Thursday, March 29, 2012

नक्षलवाद- एक मोठं आव्हान



नक्षलवाद्यांनी मंगळवारी गडचिरोली जिल्ह्यात भूसुरुंगाचा स्फोट घडवून CRPF च्या १२ जवानांचा बळी घेतला. ज्या दिवशी हा स्फोट घडवून आणला त्या दिवशी CRPF चे महासंचालक विजयकुमार हे स्वतः गडचिरोलीत होते. तर दोन दिवस अगोदरच केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश हे गडचिरोली जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौ-यावर होते.त्यानंतर त्यांनी हा गेम केला..खरं तर जयराम रमेश हे केंद्रीय मंत्री दौरा संपवून जाताच आणि CRPF चे महासंचालक गडचिरोलीत असताना हा घातपात घडवून आणणं हा काही योगायोग नाही. नक्षलवाद्यांनी पूर्वनियोजीतपणे घडवून आणलेला हा घातपात आहे. हा घातपात घडवून आणून नक्षलवाद्यांनी सुरक्षा यंत्रणा आणि सरकार यांना एकप्रकारे आव्हानच दिलय.

गडचिरोलीत हा घातपात घडवून आणला तेव्हा दुस-या बाजूला ओडीशात याच नक्षलवाद्यांनी दोन इटालियन पर्यटकांचं अपहरण केलं. त्यांच्या सुटकेसाठी राज्य सरकार प्रयत्न करत असतानाच नक्षलवाद्यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचच अपहरण केलं. यातूनही त्यांनी राज्य सरकारला आव्हान दिलय. या दोन घटना ताज्या आहेत. त्यापूर्वी नक्षलवादी शांत होते असं नाही. अधूनमधून ते त्यांच्या कारवाया करतच होते. त्यामुळे हे आव्हान मोडीत काढणं हे सरकार आणि पर्यायानं सुरक्षा यंत्रणांना आव्हान आहे.


नक्षलवाद हा भारतातल्या अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका आहे. आंध्र प्रदेश, ओडीशा, छत्तिसगड, पश्चिम बंगाल या राज्यासह महाराष्ट्राच्या गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि जंगल संपत्ती असलेल्या भागात या नक्षल्यांचा मोठा प्रभाव आहे. अंतर्गत सुरक्षेला असलेला हा धोका गंभीर असल्याचं पंतप्रधानांनीही मान्य केलय. असं असतानाही या नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यात सरकार आणि सुरक्षा यंत्रणा यांना अजूनही मोठं यश आलेलं नाही..नक्षलवाद ही सामाजिक आणि आर्थिक समस्या आहे असंही म्हटलं जातय. त्यामुळे बंदुकीच्या गोळीला गोळीनंच उत्तर देण्याबाबतही मतभेद आहेत. मुळात नक्षलवाद्यांचा जोर अशा भागात जास्त आहे ज्या ठिकाणी सरकारी योजना पोचलेल्या नाहीत. पायाभूत सुविधा नाहीत अशा मागास, दुर्गम भागातच हा नक्षलवाद फोफावलेला आहे. त्यामुळे एकीकडे सरकारी यंत्रणेच्या विरोधात लोकांना उभं करुन त्यांच्याकडून कधी सहानुभूतीनं तर कधी जबरदस्तीनं ते आपला हेतू साध्य करतात. त्यामुळे अशा भागात विकासकामं झाली पाहिजेत असं माननारा एक मोठा वर्ग आहे. जे लोक विकासापासून कोसो दूर आहेत त्यांच्या मनात सरकारप्रती राग उत्पन्न करुन नक्षलवादी त्यांच्याविषयी जागा निर्माण करतात. म्हणूनच विकासाची गंगा या भागात पोचवली पाहिजे. पण त्यात सरकार पातळीवर उदासिनताच दिसतेय. एकट्या गडचिरोलीचा विचार केला तरी कोणताच शासकीय अधिकारी तिकडं जाण्यास तयार नसतो. गडचिरोलीचं पोस्टींग म्हणजे शिक्षा हीच भावना या अधिकाऱ्यांमधे रुजलेली आहे. त्यातूनही ज्यांची पोस्टींग गडचिरोलीत होते त्यातले अनेक अधिकारी- कर्मचारी तिकडं फिरकतच नाहीत..सरकारी यंत्रणेचे हे प्रतिनिधीच नसल्यामुळे त्या भागातल्या विकासाचे बारा वाजतात. त्याचाच फायदा ह्या नक्षलवाद्यांना होतो.

महाराष्ट्राच्या शेजारीच असलेल्या आंध्र प्रदेशातही नक्षलवाद्यांचं मोठं वास्तव्य होतं. पण राजशेखर रेड्डी यांनी मुख्यमंत्री असतानाच्या पाच सहा वर्षाच्या काळात या नक्षलवाद्यांना जेरीस आणलं होतं. एका बाजूनं नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी मोहिम राबवायची तर दुस-या बाजूनं त्या भागात सरकारी कामांचा सपाटा लावायचा हा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला होता. त्यात त्यांना मोठं यश आलं होतं. एका बाजूनं विकास दुसऱ्या बाजूनं नक्षल्यांचा बिमोड आणि शरणांगती पत्करण्यासाठी प्रोत्साहन अशा पद्धतीनं त्यांनी हा कार्यक्रम राबवला. त्यांच्या काळात अनेक नक्षल्यांचा त्यांनी बंदोबस्तही केला. चकमकीत अनेकांना संपवलं तर काहीजण शरण आले. बाकीचे शेजारच्या राज्यात पळून गेले. त्यानंतरही नक्षल्यांचा नेता किशनजीला संपवून आंध्र सरकारनं नक्षल्यांचं नेतृत्वच मोडून काढलं.. आता नक्षलवाद्यामध्ये गट पडलेत त्यामुळे सत्ता गाजवण्यासाठी ते आपापसात भांडत आहेत. पण आंध्र सरकारनं केलेल्या त्यांच्या प्रयत्नांना चांगलं यश आलय. सगळा नक्षलवाद जरी मोडीत निघालेला नसला तरी ब-याच प्रमाणात यश आलय हे वास्तव आहे. त्यामुळे नक्षल्यांचा बिमोड करताना बंदुकीला विकासाची जोड द्यावी लागेल. स्थानिक लोकांमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात रोष निर्माण करावा लागणाराय. तसच सरकारच्याप्रती लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचं कामही करावं लागणाराय. हे काम आव्हानात्माक नक्कीच आहे पण अशक्य मुळीच नाही..

नक्षलवाद्यांच्या प्रत्येक हल्ल्यानंतर सरकारचा प्रतिनिधी आधुनिक शस्त्रास्रांची भाषा करतो. कुठं चुक झाली ती सुधारण्याचही बोलून जातो. काही दिवसं जातात आणि पुन्हा नक्षली त्यांचा डाव साधतात. हे किती दिवस चालणाराय. सरकारच्या पातळीवर काहीच होत नाही असं म्हणणंही चुकीचं आहे. पण नक्षलवाद्यांशी लढताना काही कायदेशिर अडचणी येत आहेत. नक्षलवाद्यांना मदत केली म्हणून पोलीस स्थानिकांना अटक करतात त्यांची जामीनावर सुटकाही होते पण तेच जर सरकारला मदत करतो हे जर नक्षल्यांना कळलं तर ते त्या स्थानिकाला ठारच करतात. आमच्याविरोधात गेलात तर तुमचंही हेच होईलं हे दाखवून लोकांमध्ये भीती निर्माण केली जाते. त्यामुळे जीवाच्या भितीनं स्थानिक लोक पोलिसांनाही मदत करण्यास धजावत नाहीत. अशा पद्धतीत नक्षलवाद्यांविरोधात लढताना पोलिसांचाही गोची होतेय. यातून मार्ग काढावा लागणाराय. नक्षलवाद्यांकडे भूसुरुंगस्फोट घडवून आणण्याचं तंत्र आहे. ते अनेकदा त्यांनी यशस्वीपणे वापरून त्यांचं काम फत्ते केलंय. त्यामुळे भुसुरुंगविरोधी यंत्रणाही आवश्यक आहे. अन्यथा प्रत्येक वेळी आपण आपल्या जवानांची आहूती देत राहू. नक्षलवादाचा हा राक्षस वेळीच ठेचून काढणं गरजेचं आहे. त्यात जर अपयश येत राहिलं तर नक्षल्यांचे मनसुबेही वाढतील आणि सध्या देशाला असलेला अंतर्गत धोकाही यापेक्षा मोठा होईलं. ती वेळ येण्यापूर्वीच नक्षलवाद्यांचा बिमोड करणं हे मोठं आव्हान पेलावं लागणाराय....

2 comments:

  1. नक्षलवादी म्हटले जाणाऱ्यांच्या कारवाया ज्या क्षेत्रात होतात ते क्षेत्र खनिज संपत्तीचे भांडार आहे. अगदी ब्रिटिश काळापासून हे क्षेत्र चोरट्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. या चोरट्या व्यापाराचे संरक्षण ीकरण्यासाठी ज्या खासगी सेना उभारल्या गेल्या त्याना त्यांच्या मदतीने सत्ता मिळविलेल्या कम्युनिस्टानी नक्षलवादी, माओवादी म्हणून गौरविले. प्रत्यक्षात हे सोफिस्टिकेटेड पेंढारीच आहेत

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks for your nice comment. I can't write in detail bcoz it's blog. it will b so lengthy, Hence I only written it in short.

      Delete