Monday, February 20, 2012

राज ठाकरेंनी "करुन दाखवलं..”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महानगरपालिका निवडणुकात मिळवलेल्या यशानं या पक्षाची घौडदौड दिसून आलीच पण त्याची दखलही आता इतर पक्षांना घ्यावी लागणाराय..आजपर्यंत फक्त मुंबईतच शिवसेनेला मनसे जड जाईल असं म्हटलं जात होतं. पण दहा महानगरपालिकांमधल्या निकालाचं विश्लेषण पाहिल्यास मनसे हा पक्ष शिवसेनेला जेवढा धोका ठरु पहातोय, तसाच तो काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपलाही जड जाणार हे निकालावरुन स्पष्ट दिसतय..मुंबईत मनसे किंग मेकर ठरली नसली तरी त्यांनी २८ जागा जिंकून सगळ्याच पक्षांना आश्चर्यचकित केलय. या सर्व जागा काही शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करुन जिंकलेल्या नाहीत तर त्यातल्या अनेक जागा त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव करुन जिंकल्यात. हे झालं मुंबईचं..! पण पुणे नाशिकमधले निकाल काय सांगतात...? पुण्यात राष्ट्रवादीचे वजनदार नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकहाती सत्तेसाठी खूप जोर लावला..! काँग्रेसकडे सुरेश कलमाडी नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा फायदा होईल असा होरा होता..पण मनसेच्या इंजिनानं राष्ट्रवादीच्या घडाळ्याची टीक टीकही थांबवली..तब्बल २९ जागा जिंकत भाजप, काँग्रेसलाही मनसेनं मात दिली..मनसे हा पुणे महानगरपालिकेत विरोधी बाकावर बसणारा पक्ष ठरलाय. त्यामुळे अजित पवार यांनाही आता कलमाडी नाही तर राज ठाकरेंच्या इंजिनाची धास्ती आहे..नाशिकमध्ये तर मनसेनं कमालच केलीय.शिवसेना भाजपची दहा वर्षाची सत्ता उलथवून टाकलीय. दुसरीकडं छगन भुजबळांची सुभेदारी ठरलेल्या नाशिक महापालिकेत त्यांनाही सत्तेपासून कोसो मैल दूर फेकलंय. स्वतः छगन भुजबळ, पुतण्या समिर आणि सगळीशक्ती पणाला लावूनही राज ठाकरेंच्या मनसेनं सगळ्यांची स्वप्नं धुळीस मिळवली...राजकीय गणित जुळलं तर मनसेचा महापौर नाशकात होऊ शकतो..त्यासाठी भाजपानंही पाठिंबा देण्यासाठी अनुकुलता दर्शवलीय...

हे झालं महानगरपालिकांतले निकाल..!! तिकडं जिल्हा परिषद निवडणुकीतही मनसेनं अनेक जिल्ह्यात खातं उघडलय. अगदी यवतमाळ, चंद्रपूर, नागपूरातही त्यांच्या पक्षाचे एक दोन उमेदवार निवडून आलेत..तर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मराठवाड्यातही मनसेच्या इंजिनानं इतर पक्षांची झोप उडवलीय. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या८ तर इतर जिल्ह्यात २ अशा १० जागा जिंकत मनसेनं मराठवाड्यात आपली चुणुक दाखवलीय. औरंगाबाद जिल्हा परिषदेतल्या शिवसेना भाजप युतीच्या सत्तेला मनसेनं खाली खेचलय. आता जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करायची तर मनसेची मनधरणी करावीच लागणाराय..तर चार महिन्यापूर्वीच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीतही मनसेनं कोकणातल्या खेड नगरपालिकेत सत्ता आणलीय. हे खेड शिवसेनेचे आमदार आणि माजी विरोधीपक्ष नेते रामदास कदम यांचा मतदारसंघ आहे..तर मागच्या वर्षी झालेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतही शिवसेनेला विजयासाठी झगडावं लागलं होतं. तिथं मनसेनं दैदिप्यमान कामगिरी केलीय..कल्याणमध्ये शिवसेनेला घाम आणला तर डोंबिवलीत भाजपच्या उमेदवारांना विचार करावा लागेल अशी कामगिरी केलीय.

मनसेचं हे विजयाचं चित्र पाहताच एक गोष्ट आपल्या लक्षात येईलं ती म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या टप्प्यात हा पक्ष वेगानं वाढतोय. याच टप्यात विधानसभेच्या २८८ जागांपैकी जवळपास १२५ जागा आहेत. त्यावर मनसेनं जोर लावलाय. मनसेचा यशाचा हा वाढता आलेख पहाता, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला चांगलं यश मिळू शकतं असा अंदाज आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीतही १२ जागा जिंकून मनसेनं सर्व पक्षांना विचार करायला लावलेलाच आहे. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मनसेनं प्रगतीच केलीय. त्यामुळे राज्यात मनसेच्या रुपानं एक नवा पर्याय उभा राहू पहातोय. त्यामुळे भविष्यात मनसेबरोबर सत्तेत भागिदारी करण्य़ासाठी नवी समिकरणं जन्माला येऊ शकतात. शिवसेना-भाजप युती आहेच. त्यांना रामदास आठवले जाऊन मिळालेत.तर दुसरीकडं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहे. आत्ताचं हे चित्र भविष्यात बदलूही शकतं..त्यामुळे मनसेबरोबर भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसनं हात मिळवल्यास नवल वाटायला नको..त्यासाठी थोडा अवधी आहे..पण हे घडू शकत नाही असं कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. कारण राजकारणात काहीही होऊ शकतं..सत्तेचं गणित जुळवताना इतर पक्षांची मदत ही घ्यावीच लागते, त्याशिवाय सत्तेची खूर्ची सहज मिळणं शक्य नाही..त्यातच सध्या कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळेल असे दिवस राहिलेले नाहीत..

शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष काढला त्याला सात वर्षे झाली..या सात वर्षात मनसेनं मागं वळून पाहिलेलं नाही.त्यांच्याकडे राज ठाकरे हेच एकमेव शिलेदार आहेत.त्यांच्याच करिश्म्यावर हे सगळं यश मिळत आहे. या पक्षाला मिळत असलेला पाठिंबा हा युवा वर्गातून आहे. तरुण वर्गाची मतदारसख्याही वाढतेय. तसच महिलांचाही या पक्षाला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळेच उद्याच्या विधानसभेसाठी जर राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षानं संघटनेची बांधणी व्यवस्थित केली तर २०१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेतलं चित्र वेगळं असेल हे मात्र नक्की...तोपर्यंत मनसेला आमच्याही शुभेच्छा...!!!



No comments:

Post a Comment