Monday, October 31, 2011

परप्रातिंयांची मुजोरी..




संजय निरुपम या काँग्रेस खासदारानं नागपूरातल्या उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात परप्रातियांचा मुद्दा पुन्हा काढला..मुंबईतल्या उत्तर भारतीयांनी जर मनात आणलं तर मुंबई बंद करु शकतो अशी दर्पोक्ती या महाशयांनी केली..खरं तर निरुपम हा एक वाचाळ माणूस....तोंड उघडलं की वाद हाच त्याचा शिरस्ता होऊन बसलाय..पण निरुपम यांनी मुंबई बंद करण्याची भाषा करण्यामागं राजकारण आहे हे सांगायला आता उत्तर प्रदेशातल्या गागा भट्ट यांना विचारण्याची गरज नाही...कारण सोप्पं आहे..तीन चार महिन्यावर मुंबई महानगर पालिकेची निवडणूक आलीय..आणि मुंबईची निवडणूक म्हटलं..की सर्वच पक्षांना ती जिंकण्याची ईर्शा होणारच..शिवसेनेचा तर तो अर्थ वायूच आहे..आणि मुंबई फक्त शिवसेनाच बंद करु शकते हा त्यांचा आवाज...पण त्यालाच निरुपम यांनी आव्हान दिलं म्हटल्यावर सेना गप्प बसेल कशी...त्यांनीही निरुपम यांचे दात घशात घालण्याची तंबी दिली...त्यात राज ठाकरे यांनीही लवकरच फटाके फोडू अशा इशारा दिलाय..त्यामुळे हा वाद आता मुंबई महापालिकेची निवडणूक होईपर्यंत रंगणार हे मात्र नक्की....
हा झाला निवडणुकीचा मुद्दा..पण मुळात या संजय निरुपम काय कृपाशंकर सिंग काय आणि अबू आझमी काय..या लोकांचा आवाज वाढतोच कसा हे महत्वाचं...मुंबईत परप्रांतियांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. त्यांच्याजिवावर नेतेगिरी करण्याचा ह्या तिघांचा राजकीय धंदा सुरुय.. पण निरुपम यांच्या भाषेत जी मग्गुरी आहे ती जरा जास्तच आहे...कोण तो उपटसुंभ कुठुन आला तो...आणि मुंबई बंद करण्याची भाषा काय करतोय...या महाशयांना एवढा माज आला तरी कुठुन...ह्याच निरुपम नावाच्या महाशयांनी यापूर्वी छट् पूजेच्या निमित्तानं राजकीय शक्तीप्रदर्शन मांडलं होतं..आता पुन्हा निवडणुका..या निवडणुकीच्या तोंडावर असे वाद निर्माण करायचे आणि स्वताचं उखळ पांढरं करुन घ्यायचं हा त्यांचा धंदा सुरु झालाय.. सध्या मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षपद किंवा गुरुदास कामत यांच्यामुळे रिकाम्या झालेल्या मंत्रीपदावर वर्णी लागावी यासाठीही या निरुपम महाशयांची बडबड सुरु आहे..त्यातच मुंबईत उत्तर भारतीयांचा कैवारी मिच आहे हे दाखवण्यासाठीही त्यांचा हा आटापीटा आहे..
खरं तर राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनीच या निरुपम महाशयांचे कान उपटायला पाहिजे पण काँग्रेस मध्ये असा एकही नेता नाही जो अशा लोकांना लगाम लावू शकेल.. त्यामुळेच अशा माणसांची मुजोरी वाढतेय.. बरं या उत्तर भारतीयांना नाराज करण्याची कोणत्याही पक्षात धमक नाही...राहता राहिला मनसे.. सध्या मनसेचं इंजिनच या उत्तर भारतीयांची गाडी रुळावरुन खाली खेचू शकतं..त्यामुळे निरुपम यांनी दिवाळीत टाकलेल्या या ठिगणीवर राज ठाकरे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मोठे बॉम्ब फोडणार हे मात्र नक्की...राज ठाकरे यांनीही तसे संकते दिलेलेच आहेत..त्यांचा दारुगोळाही भरलेलाच आहे.. त्याला निरुपम यांनी ठिगणी टाकल्यामुळे हा दारुगोळा आता उडणार आणि त्यात कोणाकोणाची वाट लागणार हे या दोन महिन्यात दिसणार आहे..

ऊसदरवाढीसाठी शेतकरी रस्त्यांवर..




राज्यात सध्या ऊस दरवाढीचं आंदोलन पेटलय...राज्यात म्हणण्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रात म्हणणं तर फारच संयुक्तिक ठरेल. कारण पश्चिम महाराष्ट्रातच सहकारी साखर कारख्यांचं मोठं जाळं आहे.... ऊसाला तीन हजार रुपयापर्यंत भाव द्यावा यासाठी तिन्ही शेतकरी संघटना सध्या आक्रमक आहेत.. १ ऑक्टोबरला यंदाचा हंगाम सुरु व्हायला पाहिजे होता.. पण सुरुवातीला ऊस तोडणी कामगारांनी त्यांच्या मजुरीसाठी आंदोलन केलं. त्यामुळे हंगाम लांबला..नंतर शरद पवार- गोपीनाथ मुंडे यांच्या लवादानं ७० टक्के मजुरीत वाढ देण्याचा निर्णय घेतला आणि हा वाद मिटला.. हा वाद मिटतो न मिटतो तोच ऊसाचा हप्ता किती असावा यावरुन शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली..त्याची सुरुवात सोलापूरातूनच झाली...सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमात शेतकरी संघटनांनी गोंधळ घातला..त्यानंतर माढ्यात एका साखर कारखान्यात तोडफोड केली.. हे लोण शेजारच्या सांगली जिल्ह्यातही जाऊन पोचलं.. तिथं त्यांनी ऊस वाहतूकीच्या गाड्या अडवल्या.. आता शेतकऱ्यांनी एवढं आक्रमक झाल्यानंतर साखर सम्राट हादरले असं म्हटलं जातं..काही कारखान्यांनी भाव वाढवून देण्याची तयारी दाखवलीय..पण नेहमीप्रमाणं साखरनिर्यात बंदी उठवण्याचा सुर त्यांनी आळवलाय...त्यातच यावेळी शिखर बँकेवर प्रशासक आहे..त्याचा फटका कारखान्यांना बसतोय.. ही बँक कारखान्यांना सढळ हातानं पैसा देणार नाही... ही कारणं साखर सम्राटांकडून पुढं केली जात आहेत..पण एक मात्र खरं की महागाई प्रचंड वाढलीय..शेतीसाठी लागणारा बि बियाणं, खतांच्या किंमती गगणाला भिडल्यात..त्यामुळं साहजिकच ऊसचा दर वाढवून द्यावा ही शेतकऱ्याची मागणी रास्तच आहे.. पण शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे सहज पडतील तर तसं होणं नाही.. मुळात साखर कारखाने आजपर्यंत शेतकऱ्यांना लुटतच आलेत.. पूर्वी साखर कारखान्यांची संख्या मर्यादित होती.. तेव्हातर त्यांनी शेतकऱ्य़ांना वेठीस धरण्याचंच काम केलं..शेतकऱ्यांच्या ऊसावर साखर कारखानदार, संचालक मंडळं गब्बर झाली पण शेतकऱ्यांना भाव द्यायचा म्हटलं की त्यांचा सुर बदलतो.. सध्या कारखान्यांची संख्या जास्त आहे.. त्यातच खाजगी क्षेत्रासाठी साखर कारखानदारी मोकळी केल्यामुळे साखर सम्राटांच्या दादागिरीला थोडा चाप बसलाय..
तसं पाहिलं तर ऊसापासून साखर हे एकच उत्पादन घेतलं जात नाही..त्यापासून मोल्यासीस, बगॅस तर मिळतोच पण इतर उपउत्पादनंही घेतली जातात..त्यातूनही कारखान्यांना मुबलक पैसा मिळतो.. पण शेतकऱ्यांना द्यायचं म्हटलं की हात आखडता घ्यायचा हा या साखर सम्राटांचा नेहमीचा धंदा झालाय.. .ऊसाला एवढा-एवढा भाव द्यायचा तर तुम्हीच कारखाने चालवा.. दरवाढ देण्यासाठी काही नियम असतात असं शरद पवार आणि अजित पवार सांगत आहेत.. तर मग नियमात बदल करायला तुम्हाला कुणी आडवलय का पवार साहेब.. कृषीखातं तुमच्याकडं.. राज्यात केंद्रात सत्तेत तुम्ही मग शेतकऱ्यांना चार पैसे जास्त द्यायला तुमचा हात कोणी धरलाय.. पण तसं होणार नाही...
या प्रकरणाला आणखी एक बाजू आहे..ती म्हणजे सहकार चळवळ मोडीत काढण्याची...राज्यात सध्या साखर कारखानदारीचं खाजगीकरण होतय..सहकारी साखर कारखाने आजारी दाखवायाचे त्याच्यावर शिखर बँक किंवा इतर देणी वाढवून ठेवायची आणि कारखाना शेवटी विकायला काढयचा.. तोच कारखाना पुन्हा याच नेत्यांच्या बगल बच्चांनी विकत घ्यायचा हा धंदा सुरु झालाय...दस्तुर खुद्द सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे स्वतःचे दोन खाजगी साखर कारखाने आहेत..तर ऊस तोडणी कामगारांचे नेते असलेले भाजपचे गोपानीथ मुंडे हेसुद्धा जवळपास २०-२५ कारखाने चालवत आहेत..
त्यामुळं हळूहळू सहकारी साखर कारखान्यांची अवस्था बिकट करुन ही चळवळ मोडायची हे काम सध्या सुरु आहे...एकदा का या साखर कारखान्यांची मुंबईतल्या गिरणी कामगारांसारखी वाट लावली की आपली खाजगी कारखानदारी जोरात चालवायला हे साखर सम्राट मोकळं झाले...पण शेतकरी वाचला पाहिजे..त्याच्या खिशात चार पैसे आले पाहिजेत याकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे...कारण शेतकरी जगला तर देश जगला हे लक्षात असावे..

Friday, October 28, 2011

दिवाळीचा फराळ...




दिवाळीचा फराळ हा तर एक स्वतंत्र आणि महत्वाचा विषय आहे...लहानपणी या दिवाळीचं महत्व खूप वाटायचं..दिवाळी म्हटलं की पहाटे उठून अंघोळ..स्वारी अभ्यंगस्नान..त्यानंतर नवे कपडे आणि त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी..आता गावाकडच्या दिवाळीत आतषबाजी हा शब्द थोडा मोठा वाटतो.. पण थोड्या फार फटाक्यांचा आवाज म्हणजे गावाकडची आतषबाजीच..त्यातच वडिलांनी आणून दिलेले फटाके तीन चार दिवस पुरतील अशा बेतानंच वापरावे लागत..शाळेत असताना दिवाळीच्या सणात ही सुप्त स्पर्धाही असायची...या गल्लीत पहाटे फटाक्यांचा पहिला आवाज माझाच झाला पाहिजे..पण मला ते शेवटपर्यंत जमले नाही..एक तर अंधोळ आटोपली जात नसे..नाही तर कोणीतरी छुपा रुस्तुम पहिला आवाज काढणारच...पण नंतर कॉलेजला गेल्यानंतर फटाक्यांची आवड थोडी कमी झाली..पण दिवाळी फराळ मात्र महत्वाचा तो विसरुन कसं चालेल.. फराळाशिवाय दिवाळी हे गणित शक्य नाही...
.. कॉलेजला गेल्यानंतर दिवाळी सुट्टीसाठी गावी जायचं....आमच्या गल्लीतले आम्ही जवळपास आठ दहा जण एकत्र यायचो... त्यावेळी दिवाळी फराळ आमच्या घरी आईच बनवायची म्हणजे आत्तासारखं मिठाईच्या दुकानातून सर्व पदार्थ विकत आणले जात नसत..तशी गावाकडं पद्धतही नव्हती..आजही गावात दिवाळीचा फराळ घरातच बनवला जातो..शेजारच्या काकू -मावशी -अक्का या एकत्र येऊन हा फराळ बनवायला मदत करत..मग हिच पद्धत सर्वांच्या घरात असे..त्यानंतर फराळाला बोलावलं जायचं..आम्ही आठ दहा जण चार दिवसात फराळाचा हा बेत एखाद्या शाळेतल्या वेळापत्रकाप्रमाणं आखायचो..शेवटचा बेत मात्र फराळाचा न ठेवता नॉनवेजचा ठेवला जात असे..कारण आठ दहा घरचा फराळ खाल्यानंतर जिभेलाही कंटाळा यायचा..मग वेगळा बेत व्हायलाच पाहिजे..पण आमची पंचाईत व्हायची..आम्ही जवळपास सर्वचजण शाकाहारी कुटुंबातले असल्यामुळे आमच्याकडे तो बेत शक्य नव्हता..बर ते घरच्यांना कळलं तर मग वरुन ज्या काही शिव्या पडत त्या सांगायला नकोच..(म्हणजे आम्ही कॉलेजला जात होतो तेव्हाही आमच्या आई बाबांना भीत होतो..) असो..पण शेवटचा बेत एखाद्या मराठा मित्राच्या घरी ठेवला जायचा..आणि मग खऱ्या अर्थानं दिवाळीचा फराळ यथेच्छ पार पडला असं वाटायच..पण यातली गम्मत वेगळीच..दिवाळीच्या फराळासाठी ज्याच्या घरी पंगत बसायची त्यावेळी फराळाचं ताट आलं की पहिली नापसंती अर्थातच रव्याच्या लाडूला असायची..कारण या रव्याच्या लाडूचं पूराणच लय भारी..हा लाडू काही दातानं तुटेल असा नसायचा..त्यामुळे उगाच दातांना त्रास का द्यायचा..मग हळू हळू एकएकाच्या ताटातून तो लाडू नावडतीसारखा बाजूला ठेवला जात असे..या लाडूच्या खट्टपणाचे अनेक किस्से आहेत.पण तो जरा सॉफ्ट व्हावा यासाठी आई-काकू भरपूर प्रयत्न करायच्या पण त्यांना यश काही येत नव्हतं..जीचा रव्याचा लाडू सॉफ्ट होईलं तीनं दिवाळी जिंकलीच म्हणा की...त्यावेळी टिव्ही आणि त्यावर एवढे कुकरी शो नव्हते त्यामुळे आमच्या आईंना अनुभवाचे जे बोल मिळतील त्यातून तो फराळही बनवला जायचा...या फराळाच्या डिशमध्ये सर्वात भाव घाऊन जायचा तो म्हणजे चिवडा....चिवड्याला मोठी फर्माइश असयाची.. त्यात वर कांदा द्या असा आवाज कोणीतरी दिला की कांदा हजर..त्यानंतर नंबर लागायचा तो बुंदीच्या लाडूचा..त्यानंतर नंबर लागायचा तो म्हणजे करंजीचा..रव्याच्या लाडूसारखचं सापत्नभावाची वागणूक कधी कधी अनारश्याला मिळायची...पदार्थ चांगला..त्यात तो गोड..पण का कोण जाणो थोडी भीती वाटायचीच... त्यात शंकर पाळ्या हा पदार्थही अनेकांची पसंती ठरायचा..असं एक एक करता फराळ फस्त व्हायचा....दिवाळीचा फराळ म्हटलं की शक्यतो आपल्या पोटाचा अंदाज घेऊनच अनेक जण बसत..पण मी असेही माझे मित्र पाहिलेत... जे ताटात येईल तो पदार्थ आणि येईल तेवढा फस्त करायचे..मला अशा मित्रांचा खूप हेवा वाटायचा..बर त्यांना ते पचायचंसुद्धा....जाऊद्या आपल्याला पचेल तेवढं आपण खावं …अशी दिवाळी आणि दिवाळीचा फराळ आता होत नाही..मोठ्या शहरात तर कोणी घरी फराळ बनवत नाही...सगळं कसं मिठाईच्या दुकानातून रेड्डी टू इट....आणि त्यातही दिवाळीच्या फराळाची अशी पंगतही बसत नाही.. फार फार तर मिक्स मिठाईचा एक बॉक्स भेट म्हूणून दिला की झाला दिवाळीचा फराळ...त्यातच आता कुछ मिठा हो जाय...म्हणत मोठाल्लं चॉकलेटही दिलं जातं..तोच फराळाचा गोडवा म्हणून गोड माणून घ्यायचं... पण गावाकडीची जी काही दिवाळी व्हायची त्यात एकमेकांच्या घरातला गोडवा, आपलेपणा असायचा...तसा कुछ मिठा हो जाय किंवा मिठाईच्या बॉक्समध्ये जाणवत नाही..

Friday, October 14, 2011

महाराष्ट्रावरचे वीजेचे संकट




राज्यात सध्या वीजेचं भारनियमन मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. मागच्या काही महिन्यापासून भारनियमन पूर्णपणे बद होतं..पण पुन्हा या भारनियमनाचं संकट राज्याच्या बोडक्यावर उभं ठाकलय. हे संकट पुरेसा कोळसा मिळत नाही म्हणून वीज निर्मिती कमी होत असल्यामुळे होत असल्याचं राज्यकर्ते सांगत आहेत.. तेलंगणा आंदोलन आणि ओडिशात आलेल्या पूरामुळे हा कोळसा मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे..राज्याला सध्या १६ हजार ५०० मेगॉवॅट वीजेची गरज आहे..पण फक्त ११ हजार ५०० मेगावॅट विजच उपलब्ध आहे..त्यामुळे शहरी भागात पाच ते सहा तास आणि ग्रामिण भागात १६ तास वीज भारनियमन केलं जातय. खरं तर हा प्रसंग महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यावर का यावा हा प्रश्न आहे..गुजरातपेक्षा महाराष्ट्र प्रगत आहे असा डोंगारा आपले सत्ताधारी पिटत आहेत.. पण विजेची समस्या ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर का निर्माण झाली याचा विचार केला जात नाही..दोन तीन वर्षापूर्वीही वीजेचं संकट मोठं होतं. त्यावेळी सिंगल फेजींगचं काम करुन त्यावर काही मात केली होती..१६ तास वीज नसेल तर लोकांनी काय करायचं. शेतीला पाणी देता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतय. त्याचा संताप लोकांनी व्यक्त केलाय. ठिकठिकाणी महावितरणची कार्यालयं फोडणं आणि वीज कर्मचाऱ्यांना मारहाणही करण्यात आली..पण आपले मंत्रीसाहेब लोकांना सबुरीनं घ्या, कायदा हातात घेऊ नका असे सल्ले देत आहेत.. पण मुळात राज्याला लागणारी वीज आपण पूर्ण क्षमतेनं उत्पन्न करु शकत नाही .योग्य नियोजन न केल्याचा हा परिणाम आहे..एक दाभोळ प्रकल्प काय वादग्रस्त ठरला त्यानंतर राज्यात एकही प्रकल्प आला नाही.. सेना भाजप या युती सरकारनं तो प्रकल्प बंद केला..त्याचं खापर नेहमीच त्यांच्यावर फोडलं गेलं..त्यामुळे राज्यावर विजेचं संकट ओढवल्याचा कांगावा केला जातोय..पण त्यांनी मुर्खपणा केला म्हणून तोच मुर्खपणा हे सरकार करत आहे..मागची १० वर्षं काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आहे. या दहा वर्षात या सरकारनं विज निर्मितीसाठी काय केलं..तर त्याचं उत्तर काहीही नाही असचं देता येईल..२००५ मध्ये वेगवेगळ्या कंपन्याशी महाराष्ट्र सरकारनं १२ हजार मेगावॅट विज निर्मितीचे करार केले होते..त्यातला एकही प्रकल्प अजून पूर्ण झाला नाही..त्यामुळे वीज निर्मितीसाठी सरकार कीती उदासिन आहे हे दिसतय. एकीकडं एमएसईबीचे त्रिभाजन करुन त्यांचा व्यवहार सुरुळीत पार पाडण्याचा उद्देश होता पण त्यांच्या कारभारातही सुधारणा झाल्याचं दिसत नाही.. राज्याला सध्या ४५०० मेगावॅट विजेचा तुटवडा जाणतोय..तर दुसरा प्रश्न आहे वीज चोरीचा आणि वीज गळतीचा .त्यावरही नियंत्रण मिळवण्यात महावितरणला अपयश आलय..तर दुसरीकडं जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाचं महत्व पटवून देण्यासाठीच विजेचं संकट उभं केलं जात असल्याचा आरोप होतोय. कारण कोळशाचा प्रश्न उभा करुन राज्याला विजेची कीती गरज आहे असं चित्र निर्माण करायचं आणि जैतापूर प्रकल्पाचं घोडे पुढं रेटायचं हाच डाव आहे..खरं तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला विज, रस्ते, पाणी या मुलभूत सुविधा आजही व्यवस्थित नाहीत हे चित्र भूषणावह नाही...त्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर जनतेचा उद्रेक होणार हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही..

Sunday, October 9, 2011

जाहिरात आणि वाद...








जाहीरात ही ६५ वी कला म्हटलं जातं..जाहिरातीतून आपलं उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं हा त्यामागचा हेतू..पण सध्या जाहीरात हा सुद्धा वादाचा विषय झालाय. विशेषतः टीव्हीवरच्या जाहिरातीवरुन अनेक वाद निर्माण झालेत..सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढल्यामुळे आपलं उत्पादन स्पर्धक कंपनीच्या उत्पादनापेक्षा कसं दर्जेदार आहे हे दाखवण्यापेक्षा जाहीरातच थोडीशी भडक केली तर आपोआपच त्याकडं लक्ष वेधलं जाईलं आणि पर्यायानं त्याची विक्री वाढेल असा त्यामागचा होरा असावा..कारण सध्या लोकांपर्यंत पोचण्याचं टीव्ही हे फार मोठं जनसंपर्काचं साधन झालय..त्यामुळे केवळ दहा किंवा तीस सेकंदाच्या जाहिरातीत उत्पादन ग्राहकाच्या गळी उतरवणं सोप काम नाही..किंवा वाद निर्माण झाला की त्याकडं लोकांचं लक्षही वेधलं जातं हासुद्धा त्यामागचा उद्देश असू शकतो..कारण काहीही असो..सध्या जाहिरातसुद्धा वादाचा विषय झालाय हे मात्र नक्की...आता हेच पाहा ना.. अमोल माचो या बनियन- अंडरवेअरच्या जाहिरातीतीलं ते अंडरवेअर पळवणारं माकड आणि ती महिला या जाहितीवरुनही वाद झालाच...अशा अनेक जाहिराती आहेत ज्यामुळे वाद निर्माण झालाय...त्यातही डिओच्या जाहीरातीवरुन तर किती वाद ओढवला..बाजारात सध्या जे डिओडरंट आहेत त्यातल्या अनेक जाहिरातीमध्ये हा डिओ वापरल्यानं स्त्रीया तुमच्याकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षित होतात अशाच चित्रित केलेल्या आहेत..त्यामुळे अनेक मुलांनी त्याच डिओचा वापर केला पण त्यांना जाहिरातीचा अनुभव आलेला नाही हे सत्य आहेच.. हाच धागा पकडून एका ग्राहकानं एका डिओ उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली..मागची पाच सहा वर्ष तो ग्राहक त्याच कंपनीचा डिओ वापरायचा पण आपल्याकडे जाहिराती प्रमाणं एखदाही कुठलीच मुलगी किंवा बाई आकर्षित झाली नाही अशी त्यानं तक्रार केली..तर अशाच डिओच्या जाहिराती सहकुटुंब पाहता येत नाहीत म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी लागली..त्या जाहिरातीसुद्धा दाखवण्यावर बंदी घातली गेली..पण त्याचा दुसरा अवतार पुन्हा आलाच..अशा अनेक जाहिराती आहेत त्या फसव्या असतात.. पण केवळ जाहिरातीतला भडकपणा किंवा आपला आवडता अभिनेता-अभिनेत्री-खेळाडू त्याची जाहिरात करतो म्हणून अनेक ग्राहक त्याची खरेदी करतात..असाच एक प्रकार माझ्या मित्राच्या बाबतीतही झाला.. आम्ही काँलेजला असताना आमचा एक रुमपार्टनर किडमिडा आणि काळा होता..पण त्याला सुंदर दिसण्याचं मोठं फॅड..अर्थात काँलेज म्हटल्यावर ते ओघानं आलच..हा पठ्ठ्या अंघोळीला गेला की किमान अर्धा तास तरी बाहेर यायचाच नाही...त्यामुळे आम्हा इतर पार्टनरना उशिर व्हायचा. तो एवढा वेळ आत काय करतो याचा आम्ही शोध घेतला तेव्हा तो लक्सचा साबण कमित कमी पाच ते सहा वेळा लावून त्यावर पुन्हा चक्क दगडानं अंग घासायचा..वरुन आत घेऊन गेलेल्या आरशात पुन्हा पाहून पुन्हा तोच प्रकार करायचा..त्याचा रंग काही उजळला नाही मात्र कातडी खराब होत गेली..त्यानंही हेमामालिनीची लक्सची जाहिरात पाहिलेली होती. .त्याची ती आवडती अभिनेत्री.. हेमामालिनीनीसारखं नाही पण कमित कमी आपला रंग उजळ व्हावा असा त्याचा व्होरा असावा..पण झालं उलटच..दुसऱ्या एका प्रकारात एका मुलीनं लग्नाच्या अगोदर दोन दिवसच हातापायावरचे केस काढण्यासाठी VEET हेअर रिमुव्हर लावला..त्यात त्या मुलीची त्वचा काळवंडली..लग्न तर दोन दिवसावर होतं..कसं तरी तो प्रकार मेकअप करुन झाकून टाकला...असे प्रकार अनेक होतात..तर दुसरीकडं अशाही अनेक जाहिराती आहेत ज्या अनेक वर्षापासून लोकांच्या मनाचा ठाव घेतायत आणि ते उत्पादनही आवर्जून घेतात.. त्यातलेच एक म्हणजे मोती साबण..हे साबण आणि त्याची जाहिरात फक्त दिवाळीतच येते..अनेक वर्ष त्याचा प्रभाव टिकून आहे..एक का अशा अनेक जाहिराती आहेत त्या लोकांना आवडतात..पण क्रिएटीव्हीटीच्या नावाखाली काहीही खपवण्याचा धंदा काहींनी चालवलाय...त्याला विरोध झालाच पाहिजे...

Friday, October 7, 2011

शिवसेनेचा दसरा मेळावा..




दरवर्षीप्रमाणं यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला..दसरा मेळावा-शिवसनैनिक आणि बाळासाहेब ठाकरे हे नातं शिवसेनेच्या स्थापनेपासूनचं आहे आणि ते आजतागायत आहे..सेनेचा दसरा मेळावा म्हणजे शिवसनैकांमध्ये उत्साह निर्माण करणारा जसा असतो तसाच तो प्रसिद्धीमाध्यमांसाठी बातम्यांची मोठी शिदोरीच असतो..आतातर २४ तास वाहिन्यांसाठी हा दसरा मेळावा पर्वणीच झालाय..दसरा मेळावा म्हटलं की बाळासाहेबांचा झंझावात...या झंझावातात ते कोणा-कोणाची वाट लावतात..ते ऐकणं शिवसैनिकांसाठी महत्वाचं असतं..पण याच दसरा मेळाव्याच्या भाषणातून बाळासाहेबांनी अनेक वादही निर्माण केलेत..खरं तर दसरा मेळाव्यातल्या बाळासाहेबांच्या भाषणानंतर वाद झाला नाही असा दसरा मेळावा कधी झाला नाही..यावेळीही ते नेहमीप्रमाणे आपल्या खास ठाकरे शैलीत सर्वांची पिसं काढणार असाच सर्वांचा होरा होता..पण बाळासाहेबांचं या दसरा मेळाव्यातलं भाषण मात्र नेहमीच्या भाषणापेक्षा खूपच सौम्य होतं..आर आर पाटील, मनमोहनसिंग, सोनिया गांधी यांचं त्यांनी व्यंग केलं पण तेही थोडक्यातच..त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला..पाच सहा महिन्यात मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका आहेत. त्यानंतर ठाण्याची निवडणुक आणि या वर्षभरात एकूण दहा महानगरपालिका तसच जिल्हा पिरषद निवडणुकीचा फड रंगणाराय..मुंबई महानगरपालिका तर शिवसेनेचा प्राणवायुच आहे.. त्यामुळे बाळासाहेब त्याच अनुशंगानं काही बोलतील असं वाटत होतं..पण त्याचा त्यांनी ओझरता उल्लेख केला आणि नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा महापालिका जिंका असा आदेश आपल्या सैनिकांना दिला..
मुंबईतल्या मुळ कोळी, आगरी, भंडारी या समाजाचा त्यांनी आवर्जून उल्लेख करुन आपली व्होट बँक शाबूत करण्याचा प्रयत्न केला..तसच कसाब, अफजलचा विषय काढून पुन्हा एकदा हिंदुत्ववाद सोडलेला नाही असंच त्यांनी दाखवून दिलं....पण याच निवडणुकीत राज ठाकरे यांचा मनसे त्यांची मोठी डोकेदुकी ठरणाराय. त्यामुळे या भाषणातही बाळासाहेब राज ठाकरेंवर तुटुन पडणार असं वाटलं होतं..पण त्यांनी राज या विषयाला हातही घातला नाही.. तसं पाहिलं तर सेनेच्या इतर नेत्यांच्या भाषणातही राज ठाकरेंचा फारसा उल्लेख आला नाही. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं..कदाचित राज ठाकरेंना फारसं महत्व द्यायचं नाही असचं सेनेनं ठरवलं असावं असं दिसतय. कारण मागच्या चार पाच वर्षात राज ठाकरेंवर उद्धव किंवा बाळासाहेब यांनी केलेल्या टीकेचा फायदा राज यांनाच झाल्याचं दिसतय..त्यामुळेही असेल कदाचित..किंवा मुंबई- ठाण्यात जर सत्ता मिळवण्यात काही अडचण आली तर अंबरनाथ पॅटर्नप्रमाणं मनसे हा शिवसेनेचा आशेचा किरण असू शकतो..काहीही असो बाळासाहेब यांनी जसा राज ठाकरेंचा विषय टाळला तसा इतर राजकीय विरोधकांवरही ते फारसं बरसले नाहीत..
भिमशक्तीबरोबर युती होत आहे. त्याचा त्यांनी उल्लेख केला, पण दादर रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याच्या मागणीस मात्र त्यांनी कडाडून विरोध केला..एवढाच काय तो वादाचा मुद्दा सोडला तर बाळासाहेंबांच्या भाषणातून फार मोठं काही निघालं नाही..पण राजकीयदृष्ट्या ते एक संतुलित भाषण होतं.. पण बाळासाहेबांचं भाषण जे असतं ते हे भाषण वाटलं नाही हे मात्र तेवढचं खरं..

Sunday, October 2, 2011

उतावळे नवरे आणि गुडघ्याला बाशिंग..




भारतीय जनता पार्टीत सध्या अनेक हवसे नवसे गवसे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत..कारणही तसच आहे..केंद्रातल्या युपीए सरकारचे दिवस भरत आलेत.. त्यामुळे या सरकारचं आता काही खरं नाही असंच वातावरण आहे..भ्रष्टाचारात आकंठ बुडालेलं हे सरकार सध्या पडत नाही हे फक्त विरोधकांकडे पुरसं संख्याबळ नाही म्हणून, नाहीतर एव्हाना हे सरकार केंव्हाच गंगेत बुडालं असतं..सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसच्या मॅनेजर्सनाही जयललिता, मायावती, मुलायमसिंग कोणाचे कोणाचे उंबरठे झिजवावे लागले असते..कोणा कोणाच्या पुढं लोटांगण घालावं लागलं असतं हे सांगायलाच नको..पण विरोधकांकडे संख्याबळ नाही म्हणून हे सरकार तग धरुन आहे..त्यातच प्रणव मुखर्जी यांच्या एका लेटरबॉम्बमुळेही चिंदबरमसह पंतप्रधान कार्यालय अडचणित आलं.. चिदंबरम यांची तर विकेट जाणारच अशीच परिस्थीती निर्माण झाली होती..पण शेवटी १० जनपथवर जोर बैठका झाल्या.. सगळ्यांनी आपापली बाजू मांडली आणि शेवटी चिदंबर यांना वाचवण्यात आलं.. टू जी स्पेक्ट्रमनं युपीए सरकारला चारीबाजूनं घेरलंय..काँग्रेस आणि सरकारची ही अवस्था असताना प्रमुख विरोध पक्ष असलेल्या भाजपमध्ये मात्र पुढचा पंतप्रधान कोण यासाठी स्पर्धा सुरुय..म्हणजे पळा पळा पळा पहिला नंबर कोणाचा यावर जोरदार रस्सीखेच सुरु झालीय..नरेंद्र भाईंनी तर उपोषण करुन आपणच उद्याचे पंतप्रधान असल्याचं अनेक नेत्यांकडून वदवून घेतलं. त्यामुळे बिच्चारे पीएम इन वेटिंग लालकृष्ण अडवाणींचाही हिरमोड झाला. आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीची लागली का वाट.. त्यानंतर अडवाणींनाही नागपूरला जाऊन संघात हजेरी लावावी लागली..अडवाणींचाही मध्येच पुन्हा एकदा यात्रेचा किडा वळवळला..पण संघाचा आर्शिवाद हवा म्हणून गेले नागपूरला..मोहन भागवत यांनीही मग त्यांना यात्रा हवी की पंतप्रधानपद असा पर्याय ठेवला..शेवटी आपण पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत नाही असं अडवाणींना नागपूरातच पत्रकारांना सांगावं लागलं..आता अडवाणींचा पत्ता कट झाला म्हटल्यावर मोदीभाई एकदम हवेतच गेले..आता आपल्याशिवाय भाजपात पंतप्रधान होण्यास कोणीच लायक नाही असं त्यांना वाटू लागलं..त्यातच त्यांनी अडवाणींच्या यात्रेवर नाराजी व्यक्त केली..त्यामुळे मोदी- अडवाणी यांच्यातच वाद झाला..तर दुसरीकडं सुषमा स्वराज, अरुण जेटली, व्यंकय्या नायडू, राजनाथसिंग, मुरली मनोहर जोशी एक ना दोन डझनभर नेते पंतप्रधानपदाच्या या रांगेत उभे..त्यातच भाजपची दोन दिवसांची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत झाली..नाराज नरेंद्र मोदींनी नवरात्रीचा उपवास आहे असं सांगत बैठकीला येणं टाळलं..पंतप्रधानपदासाठी भाजपात अशी ही स्पर्धा सुरु झालीय...पण मी अगोरदच म्हटल्याप्रमाणं युपीए दोनची आणखी अडीच वर्ष बाकी आहेत..निवडणुका २०१४ मध्ये आहेत..सध्याचं सरकार जरी चारीबाजूंनी संकटात असलं तरी ते कोसळण्याचीही चिन्हं नाहीत..त्यामुळे कशाचाही पत्ता नसताना भाजपात मात्र पंतप्रधानपदासाठी स्पर्धा सुरु झालीय...आपल्याकडे तशी म्हणच आहे ना..उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग..

उपोषण आणि गांधी टोपीचे दिवस..




अण्णा हजारेंनी दिल्लीत केंद्र सरकारला नमवत रामलीला मैदानावर १२ दिवसांचं उपोषण करुन देशात वेगळ्या अध्यायाला सुरुवात केली. भ्रष्टाचाराच्याविरोधात अण्णांनी केलेल्या उपोषणाची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली. खरं तर उपोषण आणि अण्णा हजारे हा काय विषय नवीन नव्हता. त्यांनी यापूर्वीही अनेकदा उपोषण करुन महाराष्ट्र सरकारकडून अनेक मागण्या मान्य करवून घेतल्यात. पण केंद्र सरकारला अण्णांच्या उपोषणाची फारशी दखल घ्यावी अशी वाटली नाही. सरकारनं सुरवातीपासूनच त्यांचं उपोषण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सरकारची नाच्चकी झाली..पण शेवटी अण्णा मागे हटले नाहीत..तर सरकारलाच झुकावं लागलं...हे सर्व आता आठवण्याचं कारण एवढचं की अण्णांच्या उपोषणानंतर या देशात उपोषणाची एक लाटच आलीय. त्यातही गांधी टोपीला नाकं मुरडणाऱ्यांनीही स्टाईल सिम्बॉल म्हणत गांधी टोपी घातली.. गांधी टोपीलाही पुन्हा चांगले दिवस आले त्याचं श्रेय अण्णांना दयावं लागेलच..पण अण्णांच्या उपोषणाला मिळालेल्या या प्रचंड प्रतिसादानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनाही आत्मक्लेष करण्याची बुद्धी सुचली आणि त्यांनीही तीन दिवस उपोषण केलं..त्यांचं उपोषण मात्र सरकारी पैशानं आणि एसी थाटात झालं. उपोषणापेक्षा स्वतःला वेगळ्या प्रतिमेत प्रोजक्ट करण्यावरच त्यांचा भर दिसला..भाजपचे झाडून सारे नेते त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धावले.. त्यातच त्यांनी सद्भावना उपोषण वगैरेचा नारा दिला..पण हे उपोषण कशाचे आत्मक्लेश करण्यासाठी होतं हे सांगणं अवघड नाही...गुजरातमधल्या २००२ च्या दंगलीचं भूत या नरेंद्र मोदींची पाठ सोडत नाही..त्यांनी गुजरात विकासाच्या कितीही गप्पा मारल्या तरी त्यांना पंतप्रधान म्हणून जर संधी मिळणार असेल तर गुजरात दंगलीचं भूत त्यांची पाठ सोडणार नाही. त्यातूनच स्वतःची प्रतिमा बदलण्याचा मोदी आणि भाजपचा हा सगळा खटाटोप.. पण अण्णांच्या उपोषणाला मिळालेला प्रतिसाद पाहूनच मोदींनी उपोषणाचा मार्ग अवलंबला असावा असं म्हणायला जागा आहे. मोदींचे उपोषण स्वतःला पोजेक्ट करण्यासाठी होतं.. तर त्यांना विरोध म्हणून लगेच त्यांचे कट्टर राजकीय विरोधक शंकरसिंग वाघेलाही उपोषणाला बसले...हा सगळा राजकीय उपोषणाचा सारीपाट सुरु होता..त्यानंतर तेलंगणासाठी आंदोलन करणाऱ्या तेलंगण राष्ट्र समितीलाही उपोषणाचा मार्ग सुचला..मग त्यांनीही राजघाटावर जाऊन उपोषण केलं. तेही चक्क गांधी टोपी घालून..त्यानंतरही अनेक छोटी मोठी उपोषणं सुरुच राहिली...याचं कारण एकच ते म्हणजे अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद.. पण सर्वच काही अण्णा हजारे नसतात...त्यामुळे इतरांची उपोषणं आणि त्यांची गांधी टोपी यात स्वार्थ दडलेला आहे..पण अण्णांच्या उपोषणात स्वार्थ नाही..म्हणूनच अण्णांचं उपोषण हे उपोषणच होतं..तर बाकींच्याचा फक्त देखावा..तर घातलेली गांधी टोपी कधी फिरवतील ह्याचाही काही नेम नाही...शेवटी एवढचं की एखादा फार्मुला हिट झाला म्हटलं की त्याची नक्कल करायची फंडा आपल्याकडे जुनाच आहे.. त्यामुळेच उपोषण आणि गांधी टोपीचा वापर वाढलाय..चला एक मात्र चांगलं झाल..उपोषण आणि गांधी टोपीला दिवस चांगले आले...