Friday, October 28, 2011

दिवाळीचा फराळ...
दिवाळीचा फराळ हा तर एक स्वतंत्र आणि महत्वाचा विषय आहे...लहानपणी या दिवाळीचं महत्व खूप वाटायचं..दिवाळी म्हटलं की पहाटे उठून अंघोळ..स्वारी अभ्यंगस्नान..त्यानंतर नवे कपडे आणि त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी..आता गावाकडच्या दिवाळीत आतषबाजी हा शब्द थोडा मोठा वाटतो.. पण थोड्या फार फटाक्यांचा आवाज म्हणजे गावाकडची आतषबाजीच..त्यातच वडिलांनी आणून दिलेले फटाके तीन चार दिवस पुरतील अशा बेतानंच वापरावे लागत..शाळेत असताना दिवाळीच्या सणात ही सुप्त स्पर्धाही असायची...या गल्लीत पहाटे फटाक्यांचा पहिला आवाज माझाच झाला पाहिजे..पण मला ते शेवटपर्यंत जमले नाही..एक तर अंधोळ आटोपली जात नसे..नाही तर कोणीतरी छुपा रुस्तुम पहिला आवाज काढणारच...पण नंतर कॉलेजला गेल्यानंतर फटाक्यांची आवड थोडी कमी झाली..पण दिवाळी फराळ मात्र महत्वाचा तो विसरुन कसं चालेल.. फराळाशिवाय दिवाळी हे गणित शक्य नाही...
.. कॉलेजला गेल्यानंतर दिवाळी सुट्टीसाठी गावी जायचं....आमच्या गल्लीतले आम्ही जवळपास आठ दहा जण एकत्र यायचो... त्यावेळी दिवाळी फराळ आमच्या घरी आईच बनवायची म्हणजे आत्तासारखं मिठाईच्या दुकानातून सर्व पदार्थ विकत आणले जात नसत..तशी गावाकडं पद्धतही नव्हती..आजही गावात दिवाळीचा फराळ घरातच बनवला जातो..शेजारच्या काकू -मावशी -अक्का या एकत्र येऊन हा फराळ बनवायला मदत करत..मग हिच पद्धत सर्वांच्या घरात असे..त्यानंतर फराळाला बोलावलं जायचं..आम्ही आठ दहा जण चार दिवसात फराळाचा हा बेत एखाद्या शाळेतल्या वेळापत्रकाप्रमाणं आखायचो..शेवटचा बेत मात्र फराळाचा न ठेवता नॉनवेजचा ठेवला जात असे..कारण आठ दहा घरचा फराळ खाल्यानंतर जिभेलाही कंटाळा यायचा..मग वेगळा बेत व्हायलाच पाहिजे..पण आमची पंचाईत व्हायची..आम्ही जवळपास सर्वचजण शाकाहारी कुटुंबातले असल्यामुळे आमच्याकडे तो बेत शक्य नव्हता..बर ते घरच्यांना कळलं तर मग वरुन ज्या काही शिव्या पडत त्या सांगायला नकोच..(म्हणजे आम्ही कॉलेजला जात होतो तेव्हाही आमच्या आई बाबांना भीत होतो..) असो..पण शेवटचा बेत एखाद्या मराठा मित्राच्या घरी ठेवला जायचा..आणि मग खऱ्या अर्थानं दिवाळीचा फराळ यथेच्छ पार पडला असं वाटायच..पण यातली गम्मत वेगळीच..दिवाळीच्या फराळासाठी ज्याच्या घरी पंगत बसायची त्यावेळी फराळाचं ताट आलं की पहिली नापसंती अर्थातच रव्याच्या लाडूला असायची..कारण या रव्याच्या लाडूचं पूराणच लय भारी..हा लाडू काही दातानं तुटेल असा नसायचा..त्यामुळे उगाच दातांना त्रास का द्यायचा..मग हळू हळू एकएकाच्या ताटातून तो लाडू नावडतीसारखा बाजूला ठेवला जात असे..या लाडूच्या खट्टपणाचे अनेक किस्से आहेत.पण तो जरा सॉफ्ट व्हावा यासाठी आई-काकू भरपूर प्रयत्न करायच्या पण त्यांना यश काही येत नव्हतं..जीचा रव्याचा लाडू सॉफ्ट होईलं तीनं दिवाळी जिंकलीच म्हणा की...त्यावेळी टिव्ही आणि त्यावर एवढे कुकरी शो नव्हते त्यामुळे आमच्या आईंना अनुभवाचे जे बोल मिळतील त्यातून तो फराळही बनवला जायचा...या फराळाच्या डिशमध्ये सर्वात भाव घाऊन जायचा तो म्हणजे चिवडा....चिवड्याला मोठी फर्माइश असयाची.. त्यात वर कांदा द्या असा आवाज कोणीतरी दिला की कांदा हजर..त्यानंतर नंबर लागायचा तो बुंदीच्या लाडूचा..त्यानंतर नंबर लागायचा तो म्हणजे करंजीचा..रव्याच्या लाडूसारखचं सापत्नभावाची वागणूक कधी कधी अनारश्याला मिळायची...पदार्थ चांगला..त्यात तो गोड..पण का कोण जाणो थोडी भीती वाटायचीच... त्यात शंकर पाळ्या हा पदार्थही अनेकांची पसंती ठरायचा..असं एक एक करता फराळ फस्त व्हायचा....दिवाळीचा फराळ म्हटलं की शक्यतो आपल्या पोटाचा अंदाज घेऊनच अनेक जण बसत..पण मी असेही माझे मित्र पाहिलेत... जे ताटात येईल तो पदार्थ आणि येईल तेवढा फस्त करायचे..मला अशा मित्रांचा खूप हेवा वाटायचा..बर त्यांना ते पचायचंसुद्धा....जाऊद्या आपल्याला पचेल तेवढं आपण खावं …अशी दिवाळी आणि दिवाळीचा फराळ आता होत नाही..मोठ्या शहरात तर कोणी घरी फराळ बनवत नाही...सगळं कसं मिठाईच्या दुकानातून रेड्डी टू इट....आणि त्यातही दिवाळीच्या फराळाची अशी पंगतही बसत नाही.. फार फार तर मिक्स मिठाईचा एक बॉक्स भेट म्हूणून दिला की झाला दिवाळीचा फराळ...त्यातच आता कुछ मिठा हो जाय...म्हणत मोठाल्लं चॉकलेटही दिलं जातं..तोच फराळाचा गोडवा म्हणून गोड माणून घ्यायचं... पण गावाकडीची जी काही दिवाळी व्हायची त्यात एकमेकांच्या घरातला गोडवा, आपलेपणा असायचा...तसा कुछ मिठा हो जाय किंवा मिठाईच्या बॉक्समध्ये जाणवत नाही..

No comments:

Post a Comment