Tuesday, February 28, 2012

जैतापूरच्या अणु ऊर्जा प्रकल्पाला विरोध किती योग्य..?

जैतापूरच्या अणु ऊर्जा प्रकल्पाचा वाद अजून मिटलेला दिसत नाही..पुण्यात काल ज्येष्ठ अणु शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांना शिवसेनेच्या काही लोकांनी जैतापूरच्या प्रकल्पावर बोलण्यास मज्जाव केला.. झालं असं की..काकोडकर हे पुण्यातल्या एका कार्यक्रमात अणु ऊर्जा प्रकल्पावर व्याख्यान देणार होते.. हे तिथल्या शिवसेनेच्या काही नेत्यांना कळलं आणि त्यांच्या लक्षात आलं की शिवसेनेचा जैतापूरच्या अणु ऊर्जा प्रकल्पाला विरोध आहे..तर मग हे काकोडकरसाहेब कसं काय त्याचं समर्थन करत आहेत..? आपल्या साहेबांचा विरोध असताना काकोडकर या विषयावर बोलतात म्हणजे काय..? झालं की मग दहा वीस टाळक्यांनी मिळून कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन काकोडकरांना अणु उर्जा प्रकल्पावर बोलू नका अशी तंबी दिली..! आयोजकांनीही राडा नको म्हणून जौतापूरचा विषय टाळला...शिवसनेच्या नेत्यांनी काम फत्ते झाल्याच्या आविर्भावात प्रसारमाध्यमांना सर्व माहिती दिली..पण अणु ऊर्जेसारख्या गंभीर विषयावर शिवसेनेच्या त्या संबंधित लोकांना तरी किती माहिती आहे याचा त्यांनीच विचार करायला हवा..! दुसरं असं की शिवसेनेचा जरी त्या प्रकल्पाला विरोध असेल तर त्यांनी राजकीय पातळीवर तो करावा.. त्यासाठी अनिल काकोडकर सारख्यांना बोलण्यास मज्जाव करून काय साध्य होणाराय..? का उठसुठ आम्हाला पटत नाही म्हणून, तुम्ही हे करु नका ते करु नका..नाहीतर आमच्या स्टाईलनं धडा शिकवू ही भाषा आता पुरे झाली..!

राज्यात मागच्या पाच सहा वर्षापासून विजेचं भारनियन हे प्रचंड प्रमाणात होत आहे..सरकारी आकडेवारीनुसारच बारा बारा तास विजेचं भारनियमन केलं जातय..प्रत्यक्षात ते त्यापेक्षाही जास्त असतं.. शेतीला पाणी देण्याचा प्रश्न आहे.. शेतीसाठी तर रात्रीच पाणी द्यावं लागतय. मागच्या पंधरा वर्षात एकही वीज निर्मिती प्रकल्प राज्यात उभा राहिलेला नाही असं असताना जैतापूरमध्ये १० हजार मॅगावॅटचा जो अणु ऊर्जा प्रकल्प उभा राहत आहे त्याला विरोध कसला करताय..कारण काय तर अणु ऊर्जा प्रकल्प हे घातक असतात. त्यासाठी हे मागच्या वर्षी जपानमध्ये झालेल्या अणु ऊर्जा प्रकल्पातील अपघाताचं उदाहरण देत आहेत..आणि काकोडकर हे अणु ऊर्जा प्रकल्प धोकादायक नाहीत हे सांगत आहेत.. ! हेच त्या शिवसेनेला पटत नाही..पण आपण विरोध कोणाला करत आहोत याची थोडी या लोकांनी माहिती घ्यावी..प्रकल्प उभा करायचा की नाही ते केंद्र आणि राज्य सरकार ठरवेल ना.. आणि तुमच्यात जर धमक असेल तर सरकारला जाब विचारा ना..! त्यांच्याकडे जाऊन विरोध करा..!! काकोडकरांना बोलण्यास मज्जाव करून जैतापूरचा प्रश्न सुटणार आहे का..?

राज्यातला विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी विधायक करुन दाखवायचे सोडून फक्त विरोध करायचा हे योग्य नाही..ज्या शिवसेनेचा अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध आहे त्यांनीच दाभोळच्या एनरॉन प्रकल्पालाही विरोध केला होता..पुढे काय झाले हे त्या विरोध करणा-यांनी थोडं पहावं आणि मग विरोधाची भाषा करावी..एकतर काही चांगलं करायचं नाही, जे करतात त्यांना करु द्यायचं नाही, हे धंदे आता राज्यात थांबले पाहिजेत...स्वतःला समाजाचे ठेकेदार म्हणवणारे हेच शिवसेनेचे लोक कालपर्यंत व्हॅलेंटाईन डे ला विरोध करत होते..राडेबाजी करुन ग्रिटिंगची दुकानं फोड. बागेत बसलेल्या जोडप्यांना चोप दे असले उद्योग करणारे हे महाभाग याच वर्षी झालेल्या व्हॅलेटाईन डे ला कुठे होते..? कारण सोप्पं आहे. यावेळी महानगरपालिकांच्या निवडणुका होत्या आणि मोठ्या प्रमाणात असलेल्या तरुण मतदाराला त्यांना दुखवायचं नव्हतं म्हणून त्यांनी विरोध केला नाही..त्यातच त्यांचे युवा सेनापती अजून कॉलेजात जातात त्यांच्या भवितव्याचा विचार करुन व्हॅलेंटाईनच्या विरोधाची तलवार त्यांनी मान्य केली..आज व्हॅलेंटाईनचा विरोध माळवलाय..कारण त्यात त्यांना फायदा दिसू लागलाय..विरोध केला तर युवराजांचे भवितव्य धोक्यात येऊ शकतं म्हणून तरुण वर्गाला दुखावण्याचं त्यांनी टाळलं..उद्या जैतापूरप्रश्नी काही तोडपाणी झालं की त्याचाही विरोध मावळणार..पण ती वेळेयेईपर्यंत ही तालिबानी पद्धत का..? लोकांना त्याचा जो हकनाक त्रास होतोय तो थांबवायला नको का...? सेनेचं नवं नेतृत्व त्यातही लक्ष घालेल आणि उगाचच विरोधाला विरोध न करता योग्य त्या ठिकाणी आपली शक्ती वापरेल अशी अपेक्षा करुयात..

दुसरं असं की राज्यात आज विजेचा प्रचंड तुटवडा आहे..राज्य अंधारात असताना ऊर्जा प्रकल्पांना विरोध करणं आपल्या हिताचं नाही हे महाराष्ट्रानं एनरॉन प्रकल्पाला विरोध करुन अनुभवलंय. एका एनरॉनला विरोध केला त्यानंतर राज्यात पुन्हा कोणत्याच विज निर्मीती कंपनीनं गुंतवणुक केलेली नाही..त्याचे चटके राज्याला मागच्या दहा वर्षापासून बसत आहेत..त्याचा आपण बोध घ्यायला हवा..पण पुन्हा तोच कित्ता गिरवला तर हे राज्य अंधारात जाईलं आणि पुन्हा कोणीही महाराष्ट्रात विज प्रकल्पात तरी गुंतवणुक करण्यास धजावणार नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं.. त्यामुळे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा राज्याच्या हिताचा आहे..त्याला विरोध न करता तो लवकरात लवकर कसा पुर्ण होईल आणि आणखी ऊर्जा प्रकल्प राज्यात कसे येतील यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी शिवसेनेनं सरकारवर दबाव टाकावा आणि राज्य विजेच्या लख्ख प्रकाशात न्हाऊन निघेल याकडं लक्ष दिलं तर जनता त्यांनाही धन्यवाद देईलं...

4 comments:

  1. Completely agree !!!
    But why Maharashtra selected for this project ?
    They can select Orissa( already used for testing of our weapons) or AndhraPradesh(have many place where density of population is less than Maharashtra)
    Its not lyk I am supporting shivsena but can government assure that the project will be completed with 100 % safe and shock proof ?
    because if 0.1 % negligence made while building the project then we(people of Mumbai,Ratangiri,Pune,Kolhapur,Sindhudurg)will first suffer radiation and after this all ministers and the government people will run from this state.
    Who will assure there will be no corruption while building this project ?
    What if they made any adjustment while building this project by taking bribe ?

    If Japan can make mistakes then we will make 100 % mistake while building this project.

    I am sure about technology, but what about the people who is going to implement this ?

    After 2G,Adarsh,commonwealth government has loose there caliber for building any big projects.

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद..

      Delete
  2. शिवसेनेचा जैतापूरच्या अणु ऊर्जा प्रकल्पाला हया प्रकारे विरोध करणे चुकिचे आहे ,परंतु सेनेने अणु ऊर्जा सारखे प्रकल्प मानवी जीवनाला किती धॊकादायक आहेत हे राज्यातील जणतेस पटवून दिले पाहिजे आणि मगच राज्यव्यापि आंदोलन झेडले पाहिजे.तसेच राज्यसरकारने देखिल लोकभावनेचा विचार केला पाहिजे.स्थानिक जनतेचा प्रकल्पाला विरोध असताना देखिल प्रकल्प सत्तेच्या जोरावार रेटने म्हणजेच हे मोगलाईचे लक्षण आहे,नारायण राणे,भास्कर जाधव सारखे नेते जे आपल्याला कोकणचे सुपू्त्र म्हणवतात त्याना कोकनी जनतेने नगरपरिषद निवडनुकित जागा दाख़वून दिली आहे.आनी आता आपली राजकिय ईभ़त वाचविण्यासाठी स्थानिक जनतेत दहशत पसरवुन प्रकंल्पाचे काम कोणत्याहि परिस्थित सुरु कारण्याचा केविलवाना प़यंत्न सुरु आहे.राज्यातील बड्या नेत्यांनि प्रकंल्पासोबत लोकभावनेचाहि विचार व आदर करनेही तेवडेच जरुरीचे आहे.राज्य सरकार येत्या काही दिवसात साम दाम दंड भेद बळाचा वापर करुन हा प्रकंल्प सूरु करणार हे मला आदीच माहित होत,ते फक्त स्थानिक स्वराज्य संस्था व पालिका निवडनूका संपण्याची वाट बघत होते.कारन मुंबई,थाणे मतदार संघात कोकणी मत्तांचा टक्का अधिक आहे आणि प्रकंल्पाच्या मूद्दाने सरकारच्या मतदानावार अजूनच फरक पडला असता,कारण परप़्रांतियांच्या लांगुलपनात मराठि माणूस त्याच्या पासून दुरावला होता.सरकार निवडनूकामुळेच प्रकंल्पाच्या मूद्दावर शांत बसली होती आणि आता बरोबर निवडनूका झाल्यावार आपले दात दाखवायला सुरवात केली.कोकणाला भारतातील कँलिफाँनिंया संबोधले जाते. महाष़्टात कुठेहि नसेल ईतकी निसग़ॅ संप्पनता कोकणात आहे,पयैंटन व्यवसायाला येथे भरपूर वाव असून,येथील जनतेला रोजगार निमिंतीचे योग्य साधन आहे.या निसग़ॅ संप्पंन कोकणाची वाट लावून आपली राजकिय व आथिंक पोळी भाजण्याचे काम स्थानिक नेते मंडळी करत आहेत,निसग़ाँने भरुन दिलेल्या कोकणाची अशी वाट लागत असताना,कोणाहि मराठि जनतेला आनंद होणार नाही,आणि असे झाल्यास जनता या सरकारला माफ करनार नाहिच,पण ह्य़ा भ़ष्ट राजकारण्यांना आपली जागा दाखवल्याशिवाय राहनार नाही,राज्यात भारनियमन,महागाई आणि संपूणँ राज्यातच नव्हे तर पुण्यासारख्या शहराला ऐन फेब़ुवारीत पाणी टंचाईने वेढले आहे,तेव्हा काय करत होते पुण्याचे पालकमंञ़ी व राज्याचे उपमुंख्यमंञ़ी,राज्यातील जनतेचा संय्यमाचा बांध सुटत चालला आहे.जैतापूरच्या अणु ऊर्जा प्रकल्पाल प़श्ऩ अजून ज्वलंत होणार आहे आगामि काळात ते दिसेलच सवाँना. ज्येष्ठ अणु शास्त्रज्ञ अनिल काकोडकर हयाच्या बद्दल आदरच आहे सवाँना पण त्यानिहि साथ द्यावी सरकारची हे महारा्ष्ट़ाचे दूभाँग्य. लेखाबद्दल म्हणाल तर योग्य टोला दिला आहे शिवसेनेला, महारा्ष्ट़ाबद्दल प़ेम असेल तर या मुद्दयावार स्वता:उध्दव ठाकरेंनी रस्त्यावर उतरले पाहिजे.

    अमोल चं. हरयाण
    !!मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा!!

    ReplyDelete
  3. खूपच विस्तृत प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद..
    जैतापूर विषयाच्या दोन्ही बाजू मांडण्याचा केलेला हा
    एक छोटासा प्रयत्न आहे एवढचं..

    ReplyDelete