत्याही पक्षाला आता विचारसरणी आहे म्हणणंच जास्त धाडसाचं वाटू लागलंय..कारण सत्तेसाठी कोणाचाही हात हातात धरायचा हीच नवी विचारसरणी झालीय.

राज्यातल्या राजकारणातले हे दोन अंक संपल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत या नाटकाचा तिसरा अंक झाला..सेक्युलरचा जप करणा-या पक्षांनी सत्तेसाठी सर्व मर्यादा सोडल्या. ज्या पक्षांच्या जास्त जागा त्यांचा अध्यक्ष आणि कमी जागा असलेल्या मित्रपक्षाला उपाध्यक्षपद अशी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांच्यात सरळ सरळ वाटणी करायचं ठरलं..पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी राष्ट्रवादीनं गनिमा कावा करत काँग्रेसचा घात केला..विदर्भात तर राष्ट्रवादीनं धुमाकुळच घातला... यवतमाळमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना धोबीपछाड देण्यासाठी त्यांनी शिवसेनेशी युती केली आणि झे़डपीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला..तर नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीत कमळाबाईंशी सलगी करुन राष्ट्रवादीनं उपाध्यक्षपद मिळवलं..अमरावतीत काँग्रेसच्या जास्त जागा असतानाही काँग्रेसविरुद्ध सर्वपक्षांची मोट बांधून तिथंही राष्ट्रवादीनं काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवला..या झेडपीवरही राष्ट्रवादीनं अद्यक्षपद पटकावलं आणि भाजपला उपाध्यक्षपद दिलं..अशापद्धतीनं राष्ट्रवादीनं अख्खा विदर्भ भाजप सेनेच्या साथीनं काबीज केला आणि काँग्रेस फक्त बघत राहिली..विदर्भात जसा राष्ट्रवादीनं धुमाकुळ घातला तसाच धुमाकुळ अहमदनगरातही घातला..विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या वादात तिथंही राष्ट्रवादीनं झेडपी बळकावली..अद्यक्षपदावर तर त्यांनी महिनाभरापूर्वीच भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या विठ्ठलराव लंघेंना अध्यक्षपदाचा लाल दिवा दिला..तर उपाध्यपदासाठी काँग्रेसला मदत करण्याऐवजी थोरातांचा भाचा सत्यजित तांबेचा पराभव करत उपाध्यक्षपदही पटकावलं..

राष्ट्रवादीनं अशापद्धतीनं संपूर्ण राज्यात धुमाकुळ घालत काँग्रेसला जेरीस आणलं..आघाडीचीच सत्ता येणार अशा भ्रमात काँग्रेसवाले राहिले आणि राष्ट्रवादीनं त्यांचा पुरता गेम केला. २६ जिल्हा परिषदांपैकी तब्बल १३ झेडपीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष बसवले..सत्तेसाठी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला भिक न घालता राष्ट्रवादीनं जिथं जिथं ज्या ज्या पक्षाची साथ घेता येईल तशी घेतली..त्यासाठी त्यांनी कोणत्याही विचारसरणीला सोडलं नाही..फक्त सत्ता मिळवणं हाच एक उद्देश ठेवत त्यांनी हा धुडगुस घातला..त्यासाठी त्यांनी काँग्रेसला जो काही दणका दिलाय त्यातून ते २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी सावरतील का याची शंका वाटतेय.. राष्ट्रवादी एवढंच करुन थांबली नाही तर सोलापूर-बीड सारख्या जिल्ह्यात आपल्याच पक्षातल्या प्रस्थापित सुभेदारांनाही त्यांनी दणका दिला. ही वाटचाल पाहता २०१४ ची विधानसभा हे राष्ट्रवादीचं टार्गेट आहे हे स्पष्ट दिसतय..कसंही करुन काँग्रेसला जेरीस आणायचं आणि त्यांच्या जागा कमी करायच्या, कारण अजितदादांना मुख्यमंत्री करायचं तर काँग्रेसची जिरवावीच लागणाराय. त्यानंतर वेळ पडलीच तर मनसेची मदत घेण्यासही ते मागं पुढं पाहणार नाहीत..

हा सगळा बदलता राजकीय सारीपाट पाहिल्यानंतर सेक्युलरचं तुणतुणं वाजवणारे आपले पवारसाहेब हे सगळं उघड्या डोळ्यांनी कसं बघत होते असाच प्रश्न पडतो..कारण शिवसेना भाजपाला नेहमीच जातीयवादी पक्ष म्हणून शिव्या घालत हेच पवारसाहेब शाहू-फुले-आंबेडकरांचा नारा देत असतात. त्यांना कमळाबाईशी केलेला हा संग कसा आवडला असेल..जरी सत्तेसाठी काहीही करण्याचा अजितदांदाचा धडाका असला तरी पवारसाहेबांच्या संमतीशिवाय एवढं धाडस केलं असेल असं वाटत नाही..त्यामुळे पवारसाहेबांची विचारसरणीच बदलील की काय असं वाटायला लागलय..किंवा अजितदादांच्या धडाक्यासमोर त्यांनीही त्यांच्या विचारसरणीला मुरड घातली असावी..असो ! एवढं सगळं राजकीय रामायण महाभारत झाल्यानंतर स्थानिक पातळीवरचे ते निर्णय आहेत असं म्हणत पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीनं एकत्र येऊन जातीयवादी शक्तींचा मुकाबला केला पाहिजे असं म्हणायला पवारसाहेब मोकळेच आहेत..पण घड्याळाची ही टीकटीक काँग्रेसनं वेळीच थांबवली नाही तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची उरली सुरली ताकदही राज्यातून हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही..

Sunday, March 25, 2012

विलासराव आणि अशोकरावांची ग्रेट भेट

केंद्रीयमंत्री विलासराव देशमुख आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे मराठवाड्यातले दोन माजी मुख्यमंत्री नांदेडमध्ये एकत्र आले..तुम्ही त्यात काय विशेष असं म्हणाल..तर विशेष आहे. कारण या दोन्ही नेत्यांनी मंत्री ते मुख्यमंत्रीपदावर काम केलेलं आहे. त्यात विलासराव यांची कारकिर्द मोठी आहे. विलासराव दोन टर्ममध्ये मिळून जवळपास आठ वर्षे मुख्यमंत्री होते. त्यामानानं अशोक चव्हाणांच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद फार कमी काळ आलं. मुंबई बॉम्बस्फोटानंतर विलासरावांची खुर्ची गेली आणि अशोकराव आले होते. पण या दोन नेत्यांत मागच्या चार पाच वर्षांपासून कटुता आली होती. काही राजकीय कारणानं ह्या दोन नेत्यांत दुरावा वाढला होता. पण शनिवारी अचानक विलासराव देशमुखांनी नांदेडात असताना अशोक चव्हाण यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि आपल्यात काहीही मतभेद नाहीत असा निर्वाळा दिला.खरं तर अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनीच विलासरावांना राजकारणात आणलं. तसं विलासराव शनिवारी बोलतानाही अशोकराव हे आपले गुरु बंधू आहेत असं म्हणाले हे त्यामुळेच..आणि आमच्यात काही कारणानं दुरावा निर्माण झाला होता तो आता संपला आहे असं सांगितलं...

राजकारणात कोणीही कायमस्वरुपी कोणाचा शत्रु असू शकत नाही असं म्हणातात. त्यामुळंच ह्या दोघांनी कटुता मिटवण्याचा प्रयत्न केला असावा असं म्हटलं तर विषय संपेल..पण ते तसं नाही..या दोघांनी एकत्र येण्यामागं मोठी पार्श्वभूमी आहे. मुळात हे दोन नेते भेटले त्याच्या टायमिंगकडे सुरुवातीला लक्ष द्यावं लागेल. पहिलं कारण असं की आदर्श सोसायटी प्रकरणी सध्या सीबीआयचा तपास महत्वाच्या वळणावर आलाय. कन्हैयालाल गिडवाणीसह पाच जणांना अटकही झालीय. त्यामुळे आदर्शचा फास या दोन नेत्यांभोवतीही आवळला जात आहे. अशोक चव्हाण तर थेट आरोपीच्या यादीतच आहेत. याच आदर्शनं अशोकरावांचा बळी घेतलाय. तर विलासराव आणि सुशिलकुमार शिंदे यांचही नाव आदर्श प्रकरणी जोडलं गेलय. आदर्श प्रकरणी सह्या करण्यात हे दोन मुख्यमंत्रीही आहेत. त्यांची चौकशीही झालीय. त्यामुळे यातून सहिसलामत सुटण्यासाठी हे दोन नेते एकत्र आल्याचं बोललं जातय. आदर्श प्रकरणी या तीन्ही मुख्यमंत्र्यांनी जी साक्ष दिलीय त्यानुसार ती जमीन राज्य सरकारच्या मालकीची होती म्हणूनच आम्ही त्याला परवानगी दिली असं त्यांनी म्हटलय. त्या जमिनीच्या मालकीवरुन वादही आहे. काही कागदपत्रानुसार ती लष्कराची आहे असं म्हटलं जातय तर काही कागदपत्रात ती राज्य सरकारची आहे असं म्हटलय. त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे उद्या हे मोठे नेते काही तांत्रिक कारणाच्या आधारे वाचू शकतीलही..तसच दोन्हीकडे काँग्रेसचच सरकार असल्यामुळे त्यांना वाचवलही जाऊ शकतं. या झाल्या उद्याच्या शक्यता पण त्यापूर्वी दोघांनी एकत्र आलं तर दोघांना बळ मिळेल आणि राजकीय दबाव निर्माण करण्यासाठीही त्याचा वापर होऊ शकतो...

हे दोन नेते एकत्र येण्यापूर्वी नांदेड जिल्हा परिषदेवर काँग्रेसची म्हणजे अशोक चव्हाण गटाची सत्ता येण्यासाठी विलासरावांचे आमदार पुत्र अमित यांनी मदत केली. विलासराव गटाच्या सदस्यांनी पाठिंबा दिल्यामुळेच अशोकराव जिल्हा परिषद कायम ठेऊ शकले. ही तत्कालीन घटना आहे. त्यानंतरच हे दोन नेते नांदेडात विद्यापीठाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आले.पण हे दोघे नेते एकत्र येण्यामागं आणखी एक कारण आहे. तेही जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकाच आहे. या दोन्ही निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसलाय आणि राष्ट्रवादीनं मुसंडी मारलीय. ह्याचा जाब हायकमांडनं विचारला तेव्हा विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्ट प्रकरणामुळं काँग्रेसची घसरण झाल्याचं सांगितलं.त्यांचा रोख हा सुरेश कलमाडींपेंक्षा आदर्श प्रकरणातल्या विलासराव आणि अशोकरावांकडे जास्त होता. त्यामुळेच ह्या दोन नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात एकत्र येण्यासाठीही कटुता संपवली असेल असं म्हणायला जागा आहे. किंवा हायकंमाडनच या दोघांना एकत्र येण्याचा आदेश दिला असेल..तसच राष्ट्रवादीची आक्रमकता थांबवणं पृथ्वीराज चव्हाण यांना शक्य नाही. ती त्यांची क्षमताही नाही. त्यामुळे दोन वर्षांनी होणा-या विधानसभा निवडणुकीच्या आधी आदर्श प्रकरणातून बाहेर पडण्याचा या दोन नेत्यांचा प्रयत्न असावा. कारण पृथ्वीराज चव्हाण यांना तगडा पर्याय देताना विलासराव देशमुखांसारखाच ताकदीचा आणि राष्ट्रवादीला टक्कर देणारा नेता काँग्रेसला हवा आहे. त्यामुळं उद्याचा विचार करुन हे दोन्ही नेते एकत्र आले असावेत असा तर्क लढवला जातोय. कारण काहीही असो राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा शुत्र नसतो हे या दोघांच्या भेटीतून पुन्हा सिद्ध झालय एवढचं...

Thursday, March 22, 2012

मी, माझी शाळा आणि अतरंगीपणा

मिलिंद बोकिल यांच्या कादंबरीवर आधारीत शाळा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्याची चर्चा ऐकूण मलाही तो चित्रपट पहावा असं वाटलं. त्यातच बोकिलांची शाळा कादंबरी माझ्याकडे होतीच ती वाचून काढली आणि लगेचच शाळा चित्रपटही पाहिला..हैदराबादमध्ये असल्यामुळे मोठ्या पडद्यावरची मजा काही घेता आली नाही पण घरीच टीव्हीवर तो पाहिला..छान वाटला चित्रपट..! शाळा पाहताना सारखं लहानपणाची आठवण होत होती...त्या मुलांनी जो काही धिंगाणा घातलाय तो नैसर्गिक आहे. ज्यांनी ज्यांनी तो चित्रपट पाहिला त्या सर्वांना आपल्या शाळेची आठवण नक्कीच झाली असणार..कारण थोड्याफार फरकानं आपल्या सर्वांच्या शाळेतल्या आठवणी तशाच आहेत.चित्रपट पाहताना माझ्या डोळ्यासमोरही आमची शाळा आली.. फरक एवढाच होता की या शाळेतली मुलं जो अतरंगीपणा करतात तो आम्हाला फारसा करायला मिळाला नाही. कारण आमची शाळा छोट्या गावात होती..शाळेतला अभ्यास, मास्तरांचा मार, त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती हा जो प्रकार त्यात दाखवलाय तो मात्र तंतोतंत मिळता जुळता आहे..

माझ्या शाळेतही एक शिक्षक शिकवण्याच्या बाबतीत एकदमच सुमार होते.ते मराठी शिकवायचे..शिकवायचे म्हणजे काय फक्त पुस्तक वाचून दाखवायचे..त्यामुळे काहीच कळच नव्हतं..गणित हा तर सर्वांनाच त्रास देणारा विषय त्याचे शिक्षक जीव तोडून शिकवायचे मात्र आमच्या लक्षात काहीच राहत नसे.. इंग्रजीचं तर विचारुच नका..शब्द पाठ करणे, काळ, आर्टीकल, उतारे हे डोक्यावरुनच जायचे..पण शाळेत जे काही चार -पाच हुशार विद्यार्थी होते त्यात माझी गणना होत होती...मराठीचे आमचे मास्तर तर छड्या मारण्यात पटाईतच. माझ्या वर्गातल्या झाडून सगळ्यांनी त्यांचा मार खाल्लाय. मला मात्र कोणत्याच शिक्षकाचा मार खावा लागला नाही..हे आमचे मराठीचे मास्तर धड्यावरचे प्रश्न पाठ करुन या असं फर्मान सोडायचे. त्यांचं फर्मान म्हणजे दुस-या दिवशी मार खाण्याची तयारी ठेवूनच यायचं..माझा त्यात नंबर लागत नव्हता..कारण मी अभ्यास करुन यायचो..दुस-या दिवशी ते प्रश्न विचारताच ज्यांना या प्रश्नाचं उत्तर येत नाही त्यांना उभं राहण्यास सांगायचे आणि सर्व वर्ग उभा रहायचा. पुढच्या बाकावरचे आम्ही पाच सहा जणच खाली बसलेलो असायचो..मग काय उत्तर ज्यांना येत नाही त्यांना छड्यांचा मार पडायचा..हे नेहमीच चालायचं..नंतर नंतर मास्तर छड्या मारण्याचं सोडून द्यायचे..पण त्या बदल्यात जो बरोबर उत्तर देईलं त्याला उत्तर न येणा-यांच्या गालावर जोरात चापटा मारण्यास सांगायचे..अर्थात त्यातही माझा नंबर लागायचा..सहकारी विद्यार्थांना जाम मारायला मिळायचं..मुलींच्या लफड्यांचा विषय मात्र वरच्या वर्गात जास्त चालायचा. आमच्यापेक्षा वरच्या वर्गातल्या मुला मुलींच्या लफडयांची चर्चा चालायची..काहींच्या लफड्यांचे तर गरमा गरम किस्सेही चर्चेत असायचे..वासू-सपना सारख्या जोड्याही लागलेल्या होत्या. तर काही जोड्या मात्र सांकेतिक भाषेत लावल्या जायच्या..

शाळा चित्रपटात त्या मुलांनी जो आगाऊपणा केलाय तसा किंवा त्याच्याशी थोडासा मिळतातुळता प्रकार आम्ही अकरावी- बारावीला शहरात गेल्यानंतर केला..आमच्या कॉलेजमध्ये इंग्रजी शिकवण्यासाठी दोन तुकड्या होत्या. दोन्ही तुकड्यामिळून जवळपास १६०-१७० विद्यार्थी होते. एका तुकडीसाठी बोरकर नावाचे प्राध्यापक शिकवायचे. ते एकदम "बोरकर" होते. त्यांचं ते अजागळ राहणं..शिकवण्याची पद्धत पाहून त्यांच्या क्लासमध्ये कोणीही जात नसे..फारतर भित्रे आणि नियमांशी बांधील असे तीस चाळीस विद्यार्थीच त्या क्लासमध्ये जात..पण दुस-या तुकडीला मस्त मॅडम असायच्या. फुल टू स्टाईलिश आणि मॉड..वयाची चाळीशी ओलांडलेली, पण जोष मात्र एकदच पंचवीशीतलाच..त्यामुळे त्या क्लासमध्ये त्या काही शिकवू अगर न शिकवू वर्ग मात्र तुडुंब भरलेला असायचा..तबब्ल १०० च्या वर विद्यार्थी त्या मॅडमच्या क्लासला असायचे.. मग काय इतर तासाला आम्ही मागच्या बाकावर, पण या मॅडमच्या क्लासला मात्र पुढच्या बाकावर. ते ही मॅडमच्या एकदम समोरचा बाक मिळवण्यासाठी धडपड असायची..त्या शिकवत असताना आमच्या तीन चार जणात चर्चा रंगायची..अर्थात विषय मॅडमचाच...त्यांच्या साडीचा, मेकअप आणि एकूणच त्यांनी स्वताला कसं मेन्टेन केलय. इथंपासून ते त्यांच्या मॅचिंगपर्यंतच्या गप्पा चालायच्या..आमचा एक अतरंगी सहकारी तर त्यांच्या इनरवेअरवरही काँटेंट ठोकून द्यायचा आणि मग काय वर्गातच तोंड दाबून हशा..! कधी कधी मॅडमचं लक्ष जायचं पण काय चाललय हे त्यांना समजू देत नव्हतो..त्यांच्या स्लिवसेसपासून त्यांच्या परफ्युमपर्यंत चर्चा चालायच्या..त्यांच्या सेक्सी मुव्हमेंटवर तर सगळा वर्ग फिदा असायचा..आमच्या ज्या वर्गात तो इंग्रजीचा तास सुरु असायचा त्याचा शिक्षकांसाठीचा जो कट्टा होता तो थोडा उंच होता..तो कट्टा आणि त्याच्या अगदी समोरचा बेंच यांच्यात थोडं अंतर असलं तरी तोच बेंच आम्ही पटकवायचो..कारण त्या मॅडमला कधी कधी खूर्चीवर बसून पायावर पाय टाकून शिकवण्याची लहर यायची आणि आम्ही काही अतरंगी कार्टी त्याच क्षणाची वाट पहात असायचो..मग हळूच पेन खाली टाक, पुस्तक खाली टाक आणि ते घेण्याच्या बहाण्यानं वाकून ते "सुंदर दृष्य" पाहण्याची आमची स्पर्धा चालायची..कारण त्या जेवढा पाय जास्त हलवत तेवढे त्यांच्या XXX चं दर्शन व्हायचं. मग काय क्लास संपला की "ते जे काही" पाहिलं यावर रंगवून रंगवून चर्चा झडायच्या..

आमच्याकडे दुस-या एक मॅडम अगदी नव्या जॉईन झालेल्या होत्या...त्या अंगानं एकदम मजबूत, सुडौल बांधा, आवश्यक त्या ठिकाणी मस्त चढ -उतार होता..दिसायला गो-या होत्या पण उंची मात्र कमी होती..त्या दोन तीन पुस्तकं नेहमी छातीला लावून यायच्या..ते दृष्य पाहून आम्हाला त्या पुस्तकांचा हेवा वाटायचा. कारण त्या खूपच प्रेमानं ती पुस्तकं छातीला लावायच्या..आमच्यातली काही अंतरंगी कार्टी त्यावरही काँमेंट मारायचं सोडतं नसत..अरे, मी पुस्तक असतो तर..! वगैरे.. त्या मॅडमचा एकच होरा असायचा की, तुम्ही ना मला जे काही विचारायचय ते वर्गातच विचारा..वर्गाच्याबाहेर विचारु नका..पण त्यांच्या या विनंतीला आम्ही कधीही दाद दिली नाही.. क्लास संपला ला रे संपला की पट्टकन मॅडमच्या मागं जात मॅडम मॅडम करत एकदम सात आठ जण घोळका करुन त्यांना थांबवायचो आणि त्यांना प्रश्न विचारायचे. त्या मॅडमला तर असं हे वर्गाबाहेर विचारलेलं आवडत नसलं तरी काही शूरवीर त्यांना लगेच म्हणायचे..मॅडम क्लासमध्ये विचाराचं डेअरिंग होत नाही हो..! मग त्या बिचा-या शंकेचं निरसन करायच्या..पण उत्तर ऐकण्यात कोणाला रस असायचा..जो तो मॅडमच्या छातीकडे टक लावून बघायचा..मॅडमची उंची कमी आणि "तो भाग "मात्र उंच तसच भरलेला असल्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्याच ठिकाणी असायच्या..हा कार्यक्रम नेहमीचाच..पण काही दिवसानंतर त्या मॅडच्या लक्षात आलं की मुलं अभ्यासातली शंका विचारल्यानंतर त्यांच्या उत्तराकडे नाही तर त्यांच्या XXX वरच जास्त नजरा लावून बसलेले असायचे..त्यानंतर मात्र त्यांनी वर्गाच्याबाहेरचा हा क्लास बंद केला.. दुसरी एक मॅडही नवीनच जॉईन झालेली..एनसीसीच्या कमांडरही होत्या त्या. पण त्यांच्या शिकवण्यापेक्षा त्यांच्या फिगरवच मुलं जास्त चर्चा करायची..

कॉलेजमध्ये काही विषय हे फक्त स्कोअरिंगसाठी घेतलेले असायचे. त्या क्लासला तर मागच्या बाकावर बसून गप्पा मारणं..मुलांकडे बघत बसणे हाच उद्योग चालायचा.. असे अनेक किस्से आहेत..पण ते सर्व या ठिकाणी लिहिणं शक्य नाही..असेच नसते उद्योग तुमच्या माझ्या अनेकांनी शाळा कॉलेजात केलेले आहेत...आता आपण ते कधी कधी आठवतो तेंव्हा हसायलाच येतं. त्यावेगळच्या आपल्या सहकारी मुली आठवल्या की आता त्या कशा असतील म्हणजे कशा दिसत असतील असं चित्रही लगेच डोळ्यासमोरून जातं..शाळा पाहिल्यानंतर त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. त्यामुळे मिलिंद बोकिल यांना धन्यवाद आणि चित्रपटाच्या टीमलाही धन्यवाद..

Tuesday, March 20, 2012

ही तर गरिबांची थट्टाच...

तुम्ही जर शहरात राहत असाल आणि दिवसाला २९ रुपये म्हणजे महिन्याला ८५९ रुपये कमावत असाल आणि ग्रामिण भागात २२ रुपये म्हणजे महिन्याला ६७२ रुपये कमावत असाल तर तुम्ही गरिब नाही !...तुम्ही मजेत जगू शकता...! यावर तुम्ही कपाळावर हात मारुन घेऊ नका किंवा मी हे काय सांगतोय म्हणून मला शिव्या देण्याचं काम करु नका.. ! कारण हे मी म्हणत नाही तर आपल्या केंद्रातली नियोजन आयोग नावाची जी संस्था आहे ती म्हणतेय.. ! आणि भारतातील गरिबी कमी झाल्याचा दावाही त्यांनी केलाय.. म्हणे देशातली गरिबी ४० टक्क्यांवरुन २९ टक्क्यापर्यंत खाली आलीय. ! आता याला काय म्हणायचं..? तुम्ही तर लगेच हिशोब मांडला असेल. पण वस्तुस्थिती तशी नाही हे तुम्हाला आणि मलाही माहिती आहे. पण या दिल्लीच्या एसी कार्यालयात बसून आकडेमोड करणा-या महानालायक लोकांना त्याचं काय पडलय. २९ रुपये किंवा २२ रुपयात ह्या महाभाग विद्वानांचा एकवेळचा चहाही होत नाही आणि गरिबीवर अहवाल देताना २२ आणि २९ रुपये दिवसात एका माणसाला पुरेसे आहेत अशी माहिती पुरवतात.. तेंडुलकर नावाचे एक गृहस्थ आहेत , त्यांनी तसा अहवालाच सरकारला दिला होता. त्यावरुन या नियोजन आयोगानं गरिबीची ही व्याख्या केलीय. सहा महिन्यापूर्वी अशाच प्रकारचे आकडे देऊन हा नियोजन आयोग तोंडावर आपटला होता. सर्वोच्च न्यायालयानंही फटकारल्यानंतर नवीन प्रतिज्ञापत्र सादर करु असं त्यांनी म्हटलं होतं. पण त्यांना अजूनही अक्कल आलेली नाही...पुन्हा नव्यानं आकडेमोड करुन त्यांनी आपल्या अकलेचे तारे तोडलेत..पण अशा प्रकारे आकडेवारी देऊन त्यांनी गरिबांची खट्टा केलीय.


आज महागाईचा दर कुठे गेलाय. २२ रुपये कमावणा-याच्या घरातले चार लोक या २२ रुपयात दोनवेळचं जेवन तर करु शकतात का हे या महाभागांना माहित नाही असं म्हणता येणार नाही..तसच असे आकडे देणारे कोणत्या विश्वात वावरतात असा तुम्हा आम्हाला प्रश्न पडणंही साहजिक आहे..पण हा न समजणारा विषय नाही.. सरकार दरवर्षी सबसीडीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये खर्च करतं. दारिद्र्यरेषेच्या खालच्या लोकांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात. त्यावरही सरकारचे कोट्यवधी रुपये खर्च होतात..जर गरिबीचा आकडा कमी केला तर त्यांना दिली जाणारी सबसीडीची ही रक्कमही आपोआपच कमी होईलं असा त्यामागचा एक होरा आहे. त्यासाठीच हा सगळा आटापीटा चाललाय.


खरं तर सरकार गरिबांना सवलती देताना हात आखडता घेतं. पण तेच मोठ्या कंपन्यांना करात मोठी सवलत देतं. त्यावेळी हात आखडता घेत नाही. एखाद्या उद्योजकाच्या नव्या प्रोजेक्टसाटी शेतक-यांच्या जमिनी कवडीमोल भावानं घेऊन त्या उद्योगाला देण्यापासून त्यांना कर सवलती देण्यासाठी हे सरकार आघाडीवर असतं. मोठा प्रोजेक्ट असेल तर त्यासाठी सरकार पायघड्याही घालतं..कारण याच मोठ्या कंपन्या उद्या त्यांच्या मदतीला धावत येतात. निवडणूक निधी असो वा इतर कोणत्याही प्रकारे आर्थिक मदत करण्यासाठी हे उद्योगपती हजर असतात..पण गरिबांच्या सवलतींसाठी दिल्या जाणा-या पैशातून त्यांना काहीच मिळत नाही म्हणून कदाचित त्यांना दिल्या जाणा-या सवलती कमी करण्याचा हा एक डाव आहे..


सरकारला सल्ला देणा-या ज्या काही संस्था आहेत. त्यांचा हा पद्धतशीर डाव आहे. कोणत्याही प्रकारे गरिबांच्या नावावर जास्त पैसा जाता कामा नये यासाठी अशा प्रकारची एक लॉबी सतत काम करत असते.. त्याचाच हा एक भाग आहे. मुळात सरकार ज्या काही योजना गरिबांसाठी आणतं त्या त्यांच्यापर्यंत पोचतच नाहीत हे वास्तव आहे. मग ते रेशनवरच धान्य असो वा शाळेतली मध्यान्ह भोजन योजना असो..अशा कितीतरी योजनांची नावं घेता येतील. त्यासाठीचा माल किंवा निधी हा परस्पर संगनमत करुन लाटला जातो आणि गरिबांच्या माथी काही तुकडे फेकले जातात. रेशनवर कमी दरात धान्य उपलब्ध करुन देण्याची योजना आहे.. पण कोणत्या रेशनवर चांगला माल कधी पाहिला आहे का..? आणि तोही कधी वेळेवर उपलब्ध असतो का हे आपल्याला सर्वांना माहित आहे..निळ्या रंगाच्या रॉकेलचा काळा बाजार कसा केला जातो हे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहतोय. म्हणजे सरकार एकीकडे या गरिबांवर मोठा खर्च केला जातो असं सांगत असताना त्या योजना तळागाळातल्या आमच्या गरिबांपर्यंत पोचतच नाहीत हे वास्तव आहे. हेसुद्धा सरकारमधल्या लोकांना माहित आहे..तरिपण गरिबांना कोणीही वाली नाही..फक्त सरकारदफ्तरी हजारो कोटी रुपयांच्या योजना राबवल्याचं दाखवायचं आणि तो निधी आपसात वाटून घ्यायचा गोरख धंदा मागच्या अनेक वर्षांपासून राजरोस सुरु आहे..


गरिब हटावचे नारे फक्त द्यायचे असतात, निवडणुका आल्या की फुकट वीज, दोन रुपये किलोनं गहू-तांदूळ

देण्याची आश्वासनं द्यायची आणि निवडून आल्यानंतर प्रिंटींग मिस्टेक म्हणून त्याकडे दुर्लक्ष करायचा हाच धंदा राजकीय पक्ष करत आलेत. कारण गरिबांना या देशात कुणी विचारत नाही..त्यांना काही देऊ म्हणून आश्वासन दिलं तरी ते द्यायलाच पाहिजे असं काही नाही. कारण तो गरिब काही त्यांना विचारायला येत नाही..आणि मोर्चा, आंदोलनांच्या माध्यमातून काही मागण्यासाठी आलाच तर पोलिसांच्या लाठ्या पडतात ना त्या गरिबांच्या पाठीवर. मग कशाला हवे गरिबांचे लाड..करा त्यांच्या सवलती कमी.. कुणीही विचारायला येत नाही..काहीतरी पळवाटा काढून या गरिबांच्या तोंडातला घास हिरावून घेण्याचा उद्योग सरकार दफ्तरी सुरुय. गरिब फक्त गरिबच राहतोय आणि श्रीमंत श्रींमत होत चाललाय. ही दरी कमी करण्याचा प्रयत्न न करता याकडे सरकार आणि नियोजन आयोगासारख्या संस्था जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत..गरिबांचा वाली कुणी नाही..मुकी बिचारी कुणीही हाका असं म्हटल्याप्रमाणं त्यांची थट्टा केली जातेय..हेच त्या गरिबाचं दुर्दैव म्हणायचं...