Sunday, October 2, 2011

उपोषण आणि गांधी टोपीचे दिवस..
अण्णा हजारेंनी दिल्लीत केंद्र सरकारला नमवत रामलीला मैदानावर १२ दिवसांचं उपोषण करुन देशात वेगळ्या अध्यायाला सुरुवात केली. भ्रष्टाचाराच्याविरोधात अण्णांनी केलेल्या उपोषणाची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली. खरं तर उपोषण आणि अण्णा हजारे हा काय विषय नवीन नव्हता. त्यांनी यापूर्वीही अनेकदा उपोषण करुन महाराष्ट्र सरकारकडून अनेक मागण्या मान्य करवून घेतल्यात. पण केंद्र सरकारला अण्णांच्या उपोषणाची फारशी दखल घ्यावी अशी वाटली नाही. सरकारनं सुरवातीपासूनच त्यांचं उपोषण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सरकारची नाच्चकी झाली..पण शेवटी अण्णा मागे हटले नाहीत..तर सरकारलाच झुकावं लागलं...हे सर्व आता आठवण्याचं कारण एवढचं की अण्णांच्या उपोषणानंतर या देशात उपोषणाची एक लाटच आलीय. त्यातही गांधी टोपीला नाकं मुरडणाऱ्यांनीही स्टाईल सिम्बॉल म्हणत गांधी टोपी घातली.. गांधी टोपीलाही पुन्हा चांगले दिवस आले त्याचं श्रेय अण्णांना दयावं लागेलच..पण अण्णांच्या उपोषणाला मिळालेल्या या प्रचंड प्रतिसादानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनाही आत्मक्लेष करण्याची बुद्धी सुचली आणि त्यांनीही तीन दिवस उपोषण केलं..त्यांचं उपोषण मात्र सरकारी पैशानं आणि एसी थाटात झालं. उपोषणापेक्षा स्वतःला वेगळ्या प्रतिमेत प्रोजक्ट करण्यावरच त्यांचा भर दिसला..भाजपचे झाडून सारे नेते त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धावले.. त्यातच त्यांनी सद्भावना उपोषण वगैरेचा नारा दिला..पण हे उपोषण कशाचे आत्मक्लेश करण्यासाठी होतं हे सांगणं अवघड नाही...गुजरातमधल्या २००२ च्या दंगलीचं भूत या नरेंद्र मोदींची पाठ सोडत नाही..त्यांनी गुजरात विकासाच्या कितीही गप्पा मारल्या तरी त्यांना पंतप्रधान म्हणून जर संधी मिळणार असेल तर गुजरात दंगलीचं भूत त्यांची पाठ सोडणार नाही. त्यातूनच स्वतःची प्रतिमा बदलण्याचा मोदी आणि भाजपचा हा सगळा खटाटोप.. पण अण्णांच्या उपोषणाला मिळालेला प्रतिसाद पाहूनच मोदींनी उपोषणाचा मार्ग अवलंबला असावा असं म्हणायला जागा आहे. मोदींचे उपोषण स्वतःला पोजेक्ट करण्यासाठी होतं.. तर त्यांना विरोध म्हणून लगेच त्यांचे कट्टर राजकीय विरोधक शंकरसिंग वाघेलाही उपोषणाला बसले...हा सगळा राजकीय उपोषणाचा सारीपाट सुरु होता..त्यानंतर तेलंगणासाठी आंदोलन करणाऱ्या तेलंगण राष्ट्र समितीलाही उपोषणाचा मार्ग सुचला..मग त्यांनीही राजघाटावर जाऊन उपोषण केलं. तेही चक्क गांधी टोपी घालून..त्यानंतरही अनेक छोटी मोठी उपोषणं सुरुच राहिली...याचं कारण एकच ते म्हणजे अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद.. पण सर्वच काही अण्णा हजारे नसतात...त्यामुळे इतरांची उपोषणं आणि त्यांची गांधी टोपी यात स्वार्थ दडलेला आहे..पण अण्णांच्या उपोषणात स्वार्थ नाही..म्हणूनच अण्णांचं उपोषण हे उपोषणच होतं..तर बाकींच्याचा फक्त देखावा..तर घातलेली गांधी टोपी कधी फिरवतील ह्याचाही काही नेम नाही...शेवटी एवढचं की एखादा फार्मुला हिट झाला म्हटलं की त्याची नक्कल करायची फंडा आपल्याकडे जुनाच आहे.. त्यामुळेच उपोषण आणि गांधी टोपीचा वापर वाढलाय..चला एक मात्र चांगलं झाल..उपोषण आणि गांधी टोपीला दिवस चांगले आले...

No comments:

Post a Comment