Sunday, October 2, 2011

उतावळे नवरे आणि गुडघ्याला बाशिंग..




भारतीय जनता पार्टीत सध्या अनेक हवसे नवसे गवसे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत..कारणही तसच आहे..केंद्रातल्या युपीए सरकारचे दिवस भरत आलेत.. त्यामुळे या सरकारचं आता काही खरं नाही असंच वातावरण आहे..भ्रष्टाचारात आकंठ बुडालेलं हे सरकार सध्या पडत नाही हे फक्त विरोधकांकडे पुरसं संख्याबळ नाही म्हणून, नाहीतर एव्हाना हे सरकार केंव्हाच गंगेत बुडालं असतं..सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसच्या मॅनेजर्सनाही जयललिता, मायावती, मुलायमसिंग कोणाचे कोणाचे उंबरठे झिजवावे लागले असते..कोणा कोणाच्या पुढं लोटांगण घालावं लागलं असतं हे सांगायलाच नको..पण विरोधकांकडे संख्याबळ नाही म्हणून हे सरकार तग धरुन आहे..त्यातच प्रणव मुखर्जी यांच्या एका लेटरबॉम्बमुळेही चिंदबरमसह पंतप्रधान कार्यालय अडचणित आलं.. चिदंबरम यांची तर विकेट जाणारच अशीच परिस्थीती निर्माण झाली होती..पण शेवटी १० जनपथवर जोर बैठका झाल्या.. सगळ्यांनी आपापली बाजू मांडली आणि शेवटी चिदंबर यांना वाचवण्यात आलं.. टू जी स्पेक्ट्रमनं युपीए सरकारला चारीबाजूनं घेरलंय..काँग्रेस आणि सरकारची ही अवस्था असताना प्रमुख विरोध पक्ष असलेल्या भाजपमध्ये मात्र पुढचा पंतप्रधान कोण यासाठी स्पर्धा सुरुय..म्हणजे पळा पळा पळा पहिला नंबर कोणाचा यावर जोरदार रस्सीखेच सुरु झालीय..नरेंद्र भाईंनी तर उपोषण करुन आपणच उद्याचे पंतप्रधान असल्याचं अनेक नेत्यांकडून वदवून घेतलं. त्यामुळे बिच्चारे पीएम इन वेटिंग लालकृष्ण अडवाणींचाही हिरमोड झाला. आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीची लागली का वाट.. त्यानंतर अडवाणींनाही नागपूरला जाऊन संघात हजेरी लावावी लागली..अडवाणींचाही मध्येच पुन्हा एकदा यात्रेचा किडा वळवळला..पण संघाचा आर्शिवाद हवा म्हणून गेले नागपूरला..मोहन भागवत यांनीही मग त्यांना यात्रा हवी की पंतप्रधानपद असा पर्याय ठेवला..शेवटी आपण पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत नाही असं अडवाणींना नागपूरातच पत्रकारांना सांगावं लागलं..आता अडवाणींचा पत्ता कट झाला म्हटल्यावर मोदीभाई एकदम हवेतच गेले..आता आपल्याशिवाय भाजपात पंतप्रधान होण्यास कोणीच लायक नाही असं त्यांना वाटू लागलं..त्यातच त्यांनी अडवाणींच्या यात्रेवर नाराजी व्यक्त केली..त्यामुळे मोदी- अडवाणी यांच्यातच वाद झाला..तर दुसरीकडं सुषमा स्वराज, अरुण जेटली, व्यंकय्या नायडू, राजनाथसिंग, मुरली मनोहर जोशी एक ना दोन डझनभर नेते पंतप्रधानपदाच्या या रांगेत उभे..त्यातच भाजपची दोन दिवसांची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत झाली..नाराज नरेंद्र मोदींनी नवरात्रीचा उपवास आहे असं सांगत बैठकीला येणं टाळलं..पंतप्रधानपदासाठी भाजपात अशी ही स्पर्धा सुरु झालीय...पण मी अगोरदच म्हटल्याप्रमाणं युपीए दोनची आणखी अडीच वर्ष बाकी आहेत..निवडणुका २०१४ मध्ये आहेत..सध्याचं सरकार जरी चारीबाजूंनी संकटात असलं तरी ते कोसळण्याचीही चिन्हं नाहीत..त्यामुळे कशाचाही पत्ता नसताना भाजपात मात्र पंतप्रधानपदासाठी स्पर्धा सुरु झालीय...आपल्याकडे तशी म्हणच आहे ना..उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग..

No comments:

Post a Comment