Friday, February 24, 2012

भ्रष्टाचाराचे ताजे उदाहरण- कृपाशंकरसिंग

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकरसिंगांच्या बेनामी संपत्तीवर अखेर मुंबई उच्च न्यायालयानं हातोडा फिरवलाच.. जे काम पोलिसांच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचं आहे ते काम त्या पथकानं चोख पार पाडलं नाही म्हणून शेवटी न्यायालयाला ते करावं लागलं..मुंबई पोलिस आयुक्तांनीच कृपाशंकर यांच्या संपत्तीचा तपास करावा असे आदेश देत त्यांची मालमत्ताही जप्त करण्याचे आदेश न्यायालयानं दिले..यामुळे त्यांचे पक्षांतर्गत विरोधक तसच विरोधातले काहीलोक मात्र सुखावलेत.. लगेचच कृपाशंकर यांनी मुंबई प्रदेश काँग्रेसचा राजीनामा दिल्याचं समजलं.. पण तो तर कोर्टाच्या निर्णयाअगोदरच दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानं संभ्रम वाढला.. आणि कारण देण्यात आलं की मुंबईत काँग्रेसचा पराभव झाला, त्याची नैतिक जबाबदारी स्विकारून कृपाशंकरसिंग यांनीच राजीनामा दिला होता.. तो स्विकारण्यात आलाय अशी सारवासारव काँग्रेसमधून करण्यात आली.. पण नैतिकतेच्या या गप्पांवर आता गल्लीतलं शेंबडं पोरगही विश्वास ठेवणार नाही..

राजीनाम्याचा विषय वेगळा आहे.. आज जो विषय आहे तो या कृपाशंकरांनी अल्पावधितच कमावलेल्या गडगंज संपत्तीचा...जो माणूस कांदे-बटाटे विकून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याच्याकडे राजकारणातली मोठी पदं आणि तेवढ्याच मोठ्या रकमेची संपत्ती आली कुठून. राजकारणात आजकाल एखादा नगरसेवकही रग्गड पैसा कमावत.. हे काही गुपित राहिलेलं नाही..पण म्हणतात ना घराचे वासे फिरले की घरही फिरतं..! तसाच काहीसा प्रकार कृपाशंकर यांच्याबाबतीत झालाय. ते उत्तर प्रदेशातून मुंबईत आलेले आणि सामान्य पदापासून थेट १० जनपथपर्यंत संपर्क ठेवण्यापर्यंत ते यशस्वी झाले. हा त्यांचा प्रवास चित्रपटातल्या कथेसारखा आहे..कृपा यांना दिल्लीतला आर्शिवाद असल्यामुळे ते अगोदर विधानपरिषद नंतर विधानसभा करत गृहराज्यमंत्रीही झाले. त्यांनंतर ते मुंबई काँग्रेसचे अद्यक्ष झाले. या त्यांच्या प्रवासात त्यांनी भरपूर माया जमा केली.. गृहराज्यमंत्री असताना त्यांनी पत्नीच्या नावावर कोकणात २२५ एकर जमीन घेतलीय. या जमिनीची किंमतही २५ कोटीच्या पुढे आहे. त्यातही काही शेतक-यांना फसवल्याच्या तक्रारी आहेत. तसच मुंबईत मोक्याच्या ठिकाणी अलिशान फ्लॅट त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर आहेत.. जवळपास दहा-बारा बँक खात्यातला व्यवहारही कोटींच्या घरातच आहे...अशी ही कोटींची उड्डाणं होत असताना त्याकडे कुणी फारसं लक्ष दिलं नाही..पण झारखंडचे मुख्यमंत्री मधू कोडा हे खाण उद्योगातल्या घोटाळ्यात तुरुंगात गेले तेंव्हा त्याचे धागेदोरे कृपाशंकरसिंग यांच्यापर्यंत येऊन पोचले..पण दिल्लीपर्यंत काँग्रेसची सत्ता असल्यानं तसच कृपाशंकर यांच्यावर मोठी "कृपा" असल्यानं पोलिसांचे लंबे हात त्यांच्यापर्यंत पोचू शकत नव्हते.. पोलीस, अँटी करप्शनमध्ये तक्रारी देऊनही त्यांची दखल घेतली नाही.. विधानसभेतही प्रश्न गाजला..पण चौकशीच्या फार्सपलिकडे काही झालं नाही..एसीबीला तपास करण्यास सांगितलं तरी सत्तेच्या वर्तुळात दिल्लीतूनच मोठी "कृपा" असल्यानं मुंबईतला तपास हा नावापुरताच होता..पण शेवटी हे प्रकरण एका याचिकार्त्यानं उच्च न्यायालयात नेलं तेंव्हा कुठं कृपाशंकरसिंग यांना दणका बसला..!

कृपाशंकरसिंग यांचे मुंबईत अनेक मोक्याच्या ठिकाणी फ्लॅट्स, ऑफीस, दुकानांचे मोठे गाळे आहेत..ते त्यांना ज्या बिल्डरांनी दिले. त्यांनाही कृपाभैयांची "कृपा" लाभली होती..मुंबईतल्या मोक्याच्या जागा बिल्डरांच्या पदरात पाडून द्यायच्या आणि त्याबदल्यात त्यांना मोठा मलिदा मिळत होता. हे सत्य आता बाहेर आलय. याच संबंधातून मिळवलेला पैसा सत्तेत बसलेल्या त्यांच्या खास माणसांना आणि दिल्लीतून त्यांच्यावर "कृपाछत्र" धरणा-या नेत्यांपर्यंत पोचवला जात होता.. म्हणूनच या भैयाच्या चौकशीला कुणी जात नसे.पण शेवटी न्यायालयानं चौकशीबरोबरच संपत्ती जप्त करण्याचेच आदेश दिल्यानं त्यांचे धाबे दणालेत..आता पोलिस आयुक्त चौकशी करतील, पण त्यातूनही ते कितपत सत्य बाहेर आणतात, का यापूर्वी एसीबीनं केलेल्या चौकशीतून पळवाटा दाखवून कसं सोडवण्यात आलं होतं तसच होणार हे लवकरच कळेल...! कारण बेनामी संपत्तीचा छडा लावणं सोप काम नसतं ! कारण ते असतानाच बेनामी असतं...त्यातूनच थोडीफार संपत्ती त्यांच्या नावावर निघालीच तर त्यावर कर भरून पुन्हा एकदा ते मोठ्या दिमाखानं वावरु लागलीत..त्यासाठी त्यांच्यावर कृपाछत्र असलेले नेते. त्यांच्याच पक्षाची मुंबई आणि दिल्लीत असलेली सत्ता मदतीला येईलंच..! कायद्याच्या पळवाटातून त्यांना सहिसलामत बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न होणारच. कारण हे कृपाभैया जर तुरुंगात गेले तर त्यांच्याकडून ज्यांना ज्यांना माया मिळालीय त्यांचं पितळ उघडं पडेल ना..! त्यामुळे कृपाशंकर यांना वाचवण्याचा प्रयत्न नक्की होणार...

कृपाशंकर यांच्याकडे असलेल्या संपत्तीचा आकडा तीनशे कोटीपर्यंत असल्याचं म्हटलं जातय. पण हा आकडा ऐकून पोटात आकडा आला नाही..यापेक्षा मोठे आकडे ऐकण्याची आपल्याला सवय झालीय...टू जी स्पेक्र्टम, अँट्रीक्स-देवास डिल, राष्ट्रकुल घोटाला यांचे आकडे मोजताही येणार नाहीत एवढे मोठे आहेत..त्यामानानं कृपाभैयांचा आकडा कमी...आपल्यालाही आता अशा भ्रष्ट लोकांची प्रकरणं उजेडात आली तरी फारसं नवल वाटत नाही.. कारण सगळीकडेच भ्रष्टाचार बोकाळलाय. त्यामुळे कुणाला दोष देऊन काय फरक पडणाराय अशीच आपली अवस्था झालीय...असे अनेक कृपा राजकारणात पावलोपावली आढळतात...नंतर ते कायद्याच्या आणि सत्तेतल्या लोकांच्या मदतीनं बाहेर पडतात आणि पुन्हा खेळ सुरु...! कृपाशंकरही यातून बाहेर पडतील..त्यांना बाहेर पडायला तशी मदत केली जाईलं आणि "राजकीय व्देषातून" माझ्यावर आरोप करण्यात आले होते असं नेहमीचं पालुपद गात कृपाशंकर पुन्हा उजळ माथ्यानं राजकारणात सक्रीय होतील हे न समजण्याएवढी जनता आता खुळी राहिलेली नाही..त्यामुळे आज कृपाशंकर तर उद्या दुसरा कोणी नारोशंकर एवढात काय तो फरक असेल....

1 comment: