Friday, January 13, 2012

हैदराबाद- एक साठवण ( सुरुवातीचे दिवस )

हैदराबाद या शहराशी माझा तसा काहीच संबंध नव्हता..आंध्र प्रदेशची राजधानी, चारमिनार आणि एन. टी. रामाराव यांच्याशिवाय आंध्र आणि हैदराबादबद्दल मला फारशी माहितीही नव्हती..हां..आणखी एक ओळख या शहरातबदद्ल होती ती म्हणजे या शहरातल्या इक्रिसॅट या कृषी क्षेत्राशी निगडीत असलेल्या मल्टीनॅशनल कंपनीच्या नावामुळे..ह्या कंपनीचं एक अभ्यासकेंद्र माझ्या छोट्याशा गावात होतं. वर्षातून अनेकदा वेगवेगळ्या देशांचे लोक या कंपनीच्या माध्यमातून अभ्यासासाठी माझ्या गावात येत..त्यांच्या त्या अलिशान गाड्या काळे- गोरे विदेशी लोक त्याचवेळी मी माझ्या छोट्या गावात पाहिले होते..पण त्यावेळी तो माझ्यासाठी उत्सुकतेचा, कुतुहलाचा विषय होता...पण कधी मला हैदराबादला यावं लागले असं वाटलं नव्हतं..पण तीन जुलाई २००० ला मी या शहरात आलो आणि या शहराचाच होऊन बसलो..


खरं तर नोकरीनिमित्त महाराष्ट्राच्याबाहेर एका वेगळ्या प्रांतात मला यावं लागले असं मला वाटलं नव्हतं..पण आयुष्याच्या वाटा धुंडाळताना एवढा पुढं निघून गेलो होतो की मागं पाहिलं तेव्हा शिल्लक काहीच राहिलं नव्हतं.. त्यामुळे आतापुढे काय असा यशप्रश्न मला भेडसावत होता. त्याचवेळी मला हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीत सुरु होत असलेल्या ईटीव्ही मराठीच्या जाहिरातीचा आधार मिळाला..तोच धागा पकडत मी हैदराबाद गाठलं.. माझा एक मित्र रवी वैद्य ह्यानं मला त्यासाठी मोठी मदत केली. आज तो या जगात नाही पण त्याचे ते उपकार माझ्यावर आजही एक मोठं ओझं आहे असं मी मानतो...नोकरी मिळेल का नाही याची शाश्वती नव्हती पण नेहमीप्रमाणे धाडसानच आलो..पण झालं नोकरी मिळाली.. त्या दिवसापासून मी हैदराबाद शहराचा झालो आणि आजही आहे.. उद्या या शहरात असेन का नाही हे सांगू शकत नाही पण या शहराला मी आयुष्यात कधीच विसरणार नाही...या शहरानं मला भरभरुन दिलय. मला जगाला शिकवलंय. मोठा आर्थिक, मानसिक, आणि सामाजिक आधार दिलाय...ह्या शहरानं मला दिलेली नवी ओळख आणि जे काही दिलय ते विसरण्यासारखं नाहीच..म्हणूनच माझं या शहरावर प्रेम आहे..


आज मी बारा वर्षानंतर मागं वळून पाहतो तेंव्हा अनेक घटना डोळ्यासमोरुन पटापट जातात...या शहरात आल्यानंतर राहण्याची सोय नव्हती, भाषेचा प्रश्न होता...आम्ही सर्वजण मराठी मंडळी सुरुवातीचे काही दिवस रामोजी फिल्म सिटीत असलेल्या सहारा हॉटेलवर रहायचो...त्यानंतर शहरात वनस्थलीपूरम या भागात आम्ही रहायला गलो. सुरुवातीला सहा सात जणांनी मिळून एक घर भाड्यानं घेतलं..त्यानंतर लगेच दोन तीन महिन्यात त्याच भागात मोठा बंगला भाड्यानं घेतला...हाच बंगला पुढं ईटीव्ही मराठीच्या हालचालींचा केंद्रबिंद राहिला...( तसा बदनाम केंद्रबिंदू म्हणाना..) ह्या बंगल्यात आम्ही सुरुवातीला सात आठ जण होतो नंतर सहकारी वाढले आणि जवळपास १२ ते १४ जण या बंगल्यात रहात होतो...सुरुवातीला प्रदिप पाटील, श्रेयस जाधव, संतोष कोंपलवार, दत्ता, कृष्णा, पराग, सुनिल दुसाणे, संतोष कांबळे, राजा पाटील, अनिल पाटील असे सहकारी रहात होतो. नंतर राकेश वायंगणकर, राकेश बागल, डोळाभाई असे अनेक सहकारी जमले..या बंगल्याच्या वरच्या भागात प्रविण आंधारकर हे आमचे मित्र रहात होते..तसं या बंगल्याचं नाव आम्ही चॉकलेटचा बंगला ठेवलं होतं. . त्या बंगल्याच्या थोडं पुढं गेल्यानंतर पुढच्या कॉलनित एका मोठ्या घरात आणखी सात आठ जण राहत होते... मेघराज पाटील, रफीक मुल्ला, विठोबा सावंत, सचिन गडहिरे, दिपक शितोळे, नरेंद्र बंडवे,स्वप्निल चव्हाण हे सहकारी या बंगल्यात राहत होते.. मेघराज, अशोक सुरवसे आणि सुनिल पाथरुडकर हे सोलापूरचे असल्यानं थोडा आपलेपणा जाणवायचा...नंतर मी, मेघराज आणि स्वप्निल दुसऱ्या फ्लॅटमध्ये रहायला गेलो..( काही नावांचा उल्लेख राहिलेला आहे प्रसंगानुरुप त्यांचा उल्लेख करेनच. )

बघता बघता वनस्थलीपूरममध्ये मराठी लोकांची संख्या वाढली..इथूनच नवे मित्र मिळाले...एकत्र राहणं. मिळून जेवण बनवणं आणि एखादं घर चालवावं तसा आमचा प्रपंच सुरु होता..तसं इतरांबरोबर राहण्याची माझी ही काही पहिलीच वेळ नव्हती..कॉलेजसाठी सोलापूरातही हॉस्टेल आणि खाजगी खोल्यामधून रहातच होतो..पण हैदराबादमध्ये जेवणाचा मोठा प्रश्न होता. त्यामुळे सरुवातीला एका मराठी कुटुंबाला आम्ही आग्रह करुन मेस सुरु करायला लावली आणि जेवणाचा प्रश्न सोडवला..पण हा प्रयोग फसला त्यामुळे आम्ही बाहेर हॉटेल किंवा मेसमध्ये भातच खायचा तर घरीच करुन खावू असं ठरवुन आम्ही एकवेळचं जेवण तरी घरीच बनवायचो..कारण ऑफीस कँटीनच्या खाण्याबद्दल काय सांगायचं...ते जेवण करण्यापेक्षा अनेकजण जेवण टाळायचे..( आमची ऑफीस कँटीन हा स्वतंत्र लिहिण्याचा विषय आहे.)

ईटीव्हीच्या अनेक वाहिन्या वाढत होत्या तसतसे नवे मित्रही मिळत गेले. अनेक प्रांतातून हे कर्मचारी आलेले होते. त्य़ामुळे त्यांच्या राज्याबद्दलची माहिती मिळत होती..हा प्रवास असाच सुरु राहिला...अनेक आठवणी, घटना,प्रसंग आठवले की कधी चेहऱ्यावर मंद स्मित हास्य उठतं तर काही आठवणी वेदना देऊन जातात...काही प्रसंग आठवले की आजही डोळे पाणावतात...हा प्रवास सुरु असतानाच अनेकजण हैदराबाद सोडून गेले त्यातले काहीजण संपर्कात राहिले तर काहिजण विस्मृतीत गेले...पण मला मिळालेला हा अनुभवाचा, माहितीचा आणि मैत्रिचा ठेवा मी जपून ठेवलाय आणि तो तसाच जपून ठेवणाराय...तो माझ्यासाठी अमूल्य साठवण आहे..

( हैदराबादच्या आठवणी मी "हैदराबाद एक साठवण" म्हणून लिहित आहे. जस जसा वेळ मिळेल तशा या आठवणी साठवण म्हणून तुमच्याशी शेअर करेन. )

3 comments:

  1. sandhya sathe,mrudula yancha ullekh nasalyamule blog nirarthak ahe.asech mhanave lagel

    ReplyDelete
  2. hi. hello. nice to read this blog..do write more
    mandar, pune

    ReplyDelete
  3. nice..do writing
    pradip..sangali.

    ReplyDelete