Thursday, February 23, 2012

सोलापूरी चादर आणि बेडशिट

सोलापूर शहर हे महाराष्ट्रातलं एक महत्वाचं शहर आहे...चप्पल म्हटलं की जसं कोल्हापूरचं नाव येतं तसं चादर म्हटलं की आपसुकच सोलापूरचं नाव येतं.. त्यामुळचं सोलापूरी चादर, बेडशीट आणि टॉवेलसाठी या शहराचं नाव आहे..महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या अनेक भागातले व्यावसायिक तसच ज्यांचा सोलापूरशी काही ना काही कारणानं संबंध आलाय ते आवर्जून सोलापूरी चादरीचा आग्रह धरतात.. तुम्ही जर सोलापूरला भेट देणार असाल किंवा तुळजापूर, अक्कलक्कलकोट, गाणगापूर, विजापूर, हैदराबादला भेट देणार असाल तर तुम्हाला सोलापूरातून जावं लागेल..त्यात जर स्वताच्या वाहनानं जाणार असाल किंवा सोलापूरात हॉल्ट घेणार असाल तर, एकदा सोलापूरच्या चादरी आणि टॉवेल्सच्या शोरुम्सना जरुर भेट द्या.. ! त्यातच तुम्ही जर सोलापूर शहराच्या पूर्व भागात गेलात तर तुम्हाला मनसोक्त खरेदीचा आनंद लुटता येईलं... कारण याच भागात चादर- टॉवेल्सच्या कंपन्यांची शोरुम्स आहेत..शहराच्या इतर भागात आणि मुख्य बाजारपेठेतही या चादरी तुम्हाला मिळतातच..पण खरेदीचा आनंद लुटायचा असेल तर या पूर्व भागातल्या शोमरुम्सनाच भेट द्या...!! पुलगम, चाटला, कोंडा, क्षिरसागर, गांगजी अशी अनेक नावं घेता येतील..! कोणत्याही शोरुमला भेट द्या..! तुम्ही चादर, टॉवेल, बेडशिट्स यांचा खजाना पाहून चाट पडाल.. तुम्हाला शॉपींगचा कंटाळा येत नसेल तर मनसोक्त वेळ काढा आणि या दुकानांना भेट द्या..

सोलापूरी चादरींचा दर्जा एकदम उत्तम आहे..अगदी २०० रुपयापासून ५०० रुपयापर्यंत तुम्ही एक चादर घेऊ शकता..अनेक व्हरायटी आणि रंगसंगतीच्या चादरी तुम्हाला इथं मिळतील. मयुरी पंखी चादर ही तर सोलापूरी चादरीची खासियतच आहे.. त्यानंतर बेटशिटच्यासुद्धा अनेक व्हरायटी तुम्हाला मिळतील.. टॉवेल म्हटल्यावर कॉटनच्या टॉवेलपासून टर्किश टॉवेलपर्यंत सर्व प्रकारचे टॉवेल्स तुम्हाला आवडतील असे आहेत..लुंगी हा दक्षिणेतला प्रकार असला तरी आपल्याकडेही अनेकजण लुंगी वापरतात..रंगीत लुंगीचे प्रकारही खूप प्रमाणात तुम्हाला पहायला मिळतील.. माझं हे सर्व वर्णन वाचत असतानाच तुमच्या डोळ्यासमोर सोलापूर चादरीचं शोरुम उभं राहिलं असेल..! हे लिहित असताना माझ्या डोळ्यासमोरही सोलापूरातली १०-१५ शोमरुम्स उभी राहिली... खरंच तुम्ही प्रेमात पडावं अशा उत्तम दर्जाची, रंगाची आणि पाहताच तुम्हाला ती खरेदी करावी असं वाटेल अशाच आहेत या सोलापूरी चादरी आणि टॉवेल्स...!

वस्त्रोद्योगातला चादर आणि टॉवेल निर्मिती हासुद्धा मोठा व्यवसाय आहे..सोलापूरच्या ज्या पूर्व भागाचा मी उल्लेख केला..त्या भागातून तुम्ही फेरफटका मारतानाही तुम्हाला पॉवरलुम्सचा आवाज कानी पडेल.. तर काही ठिकाणी रंग दिलेले धागे वाळत टाकलेले दिसतील..हा झाला छोट्या प्रमाणातला उद्योग...! तर शहराला लागूनच असलेल्या अक्कलकोट एमआयडीसीतसुद्धा अनेक लहान मोठ्या कारखान्यातून या चादर आणि टॉवेल निर्मीतीचा खडखडाट तुम्हाला ऐकायला मिळेल....हा उद्योग जरी सोलापूर शहरात असला तरी तो प्रामुख्यानं तेलुगु भाषिक लोकांचा व्यवसाय आहे. वर मी ज्या काही नावांचा उल्लेख केला त्यावरुनच तुमच्या लक्षात आलं असेल की, ही काही मराठी नावं नाहीत..ती सर्व तेलुगु भाषिक लोकं आहेत.. अनेक वर्षापूर्वी त्यांनी या शहरात ह्या उद्योगाची पायाभरणी केली आणि आजही ते हा उद्योग टीकवून आहेत.. सोलापूरात तयार होणा-या या चादरी आणि इतर माल हा देशभरातल्या बाजारपेठात तर जातोच पण मोठ्या प्रमाणावर त्याची निर्यातही होते...सोलापूरी चादर, बेडशीट आणि टॉवेलला परदेशातूनही मोठी मागणी आहे. म्हणूनच या सोलापूरी चादरीची चमक आजही टीकून आहे..

एक व्यवसाय म्हणून त्यांच्यासमोर आज अनेक अडचणी आहेत..करांचा वाढता बोजा. कामगारांचा पगार, विजेचे भारनियमन, सुताचे वाढलेले दर, व्हॅट यामुळे हा व्यवसाय राहतो की काळाच्या ओघात बंद पडतो अशी अवस्था झालीय. यातून सरकारनं काही कर सवलती दिल्या, वीजेचा मुबलक पुरवठा केला तर हा उद्योग टिकेलच पण त्यात वाढही होईलं.. तसच निर्यातीला चालना देऊन विमानसेवाही सुरुळीत सुरु केली तर सोलापूरची शान असलेला हा उद्योग आणखी भरारी घेईल...त्यासाठी गरज आहे ती सरकारी पातळीवर प्रयत्न होण्याची. सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय उर्जा मंत्री आहेत. ते मागची ३५ वर्षे सत्तेत वेगवेगळ्या पदावर आहेत..तर शरद पवार हे केंद्रीय कृषीमंत्री आहेत.. हे दोघेही सोलापूर जिल्ह्यातून खासदार म्हणून निवडून आलेत. त्यांनी यात लक्ष घातलं तर हा उद्योग तग धरु शकेल आणि तसं झालं तर सोलापूर चादरीचा रंग फिका पडणार नाही...

पण व्यवसाय टीकवण्याची त्या- त्या घटकांची जबाबदारी आहेच..पण सध्या तरी हा उद्योग सुरु आहे, त्यामुळे तुम्ही सोलापूरला भेट दिलीच तर थोडा वेळ हा चादर, बेडशीच्या शॉपिंगसाठी द्या... आणि समजा तुम्हाला जाणं शक्यच नसेल तर तुमचे सोलापूरचे जे मित्र आहेत आणि तुमच्याबरोबर कामाला किंवा शेजारी रहायला असतील किंवा जवळचे नातेवाईक असतील तर त्यांना सांगा... येतोच आहे तर आमच्यासाठी काही चादरी आणि बेडशिट घेऊन ये बाबा.... मला खात्री आहे..तुम्हाला त्या नक्कीच पसंत पडतील.. मग काय घेणार ना आमच्या सोलापूरी चादरी...!!!!

1 comment:

  1. शहाजी वाघमोडेThursday, June 18, 2015 at 1:42:00 PM GMT+5:30

    सोलापूरच्या चादरी एकदम मजबूत आहेत फाटता फाटत नाहीत, कधी एकदा छिद्र पडेल,फाटेल असे वाटते

    ReplyDelete