Sunday, February 12, 2012

बाळासाहेब ठाकरे-तोच जोश तोच उत्साह

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शनिवारी ठाण्यातल्या सेंट्रल मैदानावर भव्य जाहीर सभा झाली. या सभेतूनच त्यांनी महापालिकेच्या धुळवडीत ठाकरी तोफ डागली..बाळासाहेबांचं वय आत्ता ८५ वर्षावर गेलय. त्यातच त्यांची प्रकृती साथ देत नाही. त्यामुळे ते शक्यतो सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नाहीत.. पण शनिवारच्या सभेतला त्यांचा जोश पाहून बाळासाहेब अजून थकलेत असं त्यांच्या आवाजावरुनतरी वाटलं नाही. त्यांच्या आवाजात तोच ठाकरीपणा ठासून भरलेला दिसला.. बाळासाहेबांची सभा म्हणजे शिवसेना कार्यकर्त्यांसाठी संजीवनीच असते..खरं तर त्यांनी या वयात प्रचार सभांत भाग घेणं योग्य नाही.. पण त्यांच्या एका जाहीर सभेनंही निवडणुकीतलं गणित बदलतं, म्हणूनच त्यांची सभा ठाणे आणि मुंबईसाठी फारच महत्वाची ठरते.. सभेला नेहमीप्रमाणे तुफान गर्दी होती हे सांगायलाच नको..बाळासाहेबांचं त्यांच्या शिवसैनिकांशी जे काही नातं जोडलं गेलेलं आहे त्याचाच प्रयत्न पुन्हा ठाण्याच्या सभेत आला..

बाळासाहेब ठाकरेंची सभा म्हणजे कुणा कुणावर त्यांची तोफ धडाडणार हे ऐकणं शिवसैनिकांसह विरोधीपक्ष तसच पत्रकारांसाठीही पर्वणीच असतं..यावेळेही त्यांची तोफ धडाडली..त्यांचं नेहमीचं गि-हाईक म्हणजे शरद पवार आणि नारायण राणे.. त्या दोघांवरही त्यांनी तोफ डागलीच..! तसच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही त्यांनी टोले लगावले. या भाषणात त्यांनी खास करुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृपाशंकरसिंग यांच्यावरही आसूड ओढले..राज ठाकरेंवरही त्यांनी टीका केली पण यावेळचा त्यांचा सुर फारसा कडवट नव्हता..त्यांच्या भाषणातून ते सहसा कोणाला सोडत नाहीत..त्यामुळे राज ठाकरे सुटणार नव्हतेच पण त्यांच्या टीकेची धार तेवढी तिखट नव्हती जेवढी अजित पवार, कृपाशंकरसिंग आणि नारायण राणेंच्या बाबतीत होती.. कदाचित मुंबई महानगरपालिकेत जर सत्तेसाठी आकड्यांची जुळवाजुळव करण्याची वेळ आली तर मनसे त्यांना तारून नेऊ शकेल असाही त्यामागचा होरा असू शकतो..कारण यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानं ही निवडणूक शिवसेनेला जड जाण्याची शक्यताय..त्यामुळेच त्यांनी राज ठाकरेंवर फारसे आसूड मारले नसावेत असं वाटतं..

यावेळच्या सभेचं एक वैशिष्ट्य म्हणजे व्यासपीठावर रामदास आठवले होते पण गोपीनाथ मुंडे दिसले नाहीत..शिवशक्ती भिमशक्ती एकत्र आणण्यात मुंडेचा मोठा वाटा आहे..पण त्यांची गैरहजेरी अनेक शंका उपस्थित करुन गेली..बाकी बाळासाहेबांचं भाषण जरी त्यांच्य़ा ९० च्या दशकातली आठवण करुन देणारं नसलं तरी वयोमानानुसार त्यांच्या भाषणानं शिवसैनिकांमधे उत्साह संचारलेला असणारच..

मुंबई आणि ठाणे हे शिवसेनेचा प्राणवायू ( धनशक्ती ) असल्यानं ती हातून जाऊ देणं त्यांना परवडणारं नाही. म्हणूनच बाळासाहेबांच्या भिमटोल्यानं या दोन महापालिकांमध्ये भगवा फडकवण्याचा सेनेचा प्रयत्न आहे. त्यासाठीच बाळासाहेबांना त्यांनी प्रचारात उतरवलं..मागच्या तीन वर्षापूर्वी त्यांची जेंव्हा ठाण्यात सभा झाली होती तेव्हा बाळासाहेबांची प्रकृती खूपच खालावलेली होती..पण शनिवारचे बाळासाहेब हे पूर्ण जोशात होते..त्यांचा हा जोशच शिवसेनेला या महापालिकेत लढण्यास ऊर्जा मिळवून देईलं यात शंकाच नाही..

3 comments:

  1. jai ho shivsainik....sunder lekh...n tumacha shivsainik pan jaga zala... :) ;) --- vinayak kundaram

    ReplyDelete
  2. विनायक, मस्त रे.. तुझ्या कॉमेंटबद्दल..

    ReplyDelete