Tuesday, February 14, 2012

लव्ह डे..तुमचा, आमचा आणि सर्वांचा

आज १४ फेब्रुवारी ..तरुणाईचा दिवस..प्रेम करणा-यांचा दिवस...पण आज प्रेमाच्या नावावर जे काही चाललय ते पहावत नाही..सगळेच काही तसे आहेत असं नाही पण जास्तीत जास्त प्रकरणात मात्र प्रेमाच्या नावाखाली काहीही चाललय असंच आहे..म्हटलं चला आज याच विषयावर काहीतरी लिहूयात..

१४ फेब्रुवारी हा प्रेमविरांचा आवडता दिवस..व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याचं हे फ्याड अलिकडच्या काही वर्षातच खूप माजलय..म्हणजे प्रेमाचा महिमा आत्ताच आलाय असं नाही. यापूर्वीही लोक प्रेम करतच होते. लांब कशाला आमच्याकडे हिर रांझा, लैला मजनू पासून ते अगदी वासू सपनापर्यंत कितीतरी अजरामर प्रेमकथा झाल्यात..इतिहासातच काय पूराणातही अनेक प्रेमकथा आहेतच की..मग हा १४ फेब्रुवारीच प्रेम साजरं करण्याचा दिवस मध्येच कुठून उपटला..? तो कोणी पाश्चिमात्य होता त्याच्या नावानं आपण का प्रेम दिवस साजरा करायचा..? आणि प्रेम व्यक्त करायला किंवा सेलिब्रेशनला हवा कशाला एकच दिवस ? वर्षभर दररोज प्रेम करा की, कोण अडवतं तुम्हाला...? पण प्रेमाच्या नावानं जो काही बाजार मांडलाय ना तो निंदनिय आहे. किती मोठाली अन् महागडी ग्रिटिंग कार्डस, काही गिफ्ट किंवा स्पेशल ट्रीटसाठी कशाला हवी पैशांची उधळपट्टी...! तरुण वर्गाला केंद्रस्थानी ठेवून झकास जाहीरातबाजी करायची आणि आपल्या तुंबड्या भरायची ही बाजारपेठ बंदच व्हायला हवी. ! त्याचा अर्थ प्रेमाला मी विरोध करतो असं नाही..पण त्याचं बाजारीकरण नको...

आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल जर तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायच्या तरी त्या ग्रिटिंग कार्डातल्या कोणितरी तिस-या व्यक्तीनं व्यक्त केलेल्या भावना काय तुम्ही पोचवता.. तुम्हाला स्वतः काही भावना नाहीत का..? त्याच तुम्ही सोप्या शब्दातही व्यक्त करु शकता ना.. मग कशाला हवा हा बिनकामाचा थाट.. त्यातून पैशाची उधळपट्टीच होतेय..ती थांबली पाहिजे.. तुम्ही जर एकमेकावर खरं प्रेम करत असाल तर ह्या बाजारू वस्तूंना काडीचीही किंमत नाही..त्या फक्त तुम्ही तुमच्या डोळ्यातूनही व्यक्त करु शकता.. दुसरं म्हणजे सध्या कॉलेजमधली तरुणाई आहे ती या दिवसाचा उपयोग कोणालातरी प्रपोज करण्यासाठी करतात.. त्यातून होकार-नकार जो काही येवो त्यातून ह्याचं प्रेम वगैरे सुरु होतं म्हणे..! १४ फेब्रुवारी काय प्रेमाचा मुहुर्त आहे काय...? आणि या १४ फेब्रुवारीला प्रपोज केलेलं किती दिवस टिकतं..? त्यामुळे प्रेमकरण्यासाठी असा काही दिवस वगैरे ठरवण्याची गरज नाही.. प्रेम करा वर्षभर, त्यासाठी १४ फेब्रुवारीसारखं पाश्चिमात्याचं अंधानुकरण करण्याची काही गरज नाही...

प्रेम कसं असतं हे कवीच्याच शब्दात सांगायचं झालं तर मंगेश पाडगावकरांची कविता आपण कितीतरी वेळा वाचलीय-ऐकलीय...त्यात आहेच की प्रेमाचा अविष्कार...हेच पहा पाडगावकर काय म्हणतात ते...

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं ! “

पाडगावकरांच्या या काही ओळीच सांगून जातात ना प्रेमाची महती काय आणि कशी आहे ती. पाडगावकर म्हणातात तसं अगदी मराठीतूनही प्रेम व्यक्त करता येतच की..त्यांनी त्यांच्या या कवितेतून काही १४ फेब्रुवारीचा मुहुर्त नाही सांगितला..तरीही प्रेमानं भरलेले आणि ऐकणा-याला भारावून टाकणारेच शब्द आहेत ते...

आणि प्रेम म्हणजे काय तर दोघांमध्ये आपलेपणाची भावना असली पाहिजे, परस्परांवर विश्वास असला पाहिजे, कोणत्याही परस्थितीत एकमेकाला साथ देता आली पाहिजे. नुसतं I LOVE U म्हणून किंवा डेटिंग करुन काही प्रेम वगैरे होतं नसतं. ते असतं फक्त तरुण वयातलं शारिरिक आकर्षण. त्यात कुठे दिसते उत्कट प्रेमाची भावना ? माझं हे लिखाण अनेकजणांना आवडणार नाही, पण हि वस्तूस्थिती आहे. नाहीतर १४ फेब्रुवारीला जिला प्रपोज करता तिचा नकार येताच तिच्यावर ऍसिड हल्ले झाले नसते. नकार दिला म्हणून त्या मुलीला बदनाम करण्याचे प्रकार झाले नसते..तुमच्या आजूबाजूला बघा कितीतरी उदाहरणं सापडतील तुम्हाला अशा प्रकारची. मग हा कसला व्हॅलेंटाईन..? हे कसलं प्रेम.? प्रेमाची महती पाडगावकरांच्या याच कवितेत पहा काय सांगितलीय ती...

प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं

या भावनाच प्रेम आहेत. त्या ज्यांच्यात असतात त्यांना गरज नसते कोणत्याही बाजारू प्रदर्शनाची आणि व्हॅलेंटाईनची...

तरी सुद्धा मी म्हणतो प्रेम करा..नाहीच जमलं तर प्रेम करणाऱ्यांना करु द्या..फक्त त्याचं उदात्तीकरण होऊ देऊ नका.त्यासाठी बाजारातल्या भेट वस्तूंची नाहीतर तुमच्या विश्वासाची, समर्थ आणि भक्कम आधाराची, योग्य साथ देण्याची गरज आहे. ते कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही. ते आपल्यात असायला हवं. आपल्या जोडीदाराला तो विश्वास वाटला पाहिजे. ते कुठं एकावर एक फ्रि मिळत नाही किंवा ५० टक्के डिसकाऊंट मध्ये मिळत नाही. ते सर्वस्वी आपल्या मनात असतं तेच व्यक्त करा...आणि कवी कुसुमाग्रजांच्या भाषेत सांगायचं तर....

मोरासारखा छाती काढून उभा राहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला. . .
तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा..

बसं एवढचं...

प्रेमाच्या बदलेल्या या व्याख्या आणि त्याचे परिणाम यावर प्रकाश टाकण्याचा केलेला आहे एक प्रयत्न आहे..तो काहींना आवडणारही नाही पण सत्य हेच आहे. फक्त ते पाहण्यासाठी डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे...बाकी सगळं सेमच आहे..

4 comments:

  1. प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं.
    धन्यवाद..प्रेम करा, प्रेमात जगा..एवढाच काय तो संदेश द्यायचा आहे या ब्लॉगमधून बाकी काही कुणावर आक्षेप नाही..कुणावर टीकाही नाही..
    पुन्हा एकदा धन्यवाद..

    ReplyDelete
  2. आपल्या बोलक्या कॉमेंटबद्दल आभारी आहे..
    धन्यवाद..

    ReplyDelete