Thursday, January 26, 2012

सिनेमा-हिंदी मराठी आणि दाक्षिणात्य..















हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या नवनवे प्रयोग होत आहेत. रजनीकांतच्या रोबोटनं धुमाकुळ घातल्यानंतर शाहरुखचाही सुपर हिरोछाप रा-वन आला. पण प्रेक्षकांना काही तो आवडला नाही. पण आज मला मुद्दामहून लिहायचय ते दाक्षिणात्य चित्रपटावर. हिंदीचा आवाका मोठा आहे. त्यांना मिळणारा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. शिवाय ओव्हसिजचा धंदा आहेच. त्यामुळेच साठ सत्तर कोटीचं बजेट काही हिंदी चित्रपटांचं सध्या होत आहे. रा-वन चं शंभर कोटीपर्यंत गेलं होतं असं म्हणतात..पण हिंदीचा आवाका पाहता तेवढा पैसा वसूल होऊ शकतो. पण एवढा मोठा खर्च करुन चित्रपट बनवले जातात त्यांची संख्या फार जास्त नाही.. तर मग प्रादेशिक चित्रपटांची अवस्था काय असेल असा प्रश्न पडतो..या सर्वात एक समाधानाची बाब म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीनं हिंदी चित्रपटांसमोर ठेवलंलं एक आव्हान..दाक्षिणात्य चित्रपट म्हटलं की तेलुगु आणि तमिळ ह्यांचा उल्लेख करावा लागतो..तमिळमध्ये रजनीकांत तर सर्वांचा बापच झालाय. त्यानं साठ वर्षाच्या वयातही हिंदीच काय हॉलिवूडलाही लाजवेल असा रोबोट केला आणि सर्वांना वेड लावलं..बरं त्यासाठी त्यानं मानधनही घेतलं तब्बल वीस कोटी रुपये..म्हणजे हिंदीतला शाहरुख, सलमान, आमिरपेक्षाही दुप्पट..आणि चित्रपटाचं बजेटही १०० कोटीच्यावर होतं असं म्हणतात. पण या चित्रपटानं निर्मात्याला त्याचा पैसा मिळवून दिला...हे रजनिकांतचं मोठं यश आहे. आजही त्याच्या चित्रपटाचा पहिला शो पाहण्यासाठी उड्या पडतात..


हा झाला रजनिकांतचा करिश्मा, पण तेलुगु चित्रपटही काही कमी नाहीत. त्यांची लोकप्रियताही दांडगी आहे. सोलापूरसारख्या तेलुगु लोंकांचं वास्तव्य असणाऱ्या शहरात पूर्वीपासून तेलुगु सिनेमे लागतात. त्यांच्यासाठी सोलापूरात दोन स्वतंत्र थिएटर आहेत. तिथं फक्त तेलुगु चित्रपटच लागतात. पण मागच्या काही वर्षात हे प्रस्थं एवढं वाढलय की अहमदनगर, पुणे- मुंबईतही तेलुगु सिनेमांना मागणी वाढलीय. परवाच मी इंदापूरात तेलुगु चित्रपचटाची पोस्टर्स पाहिली...आणि गाणी म्हणाल तर आपल्याकडच्या काही रियालिटी शो मध्ये सुद्धा तेलुगु सिनेमातली अनेक गाणी ,त्यावरचे डान्स बसवले जातायत. हे त्या तेलुगु चित्रपटाचं यशच आहे. आ आंटे अमलापूरम या गाण्यानं महाराष्ट्रातही धुमाकुळ घातला होता. अशी गाणी महाराष्ट्रातही चालली. अनेकांच्या मोबाईलमध्येही तेलुगु गाण्यांचा भरणा असतो..ह्या प्रादेशिक सिनेमांना एवढं महत्व आलंय. तर मग आपला मराठी सिनेमा मागं का ?...मराठीतही बदल होत आहेत, महेश मांजरेकरसारखे दिग्ददर्शक आता पाच सात कोटींचा मराठी चित्रपट काढतात. पण त्यांची संख्या कमी आहे. एखादी कोंबडी किंवा वाजले की बारा हिट होतं. पण पुढे काय.?.तेलुगुत मात्र तसं नाही.. त्यांच्या सिनेमांची संख्या, त्यावर होणारा खर्चही मोठा आहे. हे सिनेमे निर्मात्याला त्यांचा पैसा वसूलही करुन देतात..


तेलुगु लोकांची एक मानसिकता आहे. खाओ, पिओ, मजा करो..म्हणूनच आजही मुंबई पुण्यात सिंगल स्क्रिनची जागा मल्टिप्लेक्स घेत असताना हैदराबादसारख्या शहरात सिंगल स्क्रिनही जोरात चालू आहेत. मी स्वतः मागच्या पाच सहा वर्षात कमीत कमी आठ ते दहा नवी सिंगल स्क्रिन थिएटर झाल्याची पाहिलीत. बरं आजही तेलुगु सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी इथं झुंबड उडते. पहाटेपासूनच तिकीटासाठी रांगा लावल्या जातात. इथल्या प्रेक्षकाला हवा असलेला सगळा मसला या चित्रपटांत असतो.. भरपूर मारधाड. दे दणादण, हॉट गाणी आणि अनाकलीय असा हिरो उभा केला जातो..व्हिलनही चांगलाच भाव खातो. असा सगळा मसला याच चित्रपटांत ठासून भरलेला असतो. मग काय पैसा वसूल..! त्यामुळेच तेलुगु सिनेमांचा आवाका आपल्यातल्या हिंदींच्या तोडीचा किंवा त्यांच्यापेक्षा वरचढ ठरतोय.. सध्याच्या टीव्हीच्या जमान्यातही हे तेलुगु सिनेमे भाव खातात. तेलुगुचे डब सिनेमेही अनेक वाहिन्यांवर दररोज गर्दीकरुन दिसतायत...तेलुगु किंवा तमिळ सिनेमा पाहताना भाषा सोडली तर कधीच तो प्रादेशिक वाटत नाही..ही उंची मराठी सिनेमा केंव्हा गाठणार ?.त्यातच आपल्या मराठीवर सध्या थोडा पैसा लावला जात असला तर आपले हिरो कोण ?.. हे चित्र बदलणार केंव्हा..? त्याचा विचार व्हायला हवा.. आजचा तरुण वर्ग डोळ्यापुढं ठेवून चित्रपटांची निर्मिती करावी लागतेय. त्यात मराठी खूपच मागं पडताना दिसतेय. थोडेफार प्रयोग होतायत म्हणून समाधान मानून घेण्यापेक्षा तेलुगु, तमिळ सिनेमासारखी निर्मीतीची उंची आपला मराठी सिनेमा केंव्हा गाठणार याचा विचार झाला पाहिजे.. हे चित्र बदललं पाहिजे आणि तेलुगु आणि तमिळ चित्रपटासारखी निर्मितीची, यशाची शिखरं मराठी सिनेमानंही गाठावी हीच एक मराठी म्हणून अपेक्षा..त्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीला भरपूर शुभेच्छा..

3 comments:

  1. आपण म्हणता कि "इथल्या प्रेक्षकाला हवा असलेला सगळा मसला या चित्रपटांत असतो.. भरपूर मारधाड. दे दणादण, हॉट गाणी आणि अनाकलीय असा हिरो उभा केला जातो..व्हिलनही चांगलाच भाव खातो. असा सगळा मसला याच चित्रपटांत ठासून भरलेला असतो. मग काय पैसा वसूल..!
    मुळात तेलगु,तमिळ आणि मराठी प्रेक्षकांच्या मध्ये जमीन आणि अस्मानाचा फरक आहे आणि याची सुरुवात भाषेपासून सुरु होऊन राजकीय,बौद्धिक,शैक्षणिक,आर्थिक समृद्धी मधील दरी पाशी येऊन थांबते."एक एक बात नौ नौ हात" असे सिनेमे हि तिथली प्रथाच आहे.प्रादेशिक मानसिकते मुळे स्वातंत्र्य नंतर ६४ वर्षा नंतर सुद्धा तेथे विकासाची वानवाच राहिली आणि हि दक्षिणेतील राज्ये अखंड भारता पासून तशी फटकूनच राहिली.आत्ता आत्ता कुठे त्यात थोडा फरक जाणवायला लागलाय.त्या तुलनेत कानडी व मल्याळी लोकांनी काळाची पावले अगोदर ओळखून स्वतः मध्ये बदल घडवून आणले त्याचे प्रतिबिंब त्यांच्या राज्यात व निदान प्रमुख शहरा मध्ये दिसून येते.राहता राहिला मुद्दा त्यांच्या सिनेमा वेडाचा.तर तो अभिजात वारसा त्यांच्या रक्तात पिढ्यानपिढ्या उतरला आहे,तो लगेच जाणार नाही.पण काळाच्या ओघात जस जसे जग जवळ येऊन ते लोक सर्वार्थाने प्रगत होतील तेव्हा रुची बदल होणे हा काळाचा स्वभाव आहे.
    त्या मुळे मराठी सिनेमाचा विचार करावयाचा झाला तर तो येथील लोकांची अभिरुची,नि सिनेमाची समज लक्षात घेऊन त्याची निर्मिती केल्यास त्यास पैसे वसूल होण्या इतपत लोकाश्रय मिळू शकेल तथापि दक्षिणेतील सिनेमा वेड येथे येथे येणे शक्य नाही.

    ReplyDelete
  2. कृपया प्रतिक्रिये वरील "मंजुरी नन्तर" हटवता आले तर पहा..

    ReplyDelete
  3. सर्वप्रथम आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. मराठी लोकांनासुद्धा चांगले सिनेमे दिले तर त्याला ते योग्य प्रतिसाद देतात याची उदाहरणं खूपच आहेत. मराठी सिनेमासुद्धा यशाची शिखरं गाठलेला आहे. त्यात मध्यतंरी मरगळ आली होती. ती आता कुठं झटकण्याचं काम सुरुय. त्याला वेग यावा, त्यात मोठा पैसा गुंतवला जावा तरच मराठी सिनेमा तेलुगु तमिळशी स्पर्धा करु शकेल..दुसरं असं की त्यांची आणि मराठी लोकांची अभिरुची वेगळी आहे असं आपण म्हणता. मग तेच तेलुगु सिनेमे आपल्या महाराष्ट्रात थिएटरवर झळकतातच की..मग हे सिनेमे पाहणारे मराठी लोक त्यांना मराठीत तो मसाला दिला तर पाहणार नाहीत का..मला फक्त एवढचं म्हणायचं होतं की मराठीनंही आत्ता स्पर्धेत उतरलं पाहिजे..आपणही काही इतरांपेक्षा कमी नाही ते दाखवून तर द्यावं लागलेच ना..आणि राहिला प्रश्न विकासाचा तर महाराष्ट्रात तर कुठं विकासाचा समतोल आहे. मेळघाट पहा. मराठवाड्याचा काही भाग.. विदर्भातला काही भागसुद्धा अजूनही विकासापासून वंचित आहेच की..

    ReplyDelete