Sunday, October 14, 2012

नागपूरात जमावानं गुंडाला ठेचून मारलं..

" नागपूरातील सीताबर्डी भागातील वसंतराव नाईक झोपडपट्टीतील कुख्यात गुंड अक्रम आणि इक्बाल यांच्या पापाचा घडा भरला होता. म्हणूनच या झोपडपट्टीतील महिलांनी इक्बालला भर रस्त्यात ठेचून मारला..या गुंडांच्या त्रासाला, गुंडगिरीला, दहशतीला कंटाळून महिलांनी त्या राक्षसाचा खात्मा केला..पण विषय एवढ्यावरच संपत नाही तर लोकांना कायदा हातात का घ्यावा लागला ? त्याला जबाबदार कोण ? पोलिस काय करत होते ? ह्या प्रश्नाची उत्तरं मिळणं गरजेचं आहे..

नागपूरात ९ ऑक्टोबरच्या रात्री वसंतराव नाईक झोपटपट्टीतील महिलांनी आणि इतर लोकांनी इक्बाल नावाच्या गुंडाचा दगडानं ठेचून खून केला. जवळपास दोन तीनशेच्या जमावानं त्या गुंडाला ठेचून मारला. या घटनेनंतर राज्यात चर्चा सुरु झाली ती लोकांनी कायदा असा हातात घ्यावा का याची..खरचं या प्रकरणानंतर हा प्रश्न चर्चेला येणं स्वाभाविक आहे. कारण कोणत्याही कायद्याच्या राज्यात कोणीही कायदा हातात घेऊन अशा प्रकारे शिक्षा देणं चूकच आहे. उद्या कोणीही उठून असच रस्त्यावर न्याय देण्याची भाषा करेल. असा सूर अनेक स्तरातून उमटला.. हे सर्व बरोबर आहे...पण हा युक्तीवाद कायद्याचं जिथं पालन केलं जातं तिथं योग्य आहे. नागपूरातली घटना जर लोकांनी कायदा हातात घेतला अशी होत असेल तर तो कायदा त्या लोकांना हातात का घ्यावा लागला याचा अगोदर विचार करायला लागेल..मुळात कोणीच उठसुठ कुणाला मारहाण करणार नाही. अशीच घटना नागपूरातच आठ वर्षापूर्वी म्हणजे १६ ऑगस्ट २००४ रोजी घडली होती. त्यावेळीही महिलांनी अशाच एका नराधमाला भरकोर्टात ठेचून मारला होता. तो गुंड होता अक्कू यादव..खून दरोडे, बलात्कार यासारखे असंख्य गुन्हे त्याच्यावर होते तरीही तो मोकाटच फिरत होता. पोलिस आपलं काहीच करु शकत नाहीत. किंबहुना पैसा फेकला की पोलीस आपलं काहीच वाकडं करु शकत नाहीत ही भावना या गुंडांमध्ये बळावलीय. त्याला खतपाणी घालण्याचं काम पोलिस दलातलेच काही लोक करत आहेत. त्यांना राजकीय पक्षांचाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा असतो. म्हणूनच हे गुंड अनेक गुन्हे करुनही मोकाट सुटतात आणि पुन्हा सामान्य लोकांवर अत्याचार करण्यास मोकळे असतात. अशा गुंडाना पोलिस किंवा आपली न्यायव्यवस्था शिक्षा ठोठावू शकत नाही म्हणून हे लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी या गुंडांना ठार मारलं... !!
इक्बाल काय किंवा अक्कू यादव काय त्यांना लोकांनी ठेचून का मारलं याचा विचार करण्यापूर्वी लोक या थराला का पोचले ह्याचा विचार करावा लागेल...वसंतराव नाईक झोपडपट्टीत इक्बाल, त्याचा भाऊ आणि इतर काही गुंडाचा अड्डा चालत होता. तिथं जुगार खेळले जायचे. हप्ता वसूली, वर्गणीच्या नावाखाली पैसा वसूल करणं हा नेहमीचा धंदा होता. त्यातच त्या झोपडपट्टीतल्या महिला आणि मुलींना त्यांचा मोठा त्रास होता. जाता येता हे लोक मुलींशी छेडछाड करत होते. काही मुलींवर बलात्कार करण्यात आले. चाकूचा धाक दाखवून अन्याय तर दररोजच केले जात होते. अनेक अवैध धंदे त्या गुंडांच्या अड्ड्यावर चालत होते. त्याचा त्रास तिथल्या लोकांना होत होता. त्यावर पोलिसांना अनेकदा सांगूनही पोलीस दुर्लक्ष करत होते. या झोपडपट्टीपासून जवळच सिताबर्डी पोलिस स्टेशन आहे..पण पोलिसांना यातील कोणत्याच प्रकारची माहिती नव्हती असं म्हणता येणार नाही. तर दुसरीकडं स्थानिक लोकांनी या गुंडांच्या विरोधात तक्रारी देऊन त्या दाखल करुन घेण्याचं सौजन्यही पोलिसांनी दाखवलं नाही. फोनवरुन तक्रार घेण्याचा तर प्रश्नच येत नाही. खोलात जाऊन माहिती घेतली असता असं समजलं की त्याच पोलिस स्टेशनमधले काही लोक म्हणजे पोलीस त्या गुंडांच्या अड्डयावर जायचे...! कारण काय आहे हे लोकांना न कळण्यासारखं नाही..! गुंडांच्या मुसक्या आवळण्याएवजी त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन त्यांच्या भानगडी झाकण्यातच हे पोलीस धन्यता मानत होते. त्यातूनच हा प्रकार घडला..गुंडांच्या त्रासातून पोलीस सुटका करत नाहीत, आपलं कोणी एकत नाही, हे जेव्हा लोकांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्या इक्बालचा विषयच संपवून टाकला...!! कारण दररोज मरण्यापेक्षा एकदाच काय तो त्याचा निकाल लावू ही त्या लोकांची भावना होती. त्यात त्यांच काही चुकलेलं नाही..ज्या पोलिसांची म्हणजे कायद्याची भाषा करायची तेच जर गुंडांना सामिल असतील तर न्याय कोण देणार..?

नागपूरातील या गुंडाचा कहर म्हणजे दहा दिवसापूर्वीच या गुंडांनी एकाचा खून केला आणि त्याचा मृतदेह त्या झोपडपट्टीत पुरला. त्यासाठी झोपडपट्टीतल्याच लोकांना धमकावून खड्डा खणून घेतला. एवढी या गुंडांची दहशत त्या भागात होती. त्याचा पोलिसांना पत्ताच नव्हता..हे सर्व प्रकरण बाहेर आल्यानंतर आता निलंबनाची कारवाई सुरु झालीय..पोलिसांचं चुकलं हे आता पोलिस आयुक्त सांगतायत. मग एवढे दिवस हे सर्व चालत असल्याचा वरिष्ठांना थांगपत्ताच नाही असं कसं म्हणायचं...आता त्या पोलिसांवर कारावाई होईल नाही होईल हा भाग वेगळा. पण ज्यावेळी लोकांचा पोलिसांवरचा विश्वास उडतो तेव्हा लोक कायदा हातात घेतात हे यापूर्वीच्याही अनेक प्रकरणात दिसून आलय...

नागपूरात जमावानं गुंडाची ठेचून हत्या केली असे प्रकार इतरही घडलेले आहेत आणि घडत आहेत. असं का होतं याचं उत्तर शोधण्यासाठी त्याच्या मुळात जावं लागेल. ज्या भागात गुंडांची दहशत असते त्या भागातल्या लोकांना जीव मुठीत ठेवूनच जगावं लागतं. सर्वसामान्य माणूस त्या गुंडाच्या सावलीलाही जात नाही. त्यातच पोलिसांकडे तक्रार केलीच तर त्या गुंडांवर काही कारवाई होईल याचा विश्वासच लोकांना राहिलेला नाही. समजा एखाद्या पोलिसांनी त्या गुंडावर कारवाई केलीच तर काय होतं...छेडछाड, धमकी देणं किंवा इतर गुन्ह्यात एकतर तो जामीनावर सुटतो किंवा खूनासारख्या प्रकरणात सबळ पुरावे नसल्यामुळे बाहेर येतो. म्हणजे गुन्हा करुनही पुन्हा उजळ माथ्यानं वावरायला आणि पुन्हा गुंडगिरी करण्यास मोकाटच..त्यातून पून्हा त्या लोकांना त्रास होणारच.. ! अशा व्यवस्थेमुळे लोक कायदा हातात घेतात. ज्या लोकांनी नागपूरात गुंडाला ठेचून मारलं ते झोपडटट्टीतले लोक आहेत. त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी गुंडाला कायमची अद्दल घडवली..! पण असे अनेक इक्बाल, अक्कू यादव या समाजात उजळ माथ्यानं फिरत आहेत. त्यांचा बंदोबस्त कोण करणार.. ? कारण गुंडगिरी, दहशत, राजकीय आश्रय आणि पोलिसांचं पाठबळ यामुळे या गुंडांचं मनोधैर्य वाढत चाललय आणि ते समाजाला घातक आहे. पोलिसांनी त्यांचं काम चोख बजावलं तर लोकांना कायदा हातात घेऊन इक्बाल किंवा अक्कू यादव करावा लागणारा नाही एवढचं...!!! 
 

1 comment: