Wednesday, January 11, 2012

पाकिस्तान- एक अस्थिर देश



भारताचा शेजारी देश पाकिस्तान हा पुन्हा एकदा राजकीय अस्थैर्याच्या वाटेवर आहे. पाकिस्तानातलं राजकीय अस्थैर्य म्हणजे लष्करी राजवट. आजच पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल अशपाक कियानी यांनी सरकारला गंभीर परिणामाचा इशारा दिलाय. त्यामुळे पाकिस्तानातलं लोकशाही सरकार पुन्हा उलथवून टाकलं जाईल काय अशी भिती व्यक्त केली जातेय.. कियानी यांनी सरकारला इशारा दिला तो काही आज तडकाफडकी नाही..मागचे काही दिवस पाकिस्तानात सरकार- न्यायपालिका आणि लष्कर यांच्यात वाद सुरुय. मेमोगेट प्रकरणामुळे अडचणित आलेल्या सरकारची नामुष्की वाढलीय. राष्ट्रपती झरदारी यांनी राजीनामा द्यावा यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव असल्याच्या बातम्याही येत आहेत. या सर्व पार्श्वभूमिवर आज पंतप्रधान गिलानींनी संरक्षण सचिवाची हकालपट्टी केली. ही हकालपट्टी लष्करप्रमुख जनरल कियानींना चांगलीच झोंबली. ज्या संरक्षण सचिवाची सरकारनं हकालपट्टी केली तो लष्करातीलच अधिकारी होता आणि मेमोगेट प्रकरणी लष्कराची बाजू त्यानं न्यायालयात मांडली होती. त्याच अधिकाऱ्याची गिलानींनी हकालपट्टी केली हे जनरल कियानींना पटलं नाही. रावळपिंडीत तातडीची बैठक घेत कियानींनी सरकारला इशारा तर दिलाच पण महत्वाचं म्हणजे त्यांनी रावळपिंडीचा कमांडरही बदललालय. त्यामुळे पाकिस्तानात लष्करी राजवट येणार काय याची जोरदार चर्चा सुरुय.

पंतप्रधान गिलानींनी आपल्या सरकारला धोका नाही असं स्पष्ट केलय. पण पाकिस्तानचा कोणताही पंतप्रधान छातीठोकपणे असं विधान करु शकत नाही..हा झाला आजचा घटनाक्रम आणि त्याची पार्श्वभूमी...पण पाकिस्तान हा नेहमीच राजकीयदृष्ट्या अस्थिर देश राहिलाय. भारत आणि पाकिस्तान हे दोन देश एकाचवेळी स्वतंत्र झाले. भारतात लोकशाही रुजली, नांदली, त्याची फळं सामान्य लोकांपर्यत पोचली..पण पाकिस्तानात मात्र मागच्या ६०-६५ वर्षात लोकशाही मात्र रुजु शकली नाही. हा देश नेहमीच लष्करी सत्तेच्या हातात राहिलाय. कोणत्याही पक्षाचं सरकार हे लष्कराच्या हातचं बाहुलचं असतं. जे सरकार लष्कराच्या विरोधात जाईलं त्याची गय केली जात नाही. अशी अनेक सरकारं लष्करानं उलथवून लावलीत. त्याचीच पुनरावृती आज पाकिस्तानात होतेय.

या घटनाक्रमाकडे वेगळ्यादृष्टीनंही पाहिलं जातय. माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ हे पाकिस्तानात येण्याच्या तयारीत आहेत. पाकिस्तानच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याची मुशर्रफ यांची धडपड सुरुय. त्यासाठी त्यांनी अरबी राजघराण्याकडही साकडं घातलय. आपले खास दूत पाठवून त्यांनी आपल्याला पाकिस्तानात गेल्यानंतर सरकार अटक करणार नाही असं ठोस आश्वासन द्यावं अशी गळ घातलीय. अमेरिकी अधिकाऱ्यांकडेही मुशर्रफ यांनी फिल्डींग लावलीय. पाकिस्तानात जाताच आपल्याला अटक केला जाईल अशी भीती त्यांना वाटतेय. त्यामुळेच सध्याचं सरकार अस्थिर करण्याचा किंवा उलथवून लावण्याचा हा कट असू शकतो..मुशर्रफ हे लष्करी अधिकारी, त्यांनीही नवाज शरिफ यांची सत्ता उलथवून लावली होती. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानची सुत्रं आपल्या लष्करी पंजाखाली घेतली होती. पण आता पुन्हा त्यांना राजकारणात सक्रीय व्हायचय..त्यासाठी तर त्यांचे लष्करातले मित्र हा सर्व खटाटोप तर करत नाहीत ना अशीही शंका येते..


दुसऱ्या बाजूनं विचार करता अमेरिकेबरोबरचे पाकिस्तानचे संबंधही सध्या ताणलेले आहेत. त्यामुळे अमेरिका धार्जिण नेतृत्व पाकिस्तानात पुन्हा रुजवण्याचा घाटही घातला जात असावा..कारण पाकिस्तान हा नेहमीच अस्थिर देश राहिलाय तो अस्थिरच रहावा अशी अमेरिकेची भूमिका राहिलीय. पण भारताचा विचार करता आपला शेजार अस्थिर राहणं आपल्यासाठी चांगलं नाही. पाकिस्तानात लोकशाही नांदावी अशीच भारताची भूमिका राहिलीय. कारण पाकिस्तानात लष्करी राजवट असणं हे भारताच्यादृष्टीनंही फारसं हिताचं नाही...



1 comment:

  1. Pakistan is always a country of military ruller.
    This country looks like a banana country..

    anand pravin. mumbai

    ReplyDelete