Monday, February 27, 2012

केजरीवाल..! जरा सांभाळून बोला..!!!

संसदेत लुटारु, बलात्कारी आणि दरोडेखोर बसलेले आहेत, त्यांच्याकडून जनलोकपाल विधेयक पास होईल याची तुम्ही अपेक्षा कशी काय करु शकता ? हे शब्द आहेत याच देशातले महनीय,आदरनिय श्रीयुत अरविंद केजरीवाल यांचे..आता हे केजरीवाल कोण ? हे आपल्याला सांगण्याची गरज नसावी…. ओळखलं ना..! अगदी बरोबर, आपले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या खांद्याला खांदा लावून लोकपालच्या लढाईत जी कोणी दोन-चार टाळकी सतत टीव्हीसमोर बडबड करत असतात त्यातलेच हे एक विद्वान महाशय..! दुस-या शब्दात आणि अगदीच स्वच्छ मराठीतच सांगायचं झालं तर अण्णांच्या टोळीतले हे एक दिडशहाणे...मी त्यांच्याबाबत एवढी विशेषणं का वापरलीत हेही सांगून टाकतो..जनलोकपाल विधेयकासाठी अण्णांनी जो लढा उभा केलाय त्यात किरण बेदी, प्रशांत भूषण ही मंडळी आहेत..हे विधेयक पास व्हावं ही आमचीही इच्छा आहे..त्यासाठी लढा देणं, आंदोलन करणं ही लोकशाहीतली हक्काची हत्यारं आहेत. पण त्याचा वापर करताना इतारांचा आदरही राखलाच गेला पाहिजे...ज्या संसदेत आपण आपले प्रतिनिधी निवडून पाठवतो त्यांच्याबद्दल ही कसली भाषा..? तेसुद्धा याच समाजातलेच आहेत.आपणच त्यांना निवडूण देतोय..त्यांच्याबदद्लची भाषा वापरताना संयम हवा..! त्यांच्याबद्दल काय कोणाही दुस-या व्यक्तीबदद्ल जाहीरपणे अशा प्रकारची व्यक्तव्य करण्याचा अधिकार ह्या केजरीवालला कोणी दिला..? तो कोण दिडशहाणा लागून गेलाय काय ? अशा व्यक्तव्याची आणि त्या व्यक्तीची जेवढी निंदा करावी तेवढं कमीच आहे...त्यामुळे अरविंद केजरीवाल, बोलताना थोडा लगाम घाला आपल्या जिभेला, नाहीतर तीच जीभ हासडून कोणी भटक्या कुत्र्यासमोर टाकून देतील हे लक्षात घ्या...

लोकपाल विधेयकाच्या लढ्याला लोकांचा पाठिंबा आहे तो अण्णा हजारे यांच्यासारख्या प्रामाणिक व्यक्तीमुळे हे तुम्ही विसरु नका..पण अण्णांनीही अशा लोकांना तंबी द्यायला हवी.. कारण तुम्ही गांधीवादी म्हणवता आणि अशा शब्दांचा वापर करणा-यांना पाठीशी घालता हे ना तुम्हाला शोभते ना आपल्या संस्कृतीला...यापूर्वीही किरण बेदी यांनी खासदारांबदद्ल अपमानास्पद शब्द काढले होते..अण्णांनीही शरद पवारांना एका माथेफिरुनं दिल्लीत चापट मारली तेव्हा दिलेली प्रतिक्रिया लोकांना आवडली नाही...त्यामुळं इतरांबद्दल आपण आदराची भाषा वापरावी यातच तुमचं भलं आहे...

खरं तर जनलोकपाल विधेयक पास झालं म्हणजे या देशातला भ्रष्टाचार संपेल या स्वप्नात तुम्ही जे वावरत आहात तेच मुळी चुकीचं आहे. या देशात आजही अनेक कडक कायदे आहेत. त्याचा वापर करुनही शिक्षा देता येते...फक्त कायदे करुन त्या समस्येवर मात करता येत नाही हे आपण दहशतवादीविरोधी जो पोटा कायदा केला होता किंवा हुंडा विरोधी कायदा केला होता यावरुन आपण पाहिलेले आहे..उलट त्या कायद्यांचा दुरुपयोगच जास्त झाल्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे कायदा कडक करुन चालत नाही तर त्याची अंमलबजावणी योग्यरितीनं व्हायला हवी...हे झालं त्या लोकपालबाबत...

दुसरं असं की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही म्हणे हिरीरीनं प्रचारात भाग घेणार होता..! पण कुठं दिसले नाहीत तुम्ही लोक..? कुठल्या बिळात जाऊन बसला होता तुम्ही हे लोकांना सांगा ना...! अण्णांची तब्बेत ठिक नव्हती म्हणून ते उपचार घेत होते..मग तुमचे ते बाकीचे अतिशहाणे सदस्य काय तुमचे पाय आणि डोकं चेपत होते काय...? महाराष्ट्रातही जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुका झाला पण तुमच्यापैकी कोणीही प्रचाराला फिरकले नाहीत...कुठे आफ्रिकेच्या सफरीवर गेली होती की काय तुमची टोळी. ? त्यावेळी तुमचा आवाज गप्प का होता आणि आता निवडणुकीचा माहौल संपला की तुमची वटवट सुरु झाली याला काय म्हणायचे....

राजकीय लोकांना शिव्या घालताना तुम्ही तुमच्याकडे का नाही पहात...? त्यांना भ्रष्टाचारी, लुटेरे म्हणताना आपण काय धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहात काय...? सांगा ना जनतेला त्या किरण बेदीनं विमानप्रवासाच्या नावानं पैसे लुटले ते...आणि ते प्रशांत भूषण आणि त्यांचे पिताश्री शांतीभूषण यांनी कमावलेल्या संपत्तीचे काय...? कुठन आली त्यांची एवढी संपत्ती..? लोकांना काय तुम्ही दुधखुळे समजता काय...? दुस-याला दुषणं देण्यापूर्वी आपण आपल्याकडे पहावं, आपण किती स्वच्छ आहोत आणि नंतरच इतरांना दोष द्यावा..! मग तुमच्या संपत्तीवर तुम्ही सारवासरव करुन आपण बुवा नाही त्यातले हे सांगण्याचा आटापीटा करता हे कशासाठी...? त्यामुळे तुम्हालाही दुस-यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही..

लोकपाल विधेयकासाठी तुम्हाला जे काही तुणतुणं वाजवायचं ते तुम्ही खुशाल वाजवा पण ते वाजवत असताना तुमच्या भाषेला थोडा लगाम असू द्या नाहीतर आज जे लोक तुम्हाला पाठिंबा देत आहेत तेच लोक तुमच्या तोंडात शेण घालायलाही मागंपुढं पहाणार नाहीत हे विसरु नका.. खासदारांना नावं ठेवताना, त्यांच्यावर आरोप करताना पातळी आणि मर्यादा सोडू नका.. कारण त्यांना निवडून देणारीसुद्धा तीच जनता आहे जी तुम्हाला पाठिंबा देत आहे. त्यांचा अनादर करण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही..म्हणून यापुढेही तरी आपण लक्ष्मणरेषा ओलांडू नका हीच तमाम लोकांची इच्छा आहे एवढचं आता सांगणं आहे...

धन्यवाद..

No comments:

Post a Comment